Opinion
उंच नीच काही नेणे भगवंत...
१० मे २०१९ रोजी पंढरपुरातील काळा मारूतीजवळ बडवे समाजाने विठ्ठलाचं एक नवीन मंदिर उभं केलं.
ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती हे ईश्वरप्राप्तीचे चार मार्ग. पहिले तीन मार्ग साध्या भोळ्या माणसांना परवडणारे नव्हते म्हणून संतानी घालून दिला तो सोपा- भक्ती मार्ग. संसार करून परमार्थ करता येतो हे फक्त इथेच शक्य आहे. इथे तुम्ही पात्र असण्याची गरज नाही. तुम्ही माणूस असला तरी पुरेसे आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पायापडे जन एकमेका म्हणत दिंडीसोबत चालणाऱ्या अश्वांनाही माऊली माऊली म्हणून बोलवणे हा वारकरी असण्याचा संस्कार आहे. इथे मुर्तीपुजेचं स्तोम नाही. शुद्धाशुद्ध भाव नाही. इथे फक्त नामस्मरण करणे, आईवडिलांची सेवा करणे हीच देवाची पुजा आहे. वारीला आलात तर चांगलंच आहे. नाही आलात म्हणून रुसणारा हा देव नाही.
बाकी देव रुसतात, रागवतात. विठ्ठल हा रागवणारा देव नाही. तुकोबांच्या पत्नीने शिव्या दिल्या तरी हसून सहन करणारा तो पांडूरंग आहे. समाजमान्य सौदर्याची धारणा गोरेपणा असताना तो स्वतः काळ्या रंगाचा आहे. भक्ताच्या आज्ञेवरून तो अजुनही विटेवरच उभा आहे. जनाई दासीचे त्याने दळण दळले, सावता माळ्यासाठी शेतात राबला, सज्जन कसायाला मांस विकायला मदत केली, चोखा मेळासोबत ढोरे ओढली, नरहरी सोनाराचे घडे फुंकू लागला. “यारे यारे लहान थोर, याती भलते नारीनर, करावा विचार नलगे चिंता कोणासी” ही आश्वासकता फक्त भक्तीचळवळीत आहे. अशी सोय पारंपारिक सनातनी हिंदू धर्मात नव्हती. तिथे जातीची उतरंड आहे. भेदभाव आहे.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी १० मे २०१९ रोजी पंढरपुरातील काळा मारूतीजवळ बडवे समाजाने विठ्ठलाचं एक नवीन मंदिर उभं केलं. १० मे १९४७ रोजी दलितांना विठ्ठलमंदिरात प्रवेश देऊ असं बडवे समाजाने मान्य केल्यावर साने गुरूजींनी सुरू केलेलं प्राणांतिक उपोषण संपवलं होतं. चंद्रभागेच्या वाळवंटात साने गुरूजींनी एकादशीच्या मुहूर्तावर १ मे रोजी हरिजन मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाची-उपोषणाला सुरवात केली होती. तारखांचा योगायोग आपण थोडावेळ विसरून जाऊयात.
पंढरपुरात नवीन मंदिर उभारणे हे काही नवीन नाही असं काही जणांना वाटत असेल. ते वाटणंही स्वाभाविक आहेच. विठ्ठल-रुक्मिणीची अशी अनेक मंदिरे गावोगाव आहेतच. वारकऱ्यांची निष्टा एका विठ्ठलावरंच आहे. त्यामुळे अशी कितीही मंदिरं उभारली तरी आम्हाला फरक पडत नाही, हा एक विचारही कुणी केला तरी त्यांच्याही मताचा आदर आहे. पंढरपुरात जे मंदिर सध्या उभारले आहे. ते आमचं खाजगी मंदिर आहे. असं नव्या मंदिराचे संस्थापक बाबासाहेब बडवे यांचे म्हणणे आहे. आत्ता महत्त्वाचा मुद्दा असा की एखाद्या व्यक्तीने, समूहाने उभारलेल्या मंदिरावर खरंच आपण का उगाच चर्चा करायची गरज आहे का. मूळात अजुन एक मंदिर हा आपला सध्याचा विषयंच असायला नको असं कुणालाही वाटू शकतं.
