India
पुण्यातील जैन वसतिगृहाच्या जमिनीवरून वादंग
एचएनडी ट्रस्टच्या विश्वस्तांनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप

पुणे: इथल्या शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी परिसरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जैन मंदिर व जैन वसतिगृहाची जवळपास ३ एकर जागा सेठ हिराचंद नेमीचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी परस्पर बांधकाम व्यावसायिकांना विकल्यामुळं जैन धर्मियांचा रोष व्यक्त होत आहे. विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरु असलेल्या मॉडेल कॉलनीतील ही प्रशस्त जागा पूर्णपणे विकसक गोखले बिल्डर्स यांना विकल्यानंतर त्यांनी दिलेल्या आराखड्यात मंदिराचा उल्लेखच नसल्याचं, तसंच वसतीगृहाचा पुनर्विकास अत्यंत तोकड्या जागेत होणार असल्याचं कार्यकर्त्यांना आढळलं. त्यामुळं नागरिकांनी हा विक्रीचा करार रद्द करून संपूर्ण जमीन पुन्हा ट्रस्टच्या ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनीदेखील नागरिकांच्या बैठकीत उपस्थिती लावून या विक्रीचा विरोध केला आहे.
“हा एक सार्वजनिक ट्रस्ट आहे. १९६८ साली एचएनडी ट्रस्टनं इतर ट्रस्ट तसंच समूहातील लोकांकडून देणग्या घेऊन ही जागा विकत घेतली होती. एचएनडी ट्रस्टतर्फे समाजसेवेसाठी धर्मशाळा, वसतिगृह, इत्यादी चालवले जातात,” एचएनडी जैन बोर्डिंग या वसतिगृहाशी जवळचा संबंध असलेले वकील योगेश पांडे सांगतात.
यावर्षी मे महिन्यात एचएनडी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांनी विरोध करत आंदोलन करूनही जवळपास ३ एकरची मंदिर आणि वसतिगृहाची संपूर्ण जागा ट्रस्टच्या विश्वस्तांनी गोखले बिल्डर्सला विकली. इथल्या काही विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची इमारत मोडकळीस आल्याची तक्रार केल्यानं वसतीगृहाचा पुनर्विकास करण्यासाठी विक्रीचा निर्णय घेतल्याचा दावा ट्रस्टनं केला आहे.
“मात्र तसं असेल, तर ३ एकरपैकी फक्त १०,००० चौरस फूट जागा वसतिगृहासाठी आणि बाकीची बिल्डरच्या घशात, असं का?” पांडे विचारतात.
ऍडव्होकेट योगेश पांडे जैन एचएनडी ट्रस्टच्या जमीन विक्रीबाबतच्या बैठकीत बोलताना.
ते पुढं सांगतात, “विश्वस्तांनी विक्रीमागचं दुसरं कारण ट्रस्ट आर्थिक अडचणीत सापडलं असल्याचं सांगितलं आहे, मात्र त्यांची फक्त गेल्या वर्षाची बॅलन्स शीट पाहिल्यास ट्रस्टनं ९ कोटी रुपये वालचंद ग्रुपला एका प्रकल्पासाठी म्हणून हस्तांतरित केल्याचे आढळतात. वसतीगृहाचा पुनर्विकास करायला जास्तीत जास्त १५ कोटी रुपये लागणार आहेत, कारण इमारत पाहिल्यास आपल्याला कळेल की ती काही मोडकळीस आलेली नाही, पुणे महानगरपालिकेकडून कुठलीही नोटीस इथल्या बांधकामाला आलेली नाही. मग हे १५ कोटी रुपये उभे करणं सहज शक्य होतं. त्यासाठी २३० कोटी रुपयांना संपूर्ण जमीन विकून परत बिल्डरकडून मंदिर आणि वसतिगृह भाड्यानं घेणं, कसं योग्य आहे?”
याव्यतिरिक्त वसतिगृह जरी जैनधर्मीय विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलं, तरी ते पूर्णपणे मोफत नव्हतं. त्यामुळं त्यातूनही ट्रस्टला आर्थिक फायदा होतंच होता, असं पांडे सांगतात.
'पण आता या वसतिगृहाची मालकी विकासकांच्या हातात गेल्यानंतर तिथलं शुल्क किती वाढेल आणि तिथं जैन मुलांना प्राधान्य मिळेल का हे माहित नाही,' अशी शंका शनिवारी जैन मंदिरात झालेल्या बैठकीत जमलेल्या अनेक जैन नागरिकांनी व्यक्त केली.
