Quick Reads
महासागरातल्या देवमाशाच्या चरित्राची कहाणी
बाबासाहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या समकालीन सहृदय माणसानं त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली ही दाद आठवणं आनंददायी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय सार्वजनिक क्षितिजावरच्या उदयामुळे अनेक दिशा उजळून गेल्या. लोकगीतांमधून आणि चळवळीच्या गाण्यांमधून बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव तर दिसतोच. पण शहरी, मध्यमवर्गीय प्रेक्षकांसमोर त्यांच्या कार्याचं असाधारण महत्त्व सांगणं हे अतिशय अवघड काम होतं. प्रबोधनकार ठाकरे यांनीच हे शिवधनुष्य पेललं.
याला निमित्त झालं ते १९३० मध्ये कर्णाच्या जीवनावर शि. म. परांजपे यांनी लिहिलेल्या ‘पहिला पांडव’ नावाच्या नाटकाचं. प्रबोधनकारांनी हे नाटक पाहिलं. महाभारताच्या चिकित्सक वाचनातून स्पष्ट होणारी कर्णाची तेजस्वी व्यक्तिरेखा पहायला मिळेल या आशेनं नाटक पहायला गेलेल्या प्रबोधनकारांनाया नाटकातल्या कर्णाची हताश व्यक्तिरेखा पाहून संताप आला. ते नोंदवतात,
“रडका भेदरट कर्ण कल्पनेच्या कुंचल्याने रंगवण्यात, लेखकाला कोणत्या चळवळीवर काळ्या शाईचे शिंतोडे उडवायचे होते हे महाराष्ट्र नाटक मंडळीच्या धांदरट बावळट चालकांना जरी समजले नाही, तरी जाणत्यांनी त्या टिंगलीचा वा बदनामीचा ठाव तेव्हाच घेतला होता.”
कर्णाच्या आणि एकूणच समतेसाठीच्या संघर्षाचं यथायोग्य चित्रण व्हावं यासाठी त्यांनी कर्णाला नायकत्व देणारं स्वतंत्र नाटक लिहिलं. त्याचं नाव ‘टाकलेलं पोर’. १९३३ मध्ये याचा पहिला प्रयोग झाला. हे नाटक कुमारी मातांच्या प्रश्नाकडे तर लक्ष वेधत होतंच. शिवाय १९३०च्या दशकात कॉंग्रेसच्या सर्वसमावेशकतेच्या दाव्यांना प्रश्नांकित करणारं डॉ. आंबेडकरांच्या रूपातलं जे आव्हान उभं ठाकलं, त्याचंही सूचन या नाटकात अनेक ठिकाणी केलेलं आहे.डॉ. आंबेडकरांना कर्णाच्या रूपात चित्रित करून जन्माधिष्ठित श्रेष्ठत्वाच्या कल्पनांवर या नाटकानं जोरदार हल्ला चढवला.
समतेच्या संघर्षाची धार कमी करून त्याला जातिश्रेष्ठत्वाच्या साच्यात बसवण्याच्या प्रयत्नांचा फोलपणा या नाटकानं उघड केला.यासंदर्भात प्रबोधनकारांनी कर्णाच्या तोंडी एक संवादही लिहिला होता, जो नाटकात समाविष्ट करता आला नाही, तरीही त्यांनी प्रस्तावनेत नोंदवून ठेवला आहे.
कर्ण – मला पहिला पांडव ठरविण्याचा उपद्व्याप करणारे काही पंडित माझ्या बीजशुद्धीचं संशोधन करण्याच्या दिमाखानं, मी माझ्या हीन कुलाबद्दल फार खंती करीत असतो, लाजेनं व्याकूळ होत असतो, मनातल्या मनात झुरत असतो, रात्रन् दिवस एकांती रडत असतो, अशा बदनामीची नाटकं रंगवण्यात दंग असल्याचं माझ्या कानी आलं आहे. पांडवपक्षपाती भाटांचा हा कट मी ओळखून आहे. असल्या मतिमंदांना या कर्णाच्या चारित्र्याचा नि आत्मविश्वासाच्या कमावणीचा रतिमात्र ठाव उमगलेला नाही, इतकंच मानून मी तिकडं दुर्लक्ष करीत असतो. डबक्यातल्या बेडकांनी महासागरातल्या देवमाशाच्या चरित्राची कहाणी सांगण्याचं धाडस करू नये आणि परोपजीवी बांडगुळांनी स्वयंप्रभावी पुरुषाच्या पौरुषत्वाचा ठाव घेण्याचा दिमाख मिरवू नये.