ज्ञानेश्वरांनी साध्या भोळ्या माणसाला समजेल अशा प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहली. तुकोबांनी ‘वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा’ म्हणत माणसामाणसांत जातीभेद मानणाऱ्या सनातनी धर्माला दूर सारत भक्तीचा विचार मांडला. धर्म आणि भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून हा समानतेचा विचार घेऊन नामदेव उत्तरेत पंजाबपर्यंत गेले. वाळंवटात रडणाऱ्या महाराच्या पोराला कडेवर घेऊन त्याचा शेंबूड संत एकनाथांनी पुसुन त्याला घरी नेलं. ह्याच एकनाथांनी पितराचे जेवण तथाकथित अस्पृश्यांना खाऊ घातलं, काशीहून आणलेलं तीर्थ तहानलेल्या गाढवाला पाजलं. चोखामेळा, रोहिदास, सावता, कबीर, मोमीन लतीफा मुसलमान, सेना न्हावी, गोराकुंभार, जनाबाई, कान्होपात्रा. अशी असंख्य नावं. पंढरीच्या विठ्ठलाच्या आसऱ्याला ही सगळी माणसं जातीभेद विसरून एकाच छताखाली आली. ‘उंच नीच काही नेणे भगवंत’, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’, ‘सकळासी येथे आहे अधिकार’ अशी कित्येक प्रमाणं आहेत. वारकऱ्यांच्या अगदी मुखपाठ असलेल्या अभंगातील ही प्रमाणं हरिपाठ, कीर्तन, काकडा अन भजनात कायम असतात.
काळाच्या एका टप्प्यावर वारकरी आणि भक्ती संप्रदायाने महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण केली. भक्ती चळवळीचं योगदान वादातीत आहेच. पण कसोटीवर तपासून पाहताना संतपरंपरेनंतर भक्ती चळवळ फक्त एक वैचारिक चळवळ होते. नंतर ती मवाळ होताना दिसते. तिची भूमिका घेण्यातला आग्रह हरवून त्यातली कृतिशीलता स्तब्ध होताना दिसते. वारकरी चळवळीचं मग पुन्हा सॉफ्ट हिंदूत्व झाल्यासारखं होतं.
वारकरी परंपरेबद्दल मला नितांत आदर आहे. पण त्यातही संत ज्ञानेश्वरांपासून सातशेहून अधिक वर्षाच्या दिव्य परंपरेत दलित, अस्पृश्यांना प्रवेश नव्हताच. सन्यासाचे पोरं म्हणून जी उपेक्षा ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आली तिच ‘दर्शनासी कैसे येऊ आम्ही जातीहीन’ ही चोखोबाच्या करूण वाणीत कायम होती. वारकरी ही एक आयडेंटिटी सगळ्या संतांना असतानादेखील त्यांच्या नावापुढे चिकटलेलं जास्त वास्तव त्यांचा पिच्छा पुरवत राहिलं. गोरगरिबांसाठी समानता वाटायला निघालेल्या संतांनाही धर्माधारित जातीय उतरंडींनी सोडलं नाही हे वास्तव स्वीकारावं लागेल.
पंढरपुरच्या विठ्ठल देवस्थानच्या पुजेचा विशेषाधिकार बडवे समाजाला होता. अलीकडेच न्यायालयाच्या निर्णयानंतर तो पुजेचा अधिकार काढून घेण्यात आला आणि पुजेसाठी पगारी पुजारी नेमल्या गेले. तेही कुठल्याही जातीचे. यावरून बडवे यांच्या मनातली धुसफुस या मंदिराच्या स्थापनेच्या रुपातून प्रगट झाली. बडवे यांच्या मंदिराची स्थापना ही फक्त आणखी एक मंदिर नाही.