आंदोलनामागे व्यक्त झालेली एक भीती अशीही होती की गोखले बिल्डर्सनी बांधलेल्या वसतिगृहात जैनधर्मियांबरोबरच इतर जात-धर्मांचे विद्यार्थीदेखील प्रवेश घेतील. “इतर जात-धर्मियांशी आम्हाला काही समस्या नाही. पण आम्ही अल्पसंख्यांक आहोत. त्यामुळं हे वसतिगृह फक्त जैन धर्मियांसाठीच असावं, अशी आमची मागणी आहे,” जमलेल्या आंदोलकांपैकी काही जण म्हणाले.
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेल्या अनेक जैन विद्यार्थ्यांना ही जागा नसती तर फुटपाथ हा एकच पर्याय राहिला असता. सर्वच जैन काही श्रीमंत नसतात. मी तुम्हाला गरीब, झोपडपट्टीत राहणारी अनेक जैन कुटुंबं दाखवू शकतो. जर आर्थिक अडचण असेल तर आम्ही पुढाकार घेऊन भीक मागायला तयार आहोत, पण ही जागा विद्यार्थ्यांसाठी अशीच राहिली पाहिजे,” स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जमलेल्या नागरिकांशी आणि बैठकीला उपस्थित राहिलेले एक विश्वस्त, चकोर गांधी, यांना संबोधून म्हणाले.
जमलेल्या जैन समूहातील नागरिकांना संबोधित करताना विश्वस्त चकोर गांधी.
गांधी यांनीदेखील जमलेल्या नागरिकांशी बोलत त्यांना या सगळ्याबाबत स्पष्टीकरण देत ६४ खोल्यांचं २००-२५० विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह बिल्डरकडून बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं.
“पण मग जवळपास दीड लाख चौरस फोटांमधील फक्त १०,००० चौरस फूट जागा हॉस्टेलसाठी का? वसतिगृह म्हणजे फक्त राहण्याच्या खोल्यांपुरतं मर्यादित नसतं. त्याच्या आवारात विद्यार्थी अनेक उपक्रम करतात, खेळतात. छोट्याशा जागेत वसतिगृह बांधून सभोवतालची जागा बिल्डरनं गिळंकृत केली, तर विद्यार्थ्यांना मर्यादित जागेतच वावरता येईल,” जागेचा विक्री करार रद्द करण्याच्या मागणीसाठी काम करणारे अण्णा पाटील म्हणाले.
एचएनडी जैन बोर्डिंगची इमारत.
जागेच्या विक्री करारात मंदिराबद्दल तसंच मंदिराकडं येणाऱ्या रस्त्याबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्यानं लोकांनी मंदिर पाडलं जाण्याची भीती व्यक्त केली. तर ही फक्त तांत्रिक त्रुटी असल्याचं गांधी म्हणाले.
“जर मंदिर पाडलं जाईल अशी शंका आली, तर मी स्वतः त्याच्या विरोधात उभा राहीन. मंदिराचा उल्लेख करारात नसल्याचं लक्षात येताच मी बिल्डरांना गाठून याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांनी मला महानगरपालिकेच्या काही परवान्यांमुळं तो उल्लेख नसल्याचं सांगितलं. पण वर्किंग प्लॅनमध्ये (नियोजन आराखड्यात) मात्र मंदिर असल्याचं त्यांनी मला सांगितलं. दुसरं म्हणजे मंदिरासाठीच्या रस्त्याबद्दलही आधी आमचं बोलणं झालं होतं, पण त्यांनी करारात फक्त एका १५ फुटाच्या मार्गाचा उल्लेख केला आहे. आम्ही मात्र मंदिरासाठी वेगळ्या स्वतंत्र रस्त्याची मागणी करणार आहोत,” गांधी म्हणाले.
मात्र वर्किंग प्लॅनवर अवलंबून राहणं धोक्याचं असून विश्वस्तांनी विक्री करारावर सही करण्यापूर्वीच हे सगळं वाचून त्यानुसार नियोजन का केलं नाही, असा प्रश्न अनेक नागरिकांनी विचारला. मुंबईच्या विलेपार्लेमधलं जैन मंदिरदेखील अशाच तांत्रिक कारणांमुळं पाडलं गेल्याचं लोकांनी नमूद केलं.
