Opinion
PETA विरुद्ध धार्मिक कट्टरपंथी यांच्या वादानं काय साधलं गेलं?
कोणत्याही समस्येची नाळ धर्म नामक गोष्टीला जोडल्याशिवाय आमचा डिस्कोर्स पुढे जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोशल मीडिया एक अलौकिक व्यासपीठ आहे. एकीकडे इथे डिस्कोर्सचं लोकशाहीकरण होते तर दुसरीकडे अतिशय क्लिष्ट आणि बहुपदरी विषयांची चर्चा उथळपणे केली जाण्याचा धोका असतो. ज्या विषयाच्या अभ्यासासाठी तज्ञ अनेक वर्ष घालवतात, त्या विषयाची ट्विटरवर २८० शब्दांत चर्चा कशी काय होऊ शकते? प्रस्तुत विषयाच्या अभ्यासाला आणि आकलनाला ह्याचा तोटाच होतो. Oversimplification आणि विषय सनसनाटी बनवण्याच्या नादात भलतेच काहीतरी होऊन बसते.
गेल्या आठवडाभर रंगलेल्या ‘PETA इंडिया विरुद्ध हिंदूत्ववादी ’ भांडणाच्या पार्श्वभूमीवर वरील मुद्दा पटायला काही हरकत नसावी. PETA इंडियालाही बहुदा आत्तापर्यंत ह्याची खात्री पटली असावी, अशी आशा करायला हरकत नाही.
नक्की काय घडले?
रक्षाबंधनावरून PETA ने केलेल्या ट्विट वरून ह्या वादाची सुरवात झाली. १६ जुलैच्या ह्या ट्विटचा संदर्भ होता, रक्षाबंधन आणि त्यानिमित्ताने कातडीसाठी गायिंवर होणारे अत्याचार. गुजरातेतल्या काही शहरांत टांगलेल्या ह्या फलकांवरून थोड्याच वेळात तुंबळ युद्ध पेटले, आणि सोशल मीडियावरील नामांकित हिंदुत्ववादी मंडळींनी मोठ्या हिरीरीने ह्यात भाग घेतला. ट्रोलिंगला सुरुवात झाली मात्र, मग दोन्ही बाजूंकडून असभ्य भाषा, धमकावणे, गुंडगिरी इ. नेहमीचे प्रकार सुरु झाले. त्यातच PETA इंडियाच्या अधिकृत हॅन्डल वरूनही थोड्याफार प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे तर हिंदुत्ववादी मंडळींना जास्तच चेव चढला. आणि काही करून PETA ला नाक घासत माफी मागायला लावायची ह्याची अहमहमिका लागली. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या येथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या. भरपूर ट्रोलिंग करून झाले, आणि एकदाचा रविवारचा मुहूर्त साधत वाद थंड पडला.
ज्या हिंदुत्ववादी आघाडीला ह्या पेटलेल्या निखाऱ्यांवर स्वतःचे कबाब भाजून घ्यायचे होते, ते त्यांनी घेतलेच. मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना पद्धतशीर शिव्या घालून झाल्या; हिंदू, जैन, बौद्ध, आणि शीख हेच धर्म कसे पर्यावरणप्रेमी आहेत, आणि आम्हाला तुम्ही प्राणीप्रेम शिकवायची हिम्मतच कशी करू शकता हे विचारून झालं; त्यातच पर्यावरणप्रेमी संघटनांना कायमच हिंदू सणच कसे काय दिसतात, जरा बाकीच्यांच्या सणांवर बोलण्याची हिम्मत करून बघा, असे खुले आव्हान देऊन झाले; PETA च्या सर्व सेलिब्रिटींच्या खाद्य इतिहासाचे उत्खनन करून, ते कसे दुटप्पी आहेत हेही सिद्ध करून झाले. हे असे PETA इंडिया आणि तद्नुषंगाने सर्व पर्यावरणवादी संघटनांचे वाभाडे काढून झाल्यावरच वादाची भट्टी थंड पडली.
The truth is, most people do not think about what shoes, bags, & belts are made of when they go shopping. However, when it was raised that the ad confused some, we changed it: https://t.co/i6MzFO9wB5. @ShefVaidya (9/28)
— PETA India (@PetaIndia) July 24, 2020
वादातून काय निष्पन्न झाले?
तसे म्हणता काहीच निष्पन्न झाले नाही. #bakralivesmatter सारखे ट्रेंड्स व्हायरल झाले, पण on-ground impact कितीसा झाला, ह्याचा काहीच पत्ता नाही. काही न्यूज चॅनेलना दोन दिवस चर्चा ठेवून, आयता TRP मिळाला. युट्युबवर कडव्या हिंदू चॅनेल्सनी संबंधितांच्या मुलाखती घेतल्या. त्या काही हजार लोकांनी बघितल्या, आणि दोन घटकांची स्वतःची करमणूक करून घेऊन विषय संपवून टाकला.
एक गोष्ट मात्र निश्चित झाली ती ही की, भारतीय जनमानसाच्या समोर मानवेतर सृष्टीचे कोणते रूप उभे आहे, ह्याचा अंदाज आला. आणि ते रूप काही लोभस नाही, तर श्रद्धा-अंधश्रद्धा, उपभोग आणि विरक्ती अश्या धेडगुजरी पण धोकादायक मिश्रणातून बनलेले आहे हे ही कळून चुकले. धार्मिक अस्मिता आता निसर्ग/माणूस ह्या खऱ्या अर्थाने सेक्युलर नात्यामध्ये कश्या घुसखोरी करत आहेत, हे पुढे आले.
ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
कोणाचे चुक आणि बरोबर हा प्रश्न कोंबडी आधी की अंडे प्रश्नाइतकाच निरर्थक आहे. कारण खऱ्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजत पडलेले आहे, ते म्हणजे प्राण्यांना माणसांकडून मिळणारी वागणूक. एका आठवड्याच्या ह्या सामन्यातून PETA नी काय साधले हाही प्रश्न अनुत्तरित आहे. दोघांच्या ह्या अनाठायी भांडणात मात्र ज्यांच्या नावाने ही लढाई लढली गेली त्या प्राण्यांचा कितीसा लाभ झाला? देशातील वंचित, बहुजन, जे वातावरण बदलाचे पहिले बळी ठरणार आहेत, त्यांच्या उन्नतीला काय गती मिळाली? UAPA लावल्या गेलेल्या आपल्याच देशातील जंगलांसाठी लढणाऱ्या एका संस्थेची आणि अजूनही अश्या बऱ्याच संस्थांची व्यथा किती प्रमाणात नाहीशी झाली? ह्या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने कोणीच देत नाही.
कोविड-१९ च्या निमित्ताने समाजजीवनाची जी काही चिकित्सा झाली, त्यामध्ये माणसामाणसांमधील संबंधांची जशी चिकित्सा केली गेली, आणि केली जात आहे, त्याचबरोबर किंबहुना तितक्याच पोटतिडकीने माणूस निसर्ग ह्या नात्याचीही चर्चा होणे निकडीचे बनलेले आहे. PETA ला ही सुवर्णसंधी होती, ती त्यांनी हातची घालवली आहे, असेच आता म्हणावे लागेल. खरेतर, कोविडच्या आगमनापासूनच ही चर्चा होणे गरजेचे होते, ती तशी झाली नाही. पुढे केरळ मधील हत्तीणीच्या दुर्दैवी मृत्यूने अजून एक संधी देऊ केली होती, पण तिथेही हिंदू-मुस्लिमचा विषाणू घुसला, आणि चर्चेचा सर्व रोख भलतीकडेच वळला. तेव्हाही, आरोपप्रत्यारोपांचे अनेक खेळ खेळले गेले, भरपूर सहानुभूती, मदतीचा आणि गुन्हेगारांवर रोषाचा ओघ आला; सर्व कौतुकास्पद होते, फक्त शेवटी हाती काहीही आले नाही.
प्रत्येक समस्येकडे धर्माच्या चश्म्यातून बघून उत्तर मिळणार का?
इतिहास संशोधक रामचंद्र गुहा आपल्या 'How much should a person consume?' पुस्तकात chauvinism म्हणजेच अहंतांचे सुंदर विश्लेषण करतात, जे आत्ताच्या संदर्भातही लागू पडते. गुहा म्हणतात, पर्यावरणाच्या चळवळींना आणि विचारधारांना लागलेले सर्वात मोठे ग्रहण म्हणजे धार्मिक अहंता.
आम्हाला पाश्चिमात्त्य देशांनी पर्यावरण संवर्धनाचे कोणतेही धडे देण्याची गरज नाही, कारण आमच्या हिंदू/बौद्ध/जैन धर्माने आणि संस्कृतीने आम्हाला ही शिकवण आधीपासूनच दिली आहे. आमच्या धर्मग्रंथांत जीवहत्या कशी निषिद्ध मानली आहे; आमची तत्वज्ञाने कशी ‘सर्वांभूती परमेश्वर’ सारखे उदात्त विचार मांडतात; किंवा आमच्या सणांना कसा शास्त्रीय(?) आधार आहे; अश्या पद्धतीची विधाने, विशेषकरून भारताच्या संदर्भात, फायद्याची ठरण्याऐवजी बहुतेकवेळेस नुकसानच जास्ती करतात, आणि PETA किंवा केरळच्या हत्तीणीने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. गुहांच्याच शब्दात सांगायचे तर, " No culture has a monopoly on environmental consciousness, nor on environmental depletion either."