सानेगुरूजींचं उपोषण यशस्वी झालं. १० मे १९४७. हरिजनांना (दलितांना) विठ्ठलमंदिरात प्रवेश देऊ असं बडवे समाजाने मान्य केल्यावर साने गुरूजींनी सुरू केलेलं प्राणांतिक उपोषण संपवलं. चंद्रभागेच्या वाळवंटात साने गुरूजींनी एकादशीच्या मुहूर्तावर १ मे रोजी हरिजन मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाची-उपोषणाला सुरवात केली होती. दहा दिवसाच्या या उपोषणांना दलितांना विठ्ठलमंदिरात प्रवेश द्यायचा हे पक्क झालं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अगदी महिन्याभरातंच विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात सरकारने 'हरिजन मंदिर प्रवेश' विधेयक एकमताने मंजूर केले.
पुढे यावर सनातनी विचाराच्या लोकांचे साहजिकच आक्षेप आले. तेही कायद्याच्या मार्गाने. जिल्हा न्यायालयात हरिजन मंदिर प्रवेशाविरोधी अर्जांची सुनावणी सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये दोन सुनावण्यानंतर न्यायालयाच्या निकालाची प्रत घेऊन बडवे कमिटीचे अध्यक्ष बबनराव बडवे पंढरपुरात आले. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस बंदोबस्तात दलितांना मंदिर प्रवेश मिळाला.
दरम्यानच्या काळात हरिजनांच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळाला तर देव बाटेल अशा अफवाही जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. विठ्ठलमुर्तीतील देवत्वाचे तेज मंत्रांनी काढून घेऊन एका कलशात स्थापन करून त्याचीच दर्शन म्हणून पुजा करण्याची प्रथा करायची असे मनसुबेही तयार होते. हरिजन देवळात आले की आपला हा नवीन देव सुरू अशी ती योजना होती. ती नंतर अपूर्ण राहिली. ३० ऑक्टोबरला अधिकृतपणे विठ्ठलमंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला. गोरगरिबांना कित्येक शतकानंतर विठ्ठल पाहता आला.
शनीशिंगणापूर, हाजी अली दर्गा आणि शबरीमला मंदिरात स्त्रियांना विनाअट प्रवेश मिळावा ही अलीकडची मागणी. त्यावरून देशाचं राजकारण समाजकारण तापून निवलेलं. यातल्या शबरीमला मंदिर प्रकरणात महत्त्त्वाच्या निकालात न्यायालयाने स्त्रियांना विनाअट मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे असा निर्वाळा दिला. बाकीच्या न्यायधिशांनी स्त्रीपुरूष समानता या घटनेतल्या मूलभूत तत्वांच पालन केलं जावं या मुद्दयावरून निकाल दिला. याच न्यायासनातील न्यायाधिश इंदू मल्होत्रा यांनी थोडं वेगळं मत मांडलं होतं. त्यांच्या म्हणण्यानूसार कोणत्या वयाच्या स्त्रियांना प्रवेश द्यावा किंवा नको त्या धर्माची एक अत्यंत खाजगी बाब आणि परंपरेशी संबंधीत बाब आहे.
शबरीमला प्रकरणातील अधिक तांत्रिक प्रश्नावर न बोलता आपण फक्त एक मुद्दा विचारात घेऊयात की एकविसाव्या शतकात, विज्ञानयुगात स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून भांडतोय हा विरोधाभास वाटत असला तरी एखाद्या रूढी परंपरांना मोडण्याचे प्रतिकात्मक मूल्य म्हणून या लढ्याकडे पहावे लागेल. त्यावेळी सानेगुरूजींच्या प्रयत्नाने विठ्ठलमंदिरात मिळालेल्या प्रवेशाच्या जोरावर महाराष्ट्रातील आळंदीपासून ते त्र्यंबकेश्वरची मंदिरे सर्वांना खुली झाली हा विचारही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. १९३० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह का करतात हे आपल्याला विचारात घ्यावे लागेल.
आत्ता जुनमध्ये आषाढीला कानाकोपऱ्यातून वारकरी येतील. पंढरपुरच्या नव्या मंदिरात काहीजण दर्शनला जातील. काही जाणार नाहीत. बडवे यांनी उभारेललं मंदिर जातीभेद नाकारणाऱ्या धर्माच्या सीमा ओलांडून माणसाला एकाच दोरीत मोजणाऱ्या वारकरीपणापेक्षा वेगळं आहे. ते जर आत्ताच्या विठ्लाशी ईमान राखणारं असतं ते दुसरं मंदिर उभारण्याची गरज नव्हतीच.
