India
एमी २०१८
पारंपारिक टीव्हीच्या स्पर्धेत स्ट्रीमिंग सर्व्हिसेसची सरशी
साधारण २००५ नंतर कुठल्या कारणांमुळे अमेरिकन टेलिव्हिजनचा सुवर्णकाळ अवतरला ते आपण मागच्या लेखात पाहिलं. या प्रवासात अमेरिकन टीव्ही आता नक्की कुठवर आला आहे हे पाहण्याची उत्तम लिटमस टेस्ट म्हणजे यावर्षीची एमी नामांकनं. आता नेमकं अवार्ड वरती लक्ष का द्यायचं? यावर माझं उत्तर सरळ सरळ असतं. आपल्याकडले राष्ट्रीय पुरस्कार असो किंवा जगभरातले फिल्म फेस्टिवल्स या सगळ्या सोहळ्यांकडे मी त्या सिनेमाचे प्रतिनिधित्व करणारे सोहळे म्हणून पाहतो. हे पुरस्कार सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहेत. (जसं की सनडान्स सोडरबर्ग ने जिंकला यापेक्षा त्यामुळे तो जगला आणि आपल्याला माहिती झाला हे जास्त महत्वाचं.)
त्यामुळे पुरस्कार कोण जिंकले यापेक्षा पुरस्कारांमुळे काही उत्तम कलाकृती आपल्यालापर्यंत पोहोचल्या, आपल्याला माहिती झाल्या हे अधिक महत्वाचं. त्या प्रमाणेच अमेरिकन टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळात इतक्या प्रमाणात चांगला कंटेंट बनत असताना काय पाहावं, कशाची निवड कशी करावी हाच मोठा प्रश्न असतो. मग त्याचं उत्तर मिळवण्यासाठी एमीजकडे वळून पाहणं आपल्यासाठी जास्त सोयीचं ठरेल. नाही का.
एमीजचं महत्व नमूद करण्यासाठी एक छोटासा ट्रीव्हीया देतो. ऑस्कर अकादमी ६ ते ७ हजार सदस्यांची आहे, जी वेगवेगळ्या विभागसाठी मतं देते आणि त्यातून विजेता ठरवला जातो. आता एमी देखील हीच पद्धत वापरतं पण त्यात मजा अशी आहे की इथे सदस्य संख्या आहे बावीस हजार. आणि विभाग सुद्धा ऑस्कर्सच्या तिप्पटीच्या घरात आहेत. त्यामुळे एमीजचा आकार आपल्याला जाणवत नसला तरी तो किती मोठा आहे याचा अंदाज यावरून नक्कीच येऊ शकतो.
यंदा १७ सप्टेबरला सत्तरावा एमी पुरस्कार सोहळा संपन्न होईल. टेलिव्हिजन क्षेत्रात कॉमेडी, ड्रामा, लिमिटेड सिरीज, माहितीपट, टेलिफिल्म्स, मुलाखतीचे शोज, नॉन फिक्शन कॉमेडी शोज अशा अनेक विभागांमध्ये ते पुरस्कार देतात. यातल्या सर्वात मानाच्या उत्कृष्ट ड्रामा सिरीज या विभागामध्ये मागच्या वर्षी The Handmaid’s Tale या सिरीजने पुरस्कार पटकावला. स्ट्रीमिंग platform वर प्रदर्शित होऊनही एमी जिंकणारी ती पहिली सिरीज ठरली. म्हणजे टीव्हीसाठी असणाऱ्या पुरस्कारांमध्ये मुख्य पुरस्कार मिळवणारी सिरीज परंपरागत टीव्हीवरती कधी आलेलीच नव्हती. नवीन स्ट्रीमिंग सर्विसेसमुळे टेलिव्हिजनचं मूळ स्वरूपच बदलतं आहे किंबहुना बदललं आहे याचं ते द्योतक होतं.
असाच एक बदल काही दशकापूर्वी HBO ने घडवला होता. त्यानंतर गेली सलग सतरा वर्षं HBO हे सर्वात जास्त नामांकनं मिळवणारं चॅनल होतं. पण यावर्षी तो मानही Netflix कडे गेला आहे. HBO ला १०८ नामांकनं आहेत तर Netflix ला ११२. अर्थात नेटफ्लिक्सचं बजेट HBO पेक्षा चौपट आहे. आणि प्रोग्राम्स दसपट आहेत. त्यामुळे यात HBO चा दर्जा घसरलाय वगैरे असं काही घडलं नाही. पण Netflix किंवा स्ट्रीमिंग सर्विसेस किती महत्वाच्या आणि मोठ्या झाल्या आहेत याचा यावरून अंदाज येतो.
यातल्या काही मोजक्या सिरीज, कोण जिंकेल याचा अंदाज आणि त्यासाठी काय पार्श्वभूमी तयार केली जात आहे याचा एक थोडक्यात आढावा इथे घेऊयात. अर्थात वरती म्हटल्याप्रमाणे एमी हे निमित्त आहे या वेगवेगळ्या सिरीजबद्दल जाणून घेण्यासाठी. याचीच सुरुवात करत आहे बेस्ट ड्रामा या विभागपासून.
बेस्ट ड्रामा
या विभागत ७ नॉमिनेशन दिली गेली आहेत.
The Americans
The Crown
Game of Thrones
The Handmaid’s Tale
Stranger Things
This Is Us
Westworld
कोण जिंकणार?
