Quick Reads
मुघल गार्डन, अमृत गार्डन, लोकशाही
भारतामध्ये स्वातंत्र्यवादी, जनवादी वास्तुकला बहरली नाही.
भारताची राजधानी दिल्ली. मात्र पाच-सहा दिल्ली या परिसरात आहेत. पुराना किला म्हणजे प्राचीन दिल्ली. तिथे आता प्राणी संग्रहालय आहे. दुसरी दिल्ली आहे कुतुब मिनारच्या परिसरातली. तिसरी दिल्ली आहे हौज खास (खास हौद). मुघल साम्राज्याचा कारभार आग्रा किल्ल्यातून चालायचा. त्यावेळची दिल्ली म्हणजे राजधानी आग्रा होती. अकबराने ही राजधानी फतेपूर सिक्रीला नेली. मात्र तो सर्व खर्च वाया गेला कारण त्या शहराला पाणी पुरवणारी नदी आटली. पुढे शहाजहाँने लाल किल्ला बांधला आणि राजधानी आजच्या दिल्लीत आणली. त्या दिल्लीला म्हणतात पुरानी दिल्ली. ब्रिटिश हिंदुस्तानची राजधानी होती कोलकाता. तिथून ती दिल्लीला हलवण्याचा निर्णय झाला १९११ सालात. मुघलांच्या राजधानीचा म्हणजे लाल किल्ला, चांदणी चौक इत्यादीचा ब्रिटिशांना फारसा उपयोग नव्हता. म्हणून त्यांनी नवीन शहर वसवायचं ठरवलं. त्याला म्हणतात नवी दिल्ली. या नव्या दिल्लीतही दोन दिल्ली आहेत. एक आहे लुट्येन्सची दिल्ली. दुसरी आहे नुसतीच नवी दिल्ली.
एडविन लुट्येन्स हा आर्किटेक्ट नव्या दिल्लीच्या रचनाकारांमधला प्रमुख. ब्रिटिश सरकारमध्ये व्हॉईसरॉयचं निवासस्थान राजप्रासादासारखं असलं पाहिजे, त्याला साजेसं कायदेमंडळ, सचिवालयं, अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थानं, त्यांच्यासाठी बाजारपेठ, क्रिडांगणं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं इत्यादी. या नव्या दिल्लीची आखणी लुट्येन्सने केली. आजही या दिल्लीचा उल्लेख इंग्रजी वर्तमानपत्रात लुट्येन्स दिल्ली असा केला जातो. लुट्येन्स दिल्ली म्हणजे सत्ताधारी वर्गाची दिल्ली. सामान्य लोक क्वचितच या दिल्लीत जातात. लुट्येन्स दिल्लीमध्ये ट्रॅफिक जाम होत नाही. लुट्येन्स दिल्लीत विरळ लोकवस्ती आहे. सत्ताधारी वर्गाचा सर्वसामान्यांशी दैनंदिन संबंध फारच कमी येईल असा चोख बंदोबस्त लुट्येन्सने विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातच केला होता. आजही तोच सिलसिला सुरु आहे.
सत्ताधारी वर्गाचा सर्वसामान्यांशी दैनंदिन संबंध फारच कमी येईल असा चोख बंदोबस्त लुट्येन्सने केला होता.
या लुट्येन्स दिल्लीतील प्रमुख इमारत आहे ब्रिटीश व्हॉईसरॉयचं निवासस्थान. तो आरंभबिंदू मानून लुट्येन्स दिल्लीची रचना करण्यात आली आहे. याच निवासस्थानाचं रुपांतर राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाला व्हाईट हाऊस म्हणतात. या घराचं एकूण चटई क्षेत्र आहे ५५ हजार चौरस फूट. राष्ट्रपती भवनाचं एकूण क्षेत्रफळ आहे २ लाख १५ हजार ३०० चौरस फूट. अमेरिकेतही स्वातंत्र्यलढा झाला परंतु गोर्या लोकांनी, गोर्याच लोकांच्या विरोधात केलेला तो स्वातंत्र्यलढा होता. या गोऱ्या लोकांनी मूळ निवासींच्या जमिनी, जंगलं, नद्या सर्व काही लुटलं, त्यांचा नरसंहार केला. त्यानंतर ते आपआपसात लढले आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं.
हिंदुस्तानची स्थिती वेगळी होती. ब्रिटिशांनी हिंदुस्तानातील सर्वसामान्य जनतेचं शोषण केलं. त्यांची उत्पादनाची शक्तीच काढून घेतली. परिणामी भारत गरीब झाला. साहजिकच भारतीय स्वातंत्र्याचा लढा साम्राज्यवादी शोषणाच्या विरोधातला लढा होता. या लढ्याला साजेशा सरकारी इमारती, सरकारी निवासस्थानं राज्यकर्त्यांनी बनवायला हवी होती. परंतु नव्या राज्यकर्त्यांनी जुन्या राज्यकर्त्यांची निवासस्थानं - राष्ट्रपती भवन, राजभवन, इत्यादींचा ताबा घेतला. त्यामुळे भारतामध्ये स्वातंत्र्यवादी, जनवादी वास्तुकला बहरली नाही, राज्यकारभारही जुन्याच पद्धतीने चालू राह्यला. राज्यकर्ते राजासारखे मिरवू लागले. आपण नागरीक आहोत, प्रजा नाही हे भान मतदारांमध्ये अजूनही पुरेशा प्रमाणात आलेलं नाही. असो.
