India

परतीच्या पावसाचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका

सोयाबीन, कापूस, द्राक्ष, ज्वारी, ऊस, इ. पिकांचं नुकसान.

Credit : शुभम पाटील

वार्तांकन साहाय्य: अनुष्का वाणी

राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं गेला आठवडाभर जोरदार हजेरी लावल्यानं गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण तसंच विदर्भात आज भारतीय हवामान विभागानं 'यलो अलर्ट' जारी केला होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मुंबई ठाण्यासह विदर्भातील यवतमाळ, अकोला, बीड, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, मराठवाड्यातील लातूर, बीड, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, इत्यादी भागांना कालपासून पावसानं झोडपलं.

"विदर्भात परतीचा पाऊस सातत्यानं सुरु आहे. अमरावती, यवतमाळसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावेळी विदर्भात मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा उशिरा झाल्यामुळं पेरणी नीट झाली नव्हती, अनेकांचा पेरणीचा खर्चही वाढला होता. त्यात आता कापणीच्या वेळी आलेल्या अतिवृष्टीनं अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे," यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाज शिक्षण संस्थेचे प्रा.घनश्याम दरणे यांनी सांगितलं.

कापूस आणि सोयाबीन ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांची नगदी पिकं आहेत. या दोन्ही खरीप पिकांचं या पावसात नुकसान होत असल्याचं चित्र सध्या दिसतंय. 

"सध्या कापूस वेचणीला येत आहे. कपाशीची बोंडं पक्क्व होण्याचा हा काळ असतो. सध्या ज्या प्रकारचा पाऊस सुरु आहे, अशा पावसात ही बोंडं सडतात. सोयाबीनचीही अशीच तऱ्हा आहे. साधारण दसऱ्यापासून सोयाबीनचा कापणी सुरु होते, मात्र गेल्या १० दिवसांपासून पाऊस उसंत देत नाहीये. यामुळं कापणीला उशीर होतोय,” दरणे सांगतात. 

सोयाबीन कापून त्याची मोट बांधून २ दिवस शेतातच ठेवण्याची प्रथा आहे. यामुळं मोट वळते आणि ढीग भरल्यानंतर जास्त दिवस टिकते. “मात्र पावसामुळं मोट बांधून शेतात ठेवताही येत नाहीये. ओलं राहिल्यानं सोयाबीन काळं पडतं आणि त्याची प्रतवारीही कमी होतो, ज्यामुळं किंमतीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं,” दरणे म्हणाले.

“गेल्या १० दिवसांपासून पाऊस थांबलेला नाही. शेतातल्या सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीचं नुकसान भयंकर आहे. पावसामुळं होणारं नुकसान तर आहेच, त्याबरोबर महागाईशी वाढलेली आहे, त्यामुळं शेत करण्याचा खर्चही वाढला आहे. कंपनीच्या वेळी ऊन न मिळाल्यानं सोयाबीचा दर्जा खालावतोय आणि कमी दर्जाचा सोयाबीन चांगल्या किंमतीला विकला जाणार नाही. त्यामुळं सांगलीकडूनच आमची कोंडी झाली आहे,” परभणी जिल्ह्यतील सोयाबीन शेतकरी ओमकार सांगतात.

 

 

अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी पीक विमा योजनेत २५ टक्के आगाऊ भरपाई देण्याची तरतूद असते. “मात्र त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावा लागतो. मी ३०-३१ ऑगस्टला अशा प्रकारची आगाऊ भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये असे आदेश काढलेच गेले नाहीत. जिथं आदेश काढले तिथं विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात अडथळा आणला. त्यामुळं अशा प्रकारचं नुकसान होऊनदेखील २५ टक्के आगाऊ रकमेचं वाटप कुठंही झालं नाही. लोकांना प्रति हेक्टर १३,५०० रुपये मिळाले असते,” भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजन क्षीरसागर म्हणाले.

शासनानं घोषित केलेली मदतसुद्धा अपुरी असल्याचं क्षीरसागर म्हणतात. “आमची मागणी आहे की सांगली-कोल्हापूर पुराच्या वेळी जे निकष सरकारनं लागू केले होते, तेच निकष विदर्भ-मराठवाड्यातही लागू करण्यात यावेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्याच्या अनुसार लागू करण्यात आलेले निकष २०१५-२० दरम्यान होते. ते आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळं नुकसान भरपाईचे निकष सुधारणं गरजेचं आहे,” ते पुढं सांगतात.

 

पश्चिम महाराष्ट्रातही नुकसान

विदर्भ-मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागतोय. कोल्हापुर जिल्ह्यात भात, भुईमूग तसंच सोयाबीनच्या पिकांचं नुकसान झालं आहे, तर सांगलीमध्ये द्राक्ष, डाळिंब, ज्वारी, ऊस या पिकांची मोठी वाताहत झाली आहे.

“वर्षाच्या या कालावधीत द्राक्षबागांमध्ये छाटणी होते व घडांना डोळे फुटतात. मात्र या अवकाळी पावसामुळं बागांना फटका बसत आहे. मोठ्या प्रमाणात औषध फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. या परिस्थितीत ७० टक्के द्राक्षफळाचं  नुकसान यावर्षी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,” शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) शेतकरी संघटनेचे राज्य संघटक भाई दिगंबर कांबळे, इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले.

जिल्हातील इतरही पिकं अतिवृष्टीग्रस्त झाली आहेत. कांबळे सांगतात, “जिल्ह्यात ज्वारीचं पीक पिवळं पडलेलं आहे. ऊसातही पाणी भरल्यानं ऊस आडवा झाला आहे.”

उसाचं नुकसान सांगलीप्रमाणं कोल्हापूर जिल्ह्यातही झालं आहे. “कोल्हापुरात ऊस आणि भूईमूग ही प्रामुख्यानं घेतली जाणारी पिकं आहेत. या काळात भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पण पावसाचं पाणी शेतात आल्यानं पिकं कुजतायत,” कांबळे म्हणाले. 

“ऑक्टोबर महिन्यात डाळिंबाच्या बागांना कळी लागण्याचा काळ असतो. मात्र सहसा ऑक्टोबरमध्ये जाणवणारी उष्णता नसल्यामुळं कळी धरत नाही. त्यात पावसामुळं औषध मारता येत नसल्यामुळं कीड लागण्याचा धोकाही उद्भवतो,” डॉ. सुदर्शन घिरडे सांगतात. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ गावात त्यांची डाळिंबाची बाग आहे.

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाचे सरकारनं त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे.