India

पाचगणी परिसरात अनेक दशकांपासून घोड्यांच्या विष्टेनं प्रदूषित पाण्याचं सेवन!

महाबळेश्वरमध्ये सध्या जवळपास १७० घोडे आहेत, ज्यातील बहुतांश वेण्णा तलावाजवळील पठारावर असतात.

Credit : इंडी जर्नल

 

महाबळेश्वर आणि पाचगणीतील लोकांना आणि पर्यटकांना गेली जवळपास पाच दशकं अतिसार, अन्नातून होणारी  विषबाधा आणि अशा अनेक आजारांमागचं अतिशय धक्कादायक कारण गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळचं प्रसिद्ध आकर्षण असलेले घोडेच या आजारांसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

“गेल्या चार ते पाच दशकांपासून महाबळेश्वर आणि पाचगणीत आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्येही अतिसार, ताप आणि इतर पोटाच्या विकारांचं प्रमाण खूप जास्त आहे. महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी आम्हाला यामागील कारण शोधून काढण्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी बोलावलं. महाबळेश्वर आणि पाचगणीतील पाण्याचे नमुने तपासून आणि आजारांचे प्रकार बघून दूषित पाणीच त्यामागचं कारण आहे हे आमच्या लक्षात आलं, आणि याचा सखोल अभ्यास करताना महाबळेश्वरमधील घोड्यांची विष्ठाच याला कारणीभूत असल्याचं या संशोधनातून आमच्यासमोर आलं,” मुख्य संशोधक डॉ. प्रीती मस्तकर सांगतात. वेण्णा तलाव महाबळेश्वर आणि पाचगणीसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. या तलावाचं पाणी पंप करून, त्यावर प्रक्रिया करून ते नळाद्वारे महाबळेश्वर आणि पाचगणीला पुरवलं जातं. मात्र या भागातील पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या या तलावाला लागूनच असलेलं पठार पर्यटकांना घोडेस्वारी करवून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे.

 

 

“या घोड्यांच्या विष्ठेवर प्रक्रिया करण्याची कोणतीही सुविधा महाबळेश्वरमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे ती सगळी विष्ठा वाहून खाली वेण्णा तलावात जाते. याव्यतिरिक्त संपूर्ण महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर घोड्यांची विष्ठा आढळते, जी पाईपलाईनच्या व्हॉल्व्हमधून पिण्याचं पाणी दूषित करते. पावसाच्या पाण्यातून वाहून ही विष्ठा जमिनीत झिरपून महाबळेश्वरमधील भुजलदेखील दूषित करते,” या संशोधनाचे सहायक संशोधक निखिल अटक सांगतात.

तळेगावमधील एका स्टड फार्मवर केलेल्या प्राथमिक अभ्यासात संशोधकांना प्रक्रिया न केलेली घोड्याची विष्ठा पिण्याचं पाणी दूषित करत असल्याचं आढळलं. यावर्षी मे महिन्यात मस्तकर, अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सुरज भोळे आणि विनीत दुपारे या गोखले इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या टीमनं महाबळेश्वरला भेट देऊन तिथून पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले. त्याचबरोबर त्यांनी तिथल्या सर्व रुग्णालयांमधून आणि छोट्या-मोठ्या दवाखान्यांमधून महाबळेश्वर आणि पाचगणीमधील आजारांविषयी माहितीदेखील संकलित केली.

“या माहितीनुसार या भागातील नागरिकांना तसंच भेट देणाऱ्या पर्यटकांना अतिसार, अन्नातून विषबाधा, तीव्र श्वसनाचे आजार, बुरशीजन्य संक्रमणांचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलं. रोटाव्हायरसची लस घेतलेली असूनही या भागातील अनेक मुलांमध्ये त्याची गंभीर लक्षणं आढळतात, ज्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. काही वर्षांपूर्वी इथं टायफॉईडचं प्रमाणदेखील जास्त होतं, मात्र आता ते कमी झालं आहे. मधुमेहासारख्या सहव्याधींमुळं प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या पाण्यामुळं गंभीर आजार होत असल्याचं आमच्या अमोर आलं,” मस्तकर म्हणाल्या.

इतक्या दशकांपासून होत असलेल्या या आजारांचं कारण घोड्याची विष्ठा असल्याचं टीमच्या लक्षात आलं. त्यांनी वेगवेगळ्या रहिवासी भागांमधून, शाळेतून पाण्याचे नमुने घेऊन तपासले. काही ठिकाणी तर आरओ फिल्टरमधून घेतलेलं पाणीदेखील दूषित असल्याचं आढळलं.

“आम्हाला तपासलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये इ-कोलाय (E-Coli), कोलिफॉर्म (Coliform), साल्मोनेला (Salmonella) सारखे जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळले, जे घोड्याच्या विष्ठेत आढळतात. हे जीवाणू थोड्या प्रमाणातही असणं अपेक्षित नसतं. रोटाव्हायरसदेखील घोड्यांना, विशेषतः घोड्यांच्या शिंगरांमध्ये आढळतो, आणि दूषित पाण्यातून त्याच संक्रमण लहान मुलांना होऊ शकतं. याव्यतिरिक्त घोड्याची विष्ठा उन्हाळ्यात सुकते आणि जनावर आणि लोकांच्या हालचालींमुळं धुळीप्रमाणं हवेत मिसळून हवादेखील दूषित करते. यामुळं अनेकांना श्वसनाचे विकारदेखील उद्भवत आहेत,” मस्तकर पुढं म्हणाल्या.

 

 

वेण्णा तलावाच्या आजूबाजूच्या अनेक टपऱ्या, अन्नपदार्थ विकणाऱ्या ठिकाणांवर नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यानं तिथं प्रक्रियेशिवायच तलावाचं पाणी जेवणात वापरात जात असल्याचं संशोधकांना दिसलं. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तिथली खाण्याची ठिकाणं प्रशासनानं बंद केल्याचं मस्तकर सांगतात. 

मात्र या संशोधनादरम्यान परीक्षण करताना वेण्णा तलावाच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नीट काम करत नसल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं,तसंच पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी टाकल्या जाणाऱ्या ब्लीचचं प्रमाणदेखील पुरेसं नव्हतं.

“आम्ही हे लक्षात आणून दिल्यानंतर तिथल्या प्रशासनानं या गोष्टी सुधारण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र हे पुरेसं नाही, कारण ब्लीचनं पाण्यातून फक्त जिवाणू काढता येऊ शकतात, विषाणू नाही. त्यामुळं घोड्यांना पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून दूर नेणं, हाच एकमेव मार्ग आहे,” अटक म्हणतात.

महाबळेश्वरमध्ये सध्या जवळपास १७० घोडे आहेत, ज्यातील बहुतांश वेण्णा तलावाजवळील पठारावर असतात. घोडेस्वारीची जागा पठारावरून दुसरीकडे हलवण्याची शिफारस संशोधकांनी केली आहे.

“घोडेमालकांच्या पोटावर पाय देण्याचा आमचा उद्देश अजिबात नाही. पण पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही घोडेस्वारी दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव तिथल्या प्रशासनासमोर ठेवला आहे. दुसरी आकर्षक जागाही आम्ही बघून ठेवली आहे, जिथं घोडे नेल्यास त्यांची विष्ठा सहजासहजी वेण्णा तलावापर्यंत पोहोचणार नाही,” मस्तकर सांगतात.

याशिवाय विष्ठेचं संकलन करून त्यातून बायोगॅस प्रकल्प सुरु करता यावा यासाठी घोड्यांच्या शेपटीला पिशवी किंवा बादली बांधून विष्ठा जमिनीवर पडण्याऐवजी त्यात पडावी, अशी सोय करण्याबद्दल घोडे मालकांमध्ये जागरूकता करण्यात यावी, अशी शिफारस सुद्धा संशीधकांकडून करण्यात आली आहे.

“माथेरानमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला आहे, तिथं सर्व घोडेमालक अशाच प्रकारे विष्ठेचा संकलन करतात. वैष्णोदेवीला घोड्यांची विष्ठा बायोगॅस प्रकल्पांमधून वापरून त्यातून वीजनिर्मिती केली जाते. हे महाबळेश्वरमध्येही करणं शक्य आहे. त्यासाठी तिथले नागरिक आणि घोडेमालक यांच्याशी संवाद साधावा लागेल,” मस्तकर पुढं म्हणतात.