एकूण नामांकनं पाहता गेम ऑफ थ्रोन्सने आधीच्याच ताकदीने परत येत सर्वाधिक २२ नामांकनं मिळवली आहेत. त्यापाठोपाठ २१ नामांकनांसह Westworld दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही सिरीज HBO च्याच आहेत. त्यावरून त्यांच्या दर्जाचा अंदाज यावा. त्यानंतर आहे मागच्या वर्षीची विजेती The Handmaid’s Tale जी गेल्या वर्षी बरीच कमी नामांकनं असूनही विजेती ठरली होती. पण यावर्षी या सिरीजने तब्बल २० नामांकनं पटकावली आहेत. यानंतर The Crown ची १३ नामांकनं इत्यादी. असे क्रमांक लागतात.
आता पाहूयात की जिंकण्याची शक्यता कोणाची जास्त आहे.
एमीज दरवर्षी सप्टेबर महिन्यात दिले जातात. त्यामुळे त्यांची वर्ष मोजण्याचं वर्ष हे सप्टेंबर ते सप्टेंबर चालतं. त्यामुळे दोन वर्ष सलग एमीज पटकवणारी गेम ऑफ थ्रोन्स गेल्या वर्षी या रेसच्या बाहेर पडली होती. कारण सातवा सीजन या सायकलमध्ये पूर्ण झालाच नाही. नेमकं या गोष्टीने The Handmaid’s Tale ला जिंकण्याची वाट मोकळी करून दिली. आता गेम ऑफ थ्रोंस यावर्षी परत आले आहेत. ते अनुभवी आहेत. HBO त्यासाठी नक्कीच जोरही लावेल. पण तरीही सध्याचं वातावरण पाहता आणि सातव्या सीजनबद्दलचा निरीक्षकांचा निरुत्साह पाहता त्यांची जिंकण्याची शक्यता बरीच धूसर झाली आहे.
त्यात गेम ऑफ थ्रोन्सचा सीजन संपून बरेच महिने लोटले आहेत. तर The Handmaid’s Tale ने त्यांचा सीजन नॉमिनेशनच्या केवळ एक दिवस आधी संपेल अशा पद्धतीने air केला आहे. त्यामुळे ज्युरींच्या मनात ही सिरीज जास्त ताजी आहे. शिवाय The Handmaid’s Tale वगळता Hulu ची इतर कुठली सिरीज अजून इतकी प्रभावी ठरू शकली नाहीये. त्यामुळे ते मार्केटिंगचं सगळं बजेट याच सिरीजमागे लावत आहेत. एमी ही हुलूसाठी एक मोठी संधी आहे. जे ती जाऊ देतील याची शक्यता अगदीच कमी आहे.
यात घडलाच तर एक बदल असा घडू शकतो. The Americans ही गेली ६ वर्ष उत्तम चाललेली सिरीज आहे. तिचा दर्जा पाहता एव्हाना या सिरीजला हा पुरस्कार मिळायला हवा होता. पण ते घडलं नाही. The Americans चा यावर्षी आलेला सीजन हा शेवटचा होता. त्यामुळे एमीने त्यांना मान द्यायची शेवटची संधी समजून त्यांच्या पदरात पुरस्कार टाकला. असंही होऊ शकतं. पण तीही शक्यता कमीच आहे.
याशिवाय २१ नामांकनं असलेली आणि अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही अशी सिरीज म्हणजे वेस्टवर्ल्ड. जोनाथन नोलन, जे जे अब्राहम, HBO अशी मोठी नावं तिच्या मागे असली तरी यावर्षी मात्र तिचा नंबर लागणार नाही. Westworld चा मागचा सीजन ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये चालवलेल्या HBO ने यावर्षी मात्र सीजन जून मध्ये संपवून ही सिरीज काही वर्षात एमी फेव्हरेट करण्याचा मानस दाखवून दिला आहे. आणि याच दर्जाचं काम होत राहिलं तर भविष्यात त्यांची जिंकण्याची शक्यता नक्कीच वाढते. पण या वर्षी ते जिंकण कठीणच आहे.
The Crown आणि This Is Us हे मुख्य स्पर्धेत नसले तरी मागच्या वर्षी अभिनयाचे महत्वाचे पुरस्कार त्यांनी मिळवले होते. This Is Us च्या स्टर्लिंग के ब्राऊनला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होता. शिवाय त्यातले इतर अभिनेतेही जिंकण्यास तितकेच सक्षम आहेत. The Crown ही लेखन आणि अभिनय या दोन क्षेत्रात फारच उत्तम सिरीज ठरली आहे. मागच्या वर्षी Crown साठी जॉन लिथगोला अभिनयाचा पुरस्कार होता. तर The Crown चा हा सीजन त्यांच्या सबंध अभिनय संचाचा शेवटचा सीजन आहे. (कारण तिसऱ्या सीजनमध्ये तो संपूर्णपणे बदलणार आहे.) त्यामुळे क्लेअर फॉय, मॅट स्मिथ, वेनेसा कर्बी यांची जिंकण्याची शक्यता वाढते. तेच लॉजिक The Americans च्या अभिनेत्यांनाही लागू होतं.
लिखाणाच्या बाबतीत परत एकदा The Handmaid’s Tale ला स्पर्धक नाही असंच चित्र आहे. अभिनयाच्या बाबतीतही ते परत एकदा मागच्या वर्षीइतकेच तगडे ठरू शकतात. फक्त तांत्रिक पुरस्कारांमध्ये गेम ऑफ थ्रोंस त्यांना मात देऊ शकेल.
Stranger Things चं नामांकनांमध्ये असणं बऱ्याच जणांना पटलेलं नाही. त्यामुळे Killing Eve आणि इतर काही शोजना बाहेर बसावं लागलं असं वातावरण आहे. पण ते मी स्वतःही पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर मी काही मत देऊ शकणार नाही.
ही झाली कोण जिंकू शकेल याची चर्चा. आता पुढच्या दोन लेखांमध्ये एमीजच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या सिरीज, त्या हाताळत असलेले विषय, त्यांनी केलेले प्रयोग याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.