Mid West

इस्रायलच्या आक्रमणात चिरडली गेलेली पॅलेस्टिनी मुलं

त्यांचे मृतदेह शोधता यावे, म्हणून अनेक पॅलेस्टिनी मुलांच्या हातांच्या तळव्यांवर त्यांची नावं लिहून ठेवली जात आहे.

Credit : इंडी जर्नल

 

पॅलेस्टिनच्या गझा पट्टीत ७ ऑक्टोबरपासून इस्रायलच्या हल्ल्यात १,००० हुन अधिक मुलांनी त्यांचा एक किंवा दोन्ही पाय गमावले आहेत, असं युनिसेफची आकडेवारी सांगते. ही संख्या जगातील इतर कोणत्याही संघर्षग्रस्त क्षेत्रापेक्षा प्रचंड मोठी आहे.

'जवळपास तीन महिन्यांपूर्वी हमासनं केलेल्या हल्ल्याचं प्रत्त्युत्तर' असं म्हणत इस्रायलनं गझा पट्टीवर आक्रमण केलं. या आक्रमक कारवाईमध्ये आतापर्यंत २०,००० हुन अधिक गझामधील पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात जवळपास ८,००० हुन अधिक लहान मुलांचा समावेश आहे. साधारणपणे ५० टक्के लोकसंख्या १८ वर्षांखालील असलेल्या गझापट्टीतील लोकांचं भवितव्य असलेली ही लहान मुलं इस्रायलच्या हल्ल्यांची सर्वात मोठी आणि भयावह बळी ठरली आहेत.

 

 

बॉम्बहल्ल्यांनंतर सैरभैर होऊन कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात स्वतःच्या मुलांना शोधणाऱ्या अनेक पालकांचे व्हिडियो आपण समाज माध्यमांवर पहिलेच असतील. या हल्ल्यांत मृत्यू झालेल्या मुलांना जवळ घेऊन रडणारे पालकही आपण बघितले आहेत. अशा जीवघेण्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला तर आई-वडील किंवा नातेवाईकांना त्यांचे मृतदेह शोधता यावेत, म्हणून अनेक पॅलेस्टिनी मुलांच्या हातांच्या तळव्यांवर त्यांची नावं लिहून ठेवली जात आहे. मात्र इस्रायली हल्ल्यांत मृत्यू किंवा जखमी झालेल्या मुलांबरोबरच या युद्धादरम्यान इतर अनेक प्रकारचे छळ सहन करणाऱ्या मुलांची संख्या त्याहून मोठी आहे.

 

त्यांचे मृतदेह शोधता यावेत, म्हणून अनेक पॅलेस्टिनी मुलांच्या हातांच्या तळव्यांवर त्यांची नावं लिहून ठेवली जात आहेत.

 

इस्रायली हल्ल्यात दोन्ही पालक आणि संपूर्ण कुटुंबच गमावलेल्या मुलांची संख्यादेखील मोठी आहे. WCNSF किंवा ‘wounded child, no surviving family’ म्हणजे ‘जखमी मूल, परिवारात कोणीच उरलं नाही’, अशी एक हृदयद्रावक संज्ञा गझामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तयार करावी लागली आहे. पॅलेस्टिनी कुटुंब साधारणतः बरीच मोठी कुटुंबं असतात. मात्र असं असूनही अनेक मुलं अशी आहेत, ज्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती वाचू शकलेली नाही. या मुलांचा सांभाळ आता कोण करणार, हा मोठा प्रश्न तेथील मानवाधिकार संस्थांसमोर आहे.

युनिसेफनुसार बॉम्बहल्ल्यात जखमी होऊन शरीराचे अवयव कापावे लागलेल्या मुलांची संख्यादेखील आजपर्यंत कोणत्याही संघर्ष क्षेत्रातील संख्येपेक्षा बरीच मोठी आहे. भूल देण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या औषधांचा गाझामध्ये तुटवडा असल्यामुळं यातील अनेक मुलांवरील शस्त्रक्रिया भूल दिल्यशिवायच करण्यात आल्या आहेत.

७ ऑक्टोबरपासून हल्ल्यांबरोबरच इस्रायलनं गाझा पट्टीची अनेक प्रकारे कोंडी केली आहे. या हल्ल्याच्या आधीपासूनच गझामध्ये येणारं पाणी, अन्न, औषधं, वीज, इंधन, या सर्व गोष्टी पूर्णपणे इस्रायल नियंत्रित करतं. त्यामुळं ७ ऑक्टोबरच्या आधीदेखील गझाच्या अनेक भागांमध्ये या गोष्टींची वानवा होती, अनेक ठिकाणी वीज नव्हती, इंधनाचा तुटवडा होताच. मात्र हल्ले सुरु झाल्यापासून इस्रायलनं या सर्व जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा पूर्णपणे बंद केला.