युगे अठ्ठावीस तो विटेवर उभा आहे. तो अढळ आहे. तो समानता सांगतो. जातीभेद मोडा म्हणतोय. तो शुद्ध अशुद्ध पाळत नाही. त्याच्याकडे स्त्रीपुरूष भेद नाही. गरीब श्रीमंताचं अंतर नाही. त्याला पुजेची गरज नाही. तो आजही सगुण निर्गुण अशा दोन टोकावर उभा आहे. तो कुण्या धर्माचा विठ्ठल नाही. तो कबीर मोमीन लतीफा जनाई सावता कान्होपात्र गोरोबो चोखोबा तुकोबा ज्ञानोबा एकनाथ अशा जातीविरहीत संताचं आणि अख्या वारकऱ्यांच अढळस्थान आहे. सगळे हिंदू वारकरी नाहीत. वारकरी हिंदू नाहीत. वारकरीपण हे धर्मजातीपलीकडचं तत्व आहे. यातीकुळ माझे गेले हरपुनी हा इथला संस्कार आहे.
१९४७ साली विठ्ठलमंदिरात दलित अस्पृश्यांना प्रवेश मिळाला ही लोकशाहीचीच देण होती. सानेगुरुजींनी त्यावेळी आंदोलन केलं तेव्हा कॉंग्रेसच्या समाजवादी माणूस देवभोळेपणात अडकतो हा विरोधाभास नाही का अशी टीक त्यावेळीही झाली असेलंच. पण वंचितांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा लढा जिंकणं ही महत्त्वाची घटना होती. सध्या एकविसाव्या शतकात धर्माचं माणसाच्या आयुष्यातील स्थान कोणत्या चौकटीत बघायचं हेही आपल्याला तपासावं लागेल. आज प्रत्येकाला देवळात जाण्याची गरज वाटत नसेल. त्यांच्या भावनेचा आदर आहे. तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा. हा प्रश्न फक्त श्रद्धेचा नाही.
वारकरी, विठ्ठल, वारी, संतपरंपरा हा धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा यांच्या मध्यावर उभी राहत माणसाने माणसांशी प्रेम करावं हा वैश्विक विचार मांडणारी एक परंपरा आहे. “तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे” हे तुकोबांचे शब्द आहेत. अनाथासाठी निर्मिलेली पंढरीत दुसरं मंदिर स्थापन करायचा सवतसुभा मांडून पुन्हा काही ‘विशिष्ठ’ लोकांनी खाजगी मालमत्ता असल्यासारखी देवाची विभागणी करायचा वेगळा प्रयत्न करणे ह्याला अनेक अर्थ आहेत.
वारकरी, अभ्यासकार, कीर्तनकार यांनी आपल्या भूमिका वेळोवेळी मांडल्या पाहिजेत. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्याच्या प्रस्तावाला त्यावेळी अनेक कीर्तनकारांनीही विरोध केला होता. तर दुसऱ्या बाजूने मामासाहेब दांडेकरांसारख्या मोठ्या माणसांनी साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता.
भूमिका घेण्यातला खमकेपण दाखवला नाही तर वारकरी परंपरेचा सार्थ संदेश धुसर होण्याची शक्यता असते. चोखोबांचा आम्ही जातीहीन हा अभंग दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमातही गायला जाऊ लागतो. सगळ्याच गोष्टीचं सामान्यीकरण होऊ लागतं. भेदाभेद न मानता सगळ्यांना मिठीत घेणाऱ्या विठ्ठलाच्या आड येणाऱ्या मानसिकतेकडे आपण चिकित्सकपणे बघितलं पाहिजे. साध्या भोळ्या वारकऱ्यांना हे सांगत राहणं, वारकरी परंपरेशी आस्था असणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाचं, कीर्तनकारांच हे कर्तव्य आहे.