धर्माचे परिमाण एकेकट्या किंवा मानवी समूहाने गेल्या सुमारे १२,००० वर्षांपासून केलेल्या नैसर्गिक प्रक्रियांमधील हस्तक्षेपाला कसे काय लावू शकतो आपण? कारण माणसे शेतीच्या उदयापासूनच जंगले जाळत, तोडत आहेत; नकोशा प्राण्यांना मारून टाकत आहेत आणि काही निवडक जीवांना उपयुक्त पशु म्हणून वाढवत आहेत ते आजपर्यंत. ह्यातल्या प्रत्येक प्रक्रियेला धर्माच्या चौकटीत बसवणे शक्य आहे काय? मुळात, पर्यावरणीय विचारधारेच्या मूलतत्वांचा पुरातन धर्मग्रंथांत शोध घेणे आणि त्यातील काही भागाला आधुनिक काळातील मूल्ये लावणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच नाही काय?
गुहा असेही म्हणतात की, मानवी शिकारी टोळ्या पैकी काही समुदाय अश्या मताचे होते, की एकाच वेळेस सर्व पशु मारून संपवणे योग्य नाही, तर पुढच्या वेळेस साठी थोड्यांना तरी जगू दिले पाहिजे. आणि ह्यांतून तथाकथित धार्मिक पर्यावरणवादाचा उगम झालेला आहे. हा मूल्यविवेक न सांभाळल्याचे दुष्परिणाम मागच्या आठवड्यात असे चव्हाट्यावर आले.
मानवेतर जीवसृष्टी एकतर आमची वनांतील वाघ, सिंह ,हत्ती ह्यांसारख्या ठळक जीवांवर येऊन थांबते, नाहीतर मग आमच्या धार्मिक श्रद्धांच्या चश्म्यातून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. मग आम्हाला पशुबळी समर्थनीय वाटतात, मंदिरातील हत्ती धार्मिक अस्मितेचा विषय होतो, आणि जालिकट्टूवरून अक्खा देशही पेटवायला आम्ही मागे पुढे बघू शकत नाही. पण हेच ग्रेटा थूनबर्ग च्या fridays for future वर सरकारने UAPA जरी लावला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण तो धार्मिक विषय नसतो. थोडक्यात जिथे हिंदू खतरें मध्ये नाही, असे सामाजिक आयुष्यातले कोणतेच विषय चर्चेलायक नसतात.
बहुतेकांना आठवत असेल तर, कोविडच्याही चर्चेमध्ये धर्म आणि खाद्यसंस्कृतीचा मुद्दा चांगलाच तेजीत होता. इथपर्यंत पब्लिक डोमेन मधल्या चर्चेची मजल गेली होती, की चिनी लोकांच्या खाण्याच्या तथाकथित भयानक सवयींना कोविडशी जुळवलं गेले. पुरावे देण्याच्या फ़ंदात कोणी कधीच पडले नाही. तेथेही, हिंदू धर्मातील अहिंसेचा मुद्दा जोरात होता.
म्हणजेच आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही समस्येची नाळ धर्म नामक गोष्टीला जोडल्याशिवाय आमचा डिस्कोर्स पुढे जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्यातून कोणत्याच धर्माचा भाग नसलेले मानवेतर जीवही वाचले नाहीत तर त्यात नवल काय!
पुढे काय?
PETA च्या नाटकाचा आता क्लायमॅक्स होऊन गेला, आणि सोशल मीडियातील जागृत हिंदुत्ववादींच्या पर्यावरण संवेदना थंड पडल्या. प्राणिहित आणि निसर्गसंवर्धनाची समस्या मात्र संपली नाही. सोशल मीडिया, डिस्कॉर्सेस पण कसे नियमित करतो, हे मात्र दिसून आले. खरेतर ईआयए-२०२० (Environmental Impact Assessment-2020) बद्दल सर्व देशभरातून जनक्षोभ उसळायला हवा होता, कारण इथे प्रश्न आपल्या सर्वांच्याच भविष्याचा आहे. पण तसे काहीही ना घडता, धार्मिक अहंतांनी पोसले गेलेल्या एका भांडणाचा साक्षीदार होण्याची आपल्यावर पाळी आली.
हरकत नाही, मानवेतर जीवांच्या संरक्षण, संवर्धनाला अश्याने थोडीफार चालना मिळणार असेल, तर हीसुध्दा गोष्ट स्वीकारार्ह आहे. पण तसे काही होऊ शकेल ही आशा फार धूसर आहे. धर्माच्यापुढे निसर्ग/माणूस संबंधांची चर्चा आतातरी जाणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.
संदर्भ: गुहा रामचंद्र. How much should a person consume: Environmentalism in India and the United States. २००६.
लेखक ट्युबिंगेन विद्यापिठात संशोधक आहेत.
लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत, त्यांच्याशी इंडी जर्नल सहमत असेलच असे नाही.