India

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी

वसतिगृहाच्या शुल्कवाढीबाबत मात्र अजून निर्णय झाला नाही.

Credit : इंडी जर्नल

गेले तीन दिवस भर पावसात शुल्कवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आज दिलासा मिळाला. विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत प्रस्तावित शुल्कवाढ रद्द केली आहे. त्याचबरोबर पुढील मागण्यांच्या बाबतीत काम चालू असून लवकरच त्यावर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलं आहे.

"विद्यार्थ्यांच्या काही साहजिक असणाऱ्या मागण्या होत्या. त्यावर आमचं काम चालूच आहे. शुल्काच्या संदर्भात परिपत्रकही काढलेलं आहे. आम्ही आता ठरवलंय की यापुढच्या मागण्यांसाठी १० दिवसांत आम्ही त्यांना भेटू, आणि त्या-त्या वेळेला चर्चा करून मार्ग काढू," सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे म्हणाले.

विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी पत्रात दर दहा दिवसांनी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेऊन विविध मागण्यांची सोडवणूक केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. 

पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठानं जाहीर केलेल्या तीव्र शुल्कवाढीविरोधात आंदोलन पुकारलं होतं. पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या शुल्कासोबतच परीक्षा शुल्क, वसतिगृहाचं शुल्क आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली होती. "याबरोबरच प्रवेश शुल्कातही वाढ करण्यात आली होती, ज्याबाबत इतकी चर्चा झाली नाही. पीएचडीचं प्रवेश शुल्क दुप्पट, पदव्युत्तर पदवीचं तीनपट पेक्षा जास्त, परीक्षा शुल्क पाचपट तर वसतिगृह शुल्क दुप्पट करण्यात आलं आहे," आंदोलनकर्ते विद्यार्थी कमलाकर शेटे म्हणाले

यातील परीक्षा शुल्क व वसतिगृहाचं शुल्क वगळता बाकी सर्व शुल्कवाढ रद्द करण्यात आली आहे. "नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तर शुल्कवाढ लागू होणारच नाहीये. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी वाढवलेलं शुल्क भरलं होतं, त्यांनाही परतावा मिळणार आहे," शेटे पुढं म्हणाले. 

वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या प्रश्नावर चर्चा अद्यापही चालू आहेत. "वसतिगृहाच्या सल्लागार समितीनं खर्चावर आधारित शुल्कवाढ ठरवली आहे. सत्राला ३००० रुपये इतकं शुल्क वाढवण्यात आलं आहे, जे की महिन्याला सदारं ५०० रुपये एवढं येतं. डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांना त्यात स्वतंत्र खोली दिली जाते. पुण्यात एवढ्या कमी किंमतीत कॉट-बेसिसवरही जागा मिळवणं शक्य नाही. हे शुल्क वसतिगृहात सुविधा पुरवण्यासाठी पुरेसं नाहीये, त्यासाठी अनुदानही मिळत नाही. तरी आम्ही त्यावर विचार करतोय. विद्यार्थी आणि सल्लागार समितीची बैठक लावून यावर उपाय शोधायचा प्रयत्न करू," सोनावणे म्हणाले.

शुल्कवाढीबरोबरच विद्यार्थी सेवा केंद्र सुरु करण्याची मागणीदेखील विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर ठेवली होती. "विद्यार्थी सेवा केंद्र लगेच सुरु करू असं आश्वासन आम्हाला आज विद्यापीठानं दिलं. येत्या १० दिवसांनी होणाऱ्या बैठकीत आम्ही त्याचा पाठपुरावा करूच," विद्यार्थी सोमनाथ निर्मल म्हणाले.

कोव्हीड महामारीनंतर ऑफलाईन वर्ग सुरु झाल्यावर विद्यार्थी आले तरी विद्यापीठातील अनिकेत कँटीन तसंच इंटरनेट कॅफे सुरु करण्यात आले नव्हते, ज्यामुळं विद्यार्थ्यांना अडचण होत होती. "याही मागण्यांवर काम सुरु झालं असल्याचं आज आम्हाला विद्यापीठानं सांगितलं आहे. कँटीन सुरु करण्यासाठी निविदा मागवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे," शेटे म्हणाले.