 

 

युनिसेफच्या आकडेवारीनुसार गझामध्ये सध्या १ लाखाहून अधिक मुलांना दूषित पाणी पिल्यामुळं अतिसार झाला आहे. यामुळं अनेकांचा जीवही जाऊ शकतो. गेल्या तीन महिन्यांपासून अन्नपाण्याचा तुटवडा असल्यामुळं लाखो मुलांना कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे.

आणि या सगळ्या परिस्थितीत गाझामधील लहान-मोठ्या सर्व नागरिकांसाठी अतिशय दुर्मिळ अशी आश्रयाची स्थानं असलेले इस्पितळं देखील इस्रायलनं या युद्धात उध्वस्त केली. हल्ल्यांत जखमी झालेल्या लोकांसाठी उपचार केंद्रं म्हणून काम करण्यासोबतच ही इस्पितळं युद्धात घरं गमावलेल्या, आश्रयासाठी एकही सुरक्षित जागा न राहिलेल्या गझन नागरिकांसाठी आश्रयाची ठिकाणंदेखील होती. अनाथ झालेल्या, हात-पाय गमावलेल्या अनेक लहान मुलांसाठी राहिलेली एकमेव जागा होती. मात्र इस्रायली हल्ल्यात यातील अनेक इस्पितळंदेखील उध्वस्त झाली आहेत.

 

हे सर्व तरीही फक्त डोळ्यांना दिसणारं नुकसान आहे.

 

हे सर्व तरीही फक्त डोळ्यांना दिसणारं नुकसान आहे. या हल्ल्यांमधून या मुलांचं होणारं मानसिक, शैक्षणिक, भावनिक नुकसान, त्यांचं मोडून पडलेलं भविष्य, याचा हिशोब तर अजून झालेलाच नाही. गझा पट्टीतील २०० हुन अधिक शाळा, तिथलं सर्वात मोठं विद्यापीठ, इस्रायली हल्ल्यांत जमीनदोस्त झाली आहेत. यात युध्दामुळं निर्वासित झालेल्या लोकांसाठी छावण्या म्हणून वापरल्या जाणाऱ्या गाझामधील सरकारी तसंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळांवरही हल्ले झाले. नोव्हेंबर महिन्यात गझामधील ६ लाख २५ हजार शाळकरी मुलांसाठीचं २०२३-२४ शालेय वर्षच रद्द करण्यात आलं.  

७ ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलच्या काही भागांमध्ये हल्ला करत जवळपास २०० लोकांचं अपहरण केलं. त्यानंतर इस्रायलनं हमासला संपवण्याच्या नावाखाली गाझा पट्टीवर सलग हल्ले सुरु केले. आधी बॉम्बहल्ले करत नंतर गझा पट्टीवर मैदानी आक्रमणदेखील करण्यात आलं. या हल्ल्यांमधून हमासच्या भूमिगत अड्ड्यांवर हल्ला करत असल्याचं सांगत इस्रायली सैन्यानं गाझा पट्टीतील रहिवासी भाग, शाळा, रुग्णालयं, निर्वासित छावण्या, अशा सर्वच ठिकाणी बॉम्ब वर्षाव करत आहे. जरी हल्ल्यांच्या आधी इस्रायली सैन्य त्या भागांतील नागरिकांना एसेमेस किंवा आकाशातून टाकलेल्या पत्रकांमधून त्या प्रदेशातून बाहेर पडण्याच्या सूचना देत असलं, तरी अनेक वृत्तसंस्थांनी केलेल्या बातम्यांनुसार अनेकदा पलायन करत असलेल्या नागरिकांवर किंवा सुरक्षित ठिकाणं म्हणून घोषित केलेल्या जागांवर इस्रायलनं बॉम्बहल्ले केल्याचं दिसून आलं आहे. द न्यू यॉर्क टाइम्सनं नुकत्याच केलेल्या एका बातमीत इस्रायलनं हल्ले सुरु केल्यानंतर पहिल्या ६ आठवड्यांत सुरक्षित म्हणून घोषित केलेल्या ठिकाणांवर तब्बल २०० वेळा हल्ले केले.

 

 

आणि पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या या युद्धाचा अंत अजूनतरी जवळ दिसत नाहीये. हमासचा पाडाव केल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असं इस्रायल वारंवार सांगत आहे. हमास गझामधील नागरिकांचा, लहान मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचं छातीठोकपणे पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या इस्रायलसाठी आणि त्याच्यामागं उभ्या पाश्चिमात्य देशांसाठी हजारोंच्या संख्येनं मृत्यू होणारी, हल्ल्यांमधून वाचली तरी अपंग होणारी मुलं, आणि भविष्य अंधारमय असलेली ही पॅलेस्टिनी जनतेची पुढची पिढी पूर्णतः मानवी अधिकारविहीन आणि नकोशी आहे हे स्पष्ट होत आहे.