पांडेदेखील या जागेच्या विक्रीत अनेक संशयास्पद बाबी आढळल्याचं सांगतात.
“धर्मादाय आयुक्त अशा प्रकारच्या जागेच्या विक्रीसाठी नुसता अर्ज घ्यायलाही महिने लावतात. तिथं वसतिगृहाची इमारत धोकादायक आहे अशी तक्रार करताच या जागेच्या विक्रीची परवानगी मात्र आयुक्तांनी तातडीनं दिली, त्याआधी महानगरपालिकेच्या काही नोटीशी आल्या आहेत की नाही, हेदेखील तपासलं नाही. दुसरं म्हणजे जागेची विक्री करण्यासाठी विश्वस्तांनी जी कन्सल्टन्सी (सल्लागार संस्था) नेमली, ती गोखले बिल्डर्सशी संबंधित आहे, त्यांच्यासोबत अनेक प्रकल्पांवर काम करणारी होती. हा एक सार्वजनिक ट्रस्ट आहे, अशा जागेची विक्री करताना सार्वजनिक लिलाव करावा लागतो. पण तसं न करता विश्वस्तांनी ही जागा परस्पर विकली, हे चूक आहे,” पांडे सांगतात.
मॉडेल कॉलनीतील गोखले बिल्डरना विकलेली जैन वसतिगृहाची जमीन.
गांधी यांनी मंदिर आणि वसतिगृहाची मालकी आपल्याकडे घेऊ असं म्हणत लोकांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला. “या विक्रीतून मिळालेले हे २३० कोटी आहेत, ते आमच्याकडे न येत पूर्णपणे ट्रस्टच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत. त्या पैशांचं काय करायचं हे आपण सगळे एकत्र बसून ठरवूया,” गांधी जमल्या नागरिकांना म्हणाले.
मात्र आम्हाला त्यातील एकही पैसा नको, तुम्ही पैसे परत घेऊन आपली जागा परत घ्या, असं लोकांनी त्यांना सुनावलं.
“आम्ही एक इंच जागासुद्धा बिल्डरला देणार नाही, तुम्ही करार रद्द करा,” नागरिक म्हणाले.
पुण्यातील हळू हळू दुर्मिळ होत जाणाऱ्या मोकळ्या जागांपैकी एक एचएनडी जैन बोर्डिंगची जागा मानली जाते. “या आवारात जवळपास ३५० झाडं आहेत. त्या झाडांवर वेगवेगळे पक्षी राहतात. आपण कायम जीवदयेबद्दल बोलत असतो, मग या झाडांचं आणि या पक्षांचं काय? ही झाडं सेठ वालचंद दोशी यांनी लावली होती, हे वसतिगृह त्यांनी बांधलं. आपलं काम फक्त त्याचं नियोजन करणं आहे,” पांडे म्हणतात.
आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी खासदार राजू शेट्टी.
शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वंशजांनी रयत [रयत शैक्षिक संस्था] आमची आहे, असं म्हटलं असतं तर चालेल का? उद्या माझ्या मुलं स्वाभिमानी पक्ष माझा आहे, असं म्हटलं तर चालेल का? विचारांना मालकी नसते, स्वामित्व नसतं. इथले विश्वस्त हे फक्त इथले क्षेत्रपाल आहेत, मालक नाही. त्यांनी तीच भूमिका करावी, मालकी हक्क सांगू नये, ही माझी विनंती आहे. गरीब, वंचित, शोषित विद्यार्थ्याला इथं राहायची संधी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.”
त्याचबरोबर “जागा विकण्यासाठी विश्वस्तांवर कोणी दबाव टाकत असेल तर त्यांनी तसं सांगावं, त्यांना लोळवण्याची ताकत आमच्यात आहे. कारण आमची बाजू सत्याची आहे,” असंही शेट्टी म्हणाले.
पाटील म्हणतात, “हा करार रद्द झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यासाठी जे करणं गरजेचं आहे, ते आम्ही करू.”
येत्या २ ऑक्टोबरला वसतिगृहाबाहेर एकदिवसीय उपोषण करणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं तसंच अल्पसंख्याक आयुक्त, सेबी, अशा प्रत्येक न्यायिक मंचाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले.