India

पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात आरोग्य सुविधांचा प्रश्न बिकट

१०८ रुग्णवाहिका, नवीन रुग्णालय, अशा अनेक मागण्यांसाठी किसान सभेचं पुण्यात आंदोलन.

Credit : इंडी जर्नल

 

पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागांतील दुर्लक्षित अपुऱ्या आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यात याव्या, या मागणीसाठी सोमवारी अखिल भारतीय किसान सभा आणि आदिवासी नागरिकांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं. जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तिन्ही तालुक्यांतील आदिवासींसाठी किसान सभेनं ग्रामीण रुग्णालय सुरु होण्यात होणारी दिरंगाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, १०८ रुग्णवाहिकांचा आभाव, अशा अनेक कारणांसाठी हे आंदोलन पुकारलं होतं.  उपसंचालकांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असं लेखी आश्वासन दिलं.

“आंबेगाव तालुक्यातील तळेघरमध्ये ग्रामीण रूग्णालयासाठी मान्यता मिळाली आणि साधारणपणे ६ वर्षांपूर्वीच त्याची इमारतदेखील बांधून झाली. मात्र आजपर्यंत ते रुग्णालय सुरु करण्यात आलेलं नाही, ज्यामुळं स्थानिकांना उपचारांसाठी घोडेगावच्या रुग्णालयात जाण्यावाचून पर्याय राहत नाही. आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी, भीमाशंकरच्या आजूबाजूतील भागांतील आदिवासींसाठी हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे रुग्णालय तातडीनं सुरु करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे,” अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल वाघमारे सांगतात.

तळेघरचं रुग्णालय सुरु न झाल्यामुळं तालुक्यातील सर्व रुग्णांना घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावं लागतं. अनेक आदिवासींना यामुळं रुग्णांना घेऊन कमीत कमी एक ते दीड तास प्रवास करावा लागतो.

“गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वी बाळंतपणं व्हायची. मात्र आता तिथं पुरेशा सुविधा नसल्यानं बाळंतपणं किंवा इतर गंभीर उपचार होत नाहीत. त्यामुळं बहुतांश रुग्णांना घोडेगावलाच घेऊन जावं लागतं. जायला वेळ तर लागतोच, रस्तादेखील अनेक भागांत खराब आहे. नवीन दवाखाना सुरु झाला तर आम्हाला जवळच्या जवळ उपचार उपलब्ध होतील,” तळेघरच्या रहिवासी कविता केंगले सांगतात.

 

किसान सभेचे पदाधिकारी आणि आंदोलक आरोग्य उपसंचालकांना निवेदन देताना.

 

अनेकदा घोडेगावला आल्यानंतरही रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर त्यांना पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन यावं लागतं.

“अनेकदा गरोदर महिलांना घोडेगावला नेल्यानंतर समजतं की बाळाची नाळ अडकलेली आहे. मग ते बाळंतपण तिथं करून घेत नाही, आम्हाला पुण्याला पाठवतात. पुण्यात आल्यावर राहण्याची सोया, खाणं-पिणं, या सगळ्याच अडचणी समोर उभ्या राहतात. म्हणूनच आमच्या तालुक्यात, आमच्या भागात सर्व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात, हा आमचा आग्रह आहे,” केंगले पुढं म्हणतात.

मात्र रुग्णांची ने-आण करण्यासाठी आंबेगाव तालुक्यात निदान सरकारी १०८ रुग्णवाहिका तरी उपलब्ध आहेत. खेड आणि जुन्नर तालुक्यात १०८ रुग्णवाहिकादेखील उपलब्ध नसल्यानं रुग्णांना इस्पितळात पोहोचवायचं तरी कसं, हा मोठा प्रश्न तिथल्या आदिवासींसमोर आहे.

“ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी किंवा पुढं पुण्याला आणण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णवाहिका मागवली की त्यांना एका फेरीचे ५,००० रुपये द्यावे लागतात. आमच्या भागात बहुतांश लोकं गरीब आहेत, त्यांना हा खर्च परवडत नाही. अनेक जणांनी रुग्णवाहिकेची पैसे भरण्यापेक्षा उपचारच न घेण्याचा निर्णय घेतल्याची उदाहरणंसुद्धा आमच्या भागात आहेत. अनेकांचा यामुळं मृत्यू झाला आहे,” खेड तालुक्यातील नायफड गावचे रहिवासी मारुती शिंदे सांगतात.

आणि खासगी गाडीदेखील बऱ्याचदा लगेच उपलब्ध होत नाही.

“मुळात रुग्णवाहिकांची संख्याच कमी आहे. अनेकदा खासगी गाडी जरी मागवली, तरी ती यायला ४-४ तास लागतात. बऱ्याचदा चालक नुकताच पुण्याची फेरी करून आलेला असतो, मग तो लगेच पुन्हा गाडी घेऊन येऊ शकत नाही. यामुळंदेखील रुग्णालयात पोहोचायला उशीर होतो आणि रुग्ण दगावतात,” शिंदे पुढं सांगतात.

यामुळंच या भागात सरकारी १०८ रुग्णवाहिकांचा गरज असल्याचं ते सांगतात. गंभीर आजारांसोबतच सर्पदंशासारख्या घटनांनंतरही उपचार मिळणं कठीण होत असल्याचं खेड तालुक्याच्या डेणे गावचे रहिवासी सुरेश कशाळे सांगतात.

“काही काळापूर्वी आमच्या गावात एका महिलेला साप चावला. तिला डेणेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो, मात्र तिथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळं तिला घोडेगावला घेऊन जावं लागलं. पण गाडी नसल्यामुळं तिथं जायला उशीर झाला आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला,” कशाळे म्हणाले.

सर्पदंशावरील औषधं जीवनावश्यक औषधांमध्ये मोडतात आणि सर्पदंशाची अधिक शक्यता असणाऱ्या भागांमध्ये ती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उलब्ध असणं आवश्यक आहे. मात्र तळघरच्या कविता केंगलेदेखील त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर पूर्ण उपचार होत नसून प्राथमिक उपचार करून रुग्णांना घोडेगावला पाठवण्यात येत असल्याचं सांगतात.

 

 

घोडेगाव ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील मोठ्या रुग्णालयांच्या मध्ये या भागात आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्येही ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र रिक्त पदं आणि पुरेशा सेवा आणि औषधांचा अभाव यामुळं रुग्णांना पुण्यापर्यंत आणण्यावाचून पर्याय राहत नसल्याचं वाघमारे सांगतात.

“मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात अनेक डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. साधा भूल देणारा तज्ञ डॉक्टर तिथं उपलब्ध नाही. तिथं जर डॉक्टर उपलब्ध झाले, तर प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्याभागातील नागरिकांना पुण्याला यावं लागणार नाही. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, या सर्व भागांतील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल. म्हणूनच ही रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावी, अशी आमची मागणी आहे,” वाघमारे म्हणाले.

याचबरोबर घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयात तीन गरोदर माता दगावल्या आहेत. त्याबद्दल तिथल्या डॉ. जयेश कुमार बिरारी,वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून रुग्णसेवेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत मुर्त्यूप्रकरणी त्यांच्यावर दोषारोप सिद्ध होवूनही त्यांच्यावर अद्याप कारवाई करावी, अशी मागणीदेखील किसान सभेने केली आहे.

याशिवाय जन आरोग्य समित्या, रुग्ण कल्याण समित्या सक्रिय करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष प्रयत्न व्हावेत व रुग्णसंवाद बैठका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या स्तरावर वर्षातून किमान तीन वेळा तरी व्हाव्या, ही मागणीदेखील उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांविषयी विचारणा केली असता आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की या सर्व मागण्या ज्या-ज्या विभागामार्फत पूर्ण केल्या जाऊ शकतात त्या सर्व विभागांना उपसंचालकांकडून पत्रं पाठवण्यात येणार आहे आणि त्यांना सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. साधारण २ दिवसांत त्यांच्यावर कारवाई होईल, असं ते म्हणाले.