प्रबोधनकारांना आपल्या प्रेक्षकवर्गाची नस नीट माहीत होती. उच्च मानलेल्या समाजांमधली जरठ-बालाविवाहाची रूढी कायद्याने बंद होऊन काही दशकं लोटली. त्यानंतरही संगीत शारदा सारखं नाटक शहरी मध्यमवर्गीय आणि उच्च मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांनी सुधारकी विचारांचं म्हणून उचलून धरलं होतं. अशा काळात जातिगत विषमतेचा मुद्दा प्राधान्यानं अधोरेखित केला तर प्रेक्षक या नाटकाकडे पाठ फिरवतील हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे प्रथमदर्शनी हे नाटक बालहत्येसारख्या प्रश्नावर आधारित आहे असं वाटावं अशी रचना प्रबोधनकारांनी केली होती. महाभारताचा परिचित कथाभाग वापरल्याने नाटकाच्या प्रेक्षकांना शाकुंतलादि नाटकांच्या परंपरेतलं हे नाटक असेल असं वाटणं साहजिक होतं. पण प्रबोधनकारांच्या प्रस्तावनेत त्यांचा प्राधान्यक्रम काय होता हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“टाकलेलं पोर या नाटकात अपत्यहत्येचा प्रश्न तर प्रधान आहेच आहे. पण त्याहिपेक्षा, मागासलेल्या नि पददलित समाजातील स्वाभिमानी उद्धारकांना आत्मोन्नतीचे शिखर गाठण्यासाठी कसकसल्या सामाजिक विकल्पांना नि अडचणींना तोंड देऊन आपला मार्ग आक्रमावा लागतो, याचे दृश्य रंगवण्याचा कर्णाच्या मूळ कथेनुसार मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”
ब्राह्मण्यवादी व्यवस्थेचे चटके बसल्यामुळे अनेक लोक आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. प्रबोधनकारांचा मोठेपणा असा, की ते अस्पृश्य जातीत जन्माला आलेले नसतांनाही त्यांनी जातिगत भेदभावाविरुद्ध प्रबोधनाचा रंगमंचीय मार्गही अवलंबला. त्यातही दयाबुद्धीची, उद्धाराची भूमिका न घेता स्वाभिमानाचा मार्ग निवडणाऱ्या नेत्याचं रास्त कौतुक त्यांनी त्या काळात केलं.
कर्ण : भटजीबुवा, या अवताराच्या कल्पना भोळ्याभाबड्या नामर्द निराशावाद्यांना शिकवा. त्यांना त्या लवकर पचतील.
वासुदेव: मदान्धा, तुझ्या गर्वाची परिसीमा झाली.
कर्ण : भटजीबुवा, वरच्यांनी तेजोभंगाच्या लाथा मार मारून खाली दडपलेल्या सूतादि शूद्रांना कसला आला आहे गर्व? आत्मविश्वासाच्या मळ्यातच गर्वाचा दवणा दरवळतो. मी आपल्या गर्वाची फेक गगनाला भिडे इतकी उंच भिरकावीन, तेव्हा माझ्या गरीब नि कष्टाळू जातभाईंना थोडासा धीर देऊन, ते आपल्या माणुसकीच्या हक्कासाठी धडपडू लागतील. आजपर्यंत गर्वाचा सारा खजिना तुम्ही वरिष्ठांनी वापरला. आता थोडासा तरी आमच्या हाती लागू द्या की!
बाबासाहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या समकालीन सहृदय माणसानं त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली ही दाद आठवणं आनंददायी आहे.