Americas
अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा
जाहिरात आणि रेटिंगमुक्त टीव्ही आणि गुणवत्ता
अमेरिकन टेलिव्हिजन पाहणं आपल्याकडं शहरी किंवा एका पातळीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्गात गेल्या काही वर्षात चांगलंच मुरलं आहे. याला कारणं अनेक आहेत. टोरंटची उपलब्धता, टीव्हीवर जास्तीत जास्त इंग्लिश चॅनेल्स दिसायला लागणं, इंटरनेटचा वाढता वापर, इंग्रजी साक्षरतेत वाढ, आपल्या टेलिव्हिजनकडून अपेक्षित गोष्टी न मिळणं आणि स्ट्रीमिंग सर्विसेसमध्ये झालेली वाढ. यातले सगळेच मुद्दे महत्वाचे आहेत, पण त्याहून जास्त महत्वाचा वाटतो तो म्हणजे अमेरिकन टेलिव्हिजनचा सुवर्णकाळ (Golden Age of Television). थोडक्यात कार्यक्रमांची गुणवत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली.
टेलिव्हिजन हा सिनेमापेक्षा अधिक कॉर्पोरेट तोंडवळा असणारा उद्योग आहे. इथे प्रयोगांची शक्यता तुलनेने कमी असते. त्यामुळे टीव्ही अधिक प्रतिगामी असणं अपेक्षित आहे (भारतीय टेलिव्हिजन ज्याचं उत्तम उदाहरण आहे). केवळ दिग्दर्शक किंवा लेखक मिळून एकवेळ वेगळा सिनेमा बनवू शकतात पण हेच टेलिव्हिजनमध्ये घडणं कठीण असतं. इथं चॅनल अधिकाऱ्यांच्या होकाराशिवाय प्रोजेक्ट मार्गी लागणं अशक्य. इथं जर बदल घडवायचा असेल तर संबंध बिझनेस मॉडेलच चांगल्या विषयांना प्रोत्साहन देणारं बनवावं लागेल, जे अमेरिकेत घडलं आणि तिथल्या टेलिव्हिजनला चांगले दिवस आले (केवळ पैशांबाबत नाही तर आशयाबाबतही).
AMC आणि HBO हे असे दोन चॅनल आले. त्यांचा बिझनेस जाहिरातदारांवर अवलंबून नव्हता. त्यांचा प्रेक्षक सबस्क्रिप्शनचे पैसे भरायचा. यामुळे आपला प्रेक्षक काय पाहतोय यासाठी TRP वरती अवलंबून असण्याची गरज संपली आणि प्रेक्षकांशी थेट सबंध प्रस्थापित झाला. जाहिरातदारांचा विषयांवरती नाही म्हटलं तरी थोडा अंकुश असतोच. जी शक्यताच इथे नाहीशी झाली. (लक्षात घ्या की BBC सुद्धा चांगले विषय देऊ शकतं कारण ते जाहिरातदारांच्या पैशांवर नाही तर करा मधून जमा केलेल्या पैशांवर अवलंबून आहे.) यातच मग AMC चे ब्रेकिंग बड, वॉकिंग डेड हे शो सुरु झाले. प्रेक्षक गंभीर विषय किंवा मांडणी टीव्हीवर पाहतील का याबाबत साशंक असणाऱ्या FX, NBC, ABC यांनाही डेली सोप्स कमी कराव्या लागल्या.
यात पुढचा बदल घडला तो स्ट्रीमिंग सर्विसेसच्या येण्याचा. इंटरनेटचा वापर वाढत होता. या प्रवाहाचा उपयोग करून घेत Netflix या एकेकाळी घरोघरी डीव्हीडी पोहोचवणाऱ्या कंपनीने आपला उद्योग इंटरनेटवर वळवला. यामुळे डीव्हीडीचा पसारा दूर झाला आणि प्रत्यक्ष घरी जाऊन डीव्हीडी देण्याचा प्राणायामही कमी झाला. आधी सिनेमे मग AMC, BBC सारख्या कमी पैसे असणाऱ्या नेटवर्क्सकडून कार्यक्रम मिळवून ते वेबसाईटवर उपलब्ध करून देणं, असं करत Netflix वाढत गेलं. जगभर सगळीकडं ते पोहोचले आणि मग त्यांनी स्वतःचे प्रोग्राम तयार करणं चालू केलं. आज अमेरिकेत बिग सिक्स या नावाने प्रसिद्ध असणारे जे ६ स्टुडीओज आहेत त्यांच्या बरोबरीने Netflix कमवत आहे. शिवाय Amazon, Hulu, HBO Go अशा नवीन स्ट्रीमिंग सर्व्हिसेसही तयार होत आहेत.