भारतामध्ये स्वातंत्र्यवादी, जनवादी वास्तुकला बहरली नाही.
तर मुद्दा आहे, मुघल गार्डनच्या नामांतराचा. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन अर्थातच उद्यानाचं नामांतर अमृत उद्यान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मुघल गार्डन ही वास्तविक पर्शियन साम्राज्याची. तिथून मुघल राज्यकर्त्यांनी या बागा भारतीय उपखंडात म्हणजे आजचा पाकिस्तान, भारत आणि बांग्ला देश इथे आणली. पर्शियन वा इराणी भाषेत पारिदायजा म्हणजे बंदिस्त बाग. त्यावरून युरोपियन भाषांमध्ये पॅरॅडाईज वा स्वर्ग हा शब्द आला. राज्यकर्त्यांना विश्रांतीसाठी सुरक्षित जागा हवी म्हणून चहूबाजूंनी भिंती असणाऱ्या जागेत बाग करायची. या बागेत चालण्यासाठी मार्गिका असतील, फुलांचे ताटवे, पाण्याचे कालवे वा ओहोळ, कारंजी असतील, गप्पाटप्पा करत बसण्यासाठी शामियाने वा नाजूक इमारती असतील, या बागांचं सौंदर्य, गंध, रंग द्विगुणित करणारं सौंदर्यशास्त्र गुंफण्यात आलं. या बागा आरामदायी असतील. पाण्याला मध्यवर्ती स्थान देऊन या बागांची रचना करण्यात येते. श्रीनगरमधील डल सरोवराच्या बाजूला असलेल्या शालिमार, निशांत या बागा मुघलांनी उभारल्या, ताजमहालच्या सभोवताली असलेली बागही अशीच आहे. त्याशिवाय पिंजौर गार्डन, हुमायूनचा मकबरा इत्यादी अनेक ठिकाणी अशा बागा आहेत. या बागांची एक मराठी आवृत्ती पुण्याला सिंहगड रोडवरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात पाह्यला मिळते. मुघलांच्या या बागांपासून प्रेरणा घेऊन विल्यम मुस्टोव या ब्रिटिश आर्किटेक्टने राष्ट्रपती भवनाच्या मागे असलेल्या मुघल गार्डनची आखणी केली. म्हणून त्या बागेला मुघल गार्डन हे नाव देण्यात आलं.
१९७७ साली काश्मीरला गेलो होतो तेव्हा निशांत आणि शालिमार या बागांमध्ये मी हिंडलो होतो. त्यावेळी सर्वसामान्य काश्मीरी हिंडण्यासाठी या बागांमध्ये यायचे. सोबत खाण्याचे पदार्थ आणि कहवा अर्थात काश्मिरी चहाची भांडी वगैरे. हिरवळीवर गालिचे वा चादरी अंथरून गप्पाटप्पा, खेळ, गाणी-गोष्टी करत कुटुंब बसायची. लहान मुलं त्या विस्तीर्ण बागांमध्ये हुंदडत असायची. कोणीही फुलं तोडत नसत की फुलांच्या ताटव्यांमध्ये जाऊन नासधूस करत नसत. या बागांची देखभाल राज्य सरकार करतं. परंतु सर्वांना मुक्त प्रवेश होता. बुकिंग वगैरे करावं लागायचं नाही. आजवर लाखो लोकांनी या बागांना भेटी दिल्या आहेत. हजारो प्रेमी युगुलांनी तिथल्या फुलांच्या ताटव्यांमध्ये बसून गुजगोष्टी केल्या आहेत. हजारो मुलं-मुली त्या बागांमध्ये बागडली आहेत. हजारो कुटुंबांनी आपले आनंदाचे क्षण या बागांमध्ये शोधले आहेत.
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. सरकारची मर्जी केव्हा फिरेल याचा नेम नसतो. हे उद्यान सामान्य नागरिकांना कधी खुलं असतं तर कधी बंद करतात. त्याशिवाय झाडाझडती असतेच. राष्ट्रपती भवन आहे ते. तिथली सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक असते. अमृत उद्यान भारतीय नागरिकांपासून फारच दूर आहे. हे उद्यान सामान्य नागरिक सोडा पण दस्तुरखुद्द राष्ट्रपतींच्या वा त्यांच्या कुटुंबियांच्याही भावविश्वात स्थान मिळवू शकत नाही.