त्यांच्या आवाक्याचा अंदाज यावा म्हणून थोडीशी आकडेवारी देतो. दहा वर्षापूर्वी अमेरिकेत ९८% टीव्हीवरती पे केबल चालू होते. जे प्रमाण आज ७५% वर आलेलं आहे, तर Netflix वापरणाऱ्यांचं प्रमाण ५०% पेक्षाही पुढे गेलंय. सोबत Amazon वगैरे इतर सर्विसेस पण आहेतच. म्हणजेच पारंपरिक पद्धतीने टीव्ही बघणं कमी होत चाललं आहे तर स्ट्रीमिंग खूप वेगाने वाढत आहे.
तर डायरेक्ट सबस्क्रिप्शन चॅनल आणि स्ट्रीमिंग सर्व्हिसेस असे हे ते दोन मोठे बिझनेस मॉडेल आहेत ज्यांनी जाहिरातदार आणि रेटिंग या दोन्हींना बाहेर काढलं. Netflix अजूनही त्यांचे कुठले शो पहिले जातात आणि कुठले नाही याबद्दल कसलीच माहिती उघड करत नाही. त्यामुळे काय बघावं यासाठी सिनेमा किती कमावतो असली गणितं मांडली जातात, ती किमान इथं तरी लागू होणार नाहीत. ज्याचा परिणाम म्हणजे एकीकडे सिनेमागृहात जाणारा प्रेक्षक कमी होत असताना या सर्विसेस मात्र प्रचंड नफ्यात चालू आहेत. अत्यंत उत्तम आशय-विषयांची मांडणी इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
टेलिव्हिजनला इडीयट बॉक्स म्हणायचे दिवस मागे पडत आहेत. कारण त्याच्या मुलभूत गुणांमधेच बदल झाले आहेत. ज्यातले काही इथे नमूद करतो. जसं की जाहिराती मागे पडत आहेत. एक कंपनी जाहिरातींवर जो खर्च करते त्यातला खूप मोठा भाग हा टीव्हीकरता राखून ठेवलेला असायचा. ज्याचा टक्का घसरतो आहे. माझी स्वतःची तक्रार असायची की टेलिव्हिजन हे माध्यम व्हिज्युअल असूनही नसल्यासारखं त्याची निर्मिती केली जाते. पण आज प्रत्येक सिरीज त्याची त्याची एक दृश्य भाषा घेऊन समोर येत आहे. मग त्यात Modern Family सारखी sit-com “Mockumentary” सारखी हाताळणी करते, तर गेम ऑफ थ्रोंस टीव्हीला नवीनच असणारी भव्यता त्यात घेऊन येते. Mr. Robot सारखी इतकी वेगळी दृश्यात्मकता टेलिव्हिजनवर येऊ शकते हा विचारही मी कधी करू शकलो नसतो. हे सगळं घडू शकलं कारण टीव्ही स्क्रीनचा आकार मोठा झाला (मोबाईल पाहणाऱ्यानो आता तरी सुधरा).
आधी एक कार्यक्रम अगणित काळासाठी लांबत जायचा जे शोर्ट format मुळे कमी झालं. आधी सीजन २४, २६ एपिसोडचे असायचे त्या ठिकाणी आज एका वर्षात एक आकडी एपिसोड देऊ शकणारे शोज पण चालत आहेत. कार्यक्रम पाहण्यासाठी विशेष वेळ काढावा लागायचा. जे की आज आपण आपल्याला हवं त्या वेळेत गोष्टी पाहण्यास मोकळे झालो आहोत. (याबद्दल BBC चा मार्टीनी मिडिया हा पेपर जरूर वाचा, ज्यात ते सांगतात आता तुमची मार्टीनी तुम्ही बनवता तसं तुम्हाला जसे कार्यक्रम हवे आहेत नको आहेत ते सगळं तुमच्या समोर आहे. एकाच चॅनलचे कार्यक्रम पाहण्याचं बंधन तुमच्यावर नाही.)
प्रेक्षकांच्या अनुषंगाने आणि चांगलं काही देण्याच्या प्रयत्नातून अमेरिकन आणि सोबतच्या काही देशांच्या टेलीव्हिजनने हे बदल करून घेतले. ‘प्रेक्षकांची बुद्धिमत्ता कमीच असते. त्यांचा मेंदू १२ वर्षांच्या मुलाचा असतो. जे आम्ही दाखवू ते सगळं ते पाहतात’ असले युक्तिवाद त्यात नाहीत. हा दृष्टीकोन आपल्या देशातल्या व्यावसायिकांमध्ये कधी येईल याची वाट पाहूया. तेंव्हा आपला टीव्ही कसा सुधारला याबद्दल लिहायला मलाही आवडेल. त्यासाठी ‘विकासाची ब्लू प्रिंट’ म्हणून अमेरिकन टेलिव्हिजनचा अभ्यास करूया.