India

'गेले ४ दिवस आम्हाला कच्चा माल मिळालेला नाही,' ऑक्सिजन उत्पादकांची कैफियत

ऑक्सिजन वायूचं प्रेशराइझ्ड सिलिंडर मध्ये पॅकिंग करण्यासाठी आधी लिक्विड अर्थात द्रवरूपात ऑक्सिजन हा कच्चा माल असतो.

Credit : Indie Journal

महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सध्या ऑक्सिजन वायूच्या प्रेशराइझ्ड सिलिंडर्सची तूट आहे. अर्थात शहरांमध्ये बहुसंख्येनं रुग्ण असल्यानं शहरांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे, मात्र त्याचसोबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही ऑक्सिजन, अर्थात प्राणवायूचा पुरवठा आता तीव्र तुटवड्याच्या स्थितीत पोहोचला आहे. साठेबाजी, वितरणातील ढिसाळपणा, मागणी आणि पुरवठा याचा न आलेला अंदाज ही कारणं यामागं देता येत असली, तरी यामागचं कारण आणखी गंभीर स्वरूपाचं आहे, ते म्हणजे, ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक कंपन्यांचं म्हणणं आहे, की ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार कच्चा मालच उपलब्ध होत नाहीये. 

ऑक्सिजन वायूचं प्रेशराइझ्ड सिलिंडर मध्ये पॅकिंग करण्यासाठी आधी लिक्विड अर्थात द्रवरूपात ऑक्सिजन हा कच्चा माल असतो. ऑक्सिनजन पॅकेजिंग कारखान्यात याला अल्युमिनियम सिलिंडरमध्ये उच्च दाबत भरलं जातं. ठाण्याच्या शहापूरमध्ये असलेल्या एका ऑक्सिजन सिलिंडर प्लांटचे मालक जावेद शेख, इंडी जर्नलशी बोलताना सांगत होते, "आम्हाला कोव्हीडची परिस्थिती गंभीर होण्याआधीच्या काळात १० टन लिक्विड ऑक्सिजन रोज लागत असायचा. हा लिक्विड ऑक्सिजन आम्हाला आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स आणि लिंड या कंपन्या पुरवतात. मुंबईतल्या बहुतांश भागात याच कंपन्या लिक्विड ऑक्सिजनच्या पुरवठेदार आहेत. आम्ही कल्याण, ठाणे, डोंबिवली, शहापूर अशा निमशहरी किंवा ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा करतो."

"मात्र गेले ३ ते ४ दिवस आम्हाला लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठाच झालेला नाही!" अशी धक्कादायक माहिती देत शेख पुढं सांगतात, "कोव्हीडची परिस्थिती जशी गंभीर होत गेली, तसं आम्हाला कच्चा माल कमी मिळत गेला. आधी १० टन दिवसा असणारी आवक, लवकरच ३-४ टन दिवसाला इतकी कमी झाली. त्यानंतर तोही पुरवठा एक दिवस आड मिळू लागला. आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करत राहिलो, आम्ही कंपन्यांना आणि तहसीलदारांनाही पत्र लिहून आमची परिस्थिती कळवली, मात्र आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुरबाडमध्ये प्रॅक्सीयेर कंपनीचा प्लांट आहे, मात्र त्यांना फक्त नाशिक, धुळे आणि जळगाव व इतर उत्तरेतल्या जिल्ह्यांनाच पुरवठा करण्याची परवानगी आहे. त्यामुळं आमचं उत्पादन पूर्णतः बंदच आहे."

इंडी जर्नलने या परिस्थितीबाबत आयनॉक्स एअर प्रोडक्ट्सला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याबाबत कोणताही प्रतिसाद कंपनीनं दिला नाही. मात्र बिझनेस स्टॅंडर्डच्या एका बातमीनुसार, पॅनडेमिकच्या आधीच्या परिस्थितीत, दिवसाला भारतात ७०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची गरज पडत असे. कोव्हीडच्या पहिल्या लाटेत ही मागणी दिवसाला २८०० टन, इतकी प्रचंड वाढली. आता दुसऱ्या लाटेत तर ही मागणी ५००० टन दिवसाला इतकी महाप्रचंड वाढली आहे. 

"आता परिस्थिती फारच बिकट झालेली आहे. आधी आम्हाला फक्त सिलिंडरची चौकशी करणारे फोन यायचे. आता लोक थेट आमच्या प्लांटवर येऊन चौकशी करत आहेत. कधीकधी तर प्लांटभोवती गर्दी जमू लागते. आम्हाला त्यांच्या प्रश्नांना, मागणीला आणि कधीकधी रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं आम्ही पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करणार आहोत," असं हताशपणे जावेद शेख सांगतात.         

      

मागणीनुसार पुरवठा करण्याचे सरकारचे प्रयत्न

देशभर, विशेषतः जास्त प्रमाणात कोव्हीड रुग्ण जास्त असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांना ऑक्सिजनचा झालेला तुटवडा कमी करण्यासाठी सरतेशेवटी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. नुकताच पनवेल, रुरकी ते विशाखापट्टणम या रेल्वेमार्गावर एक 'ग्रीन कॉरिडॉर' निर्माण करून त्यावर रेल्वेतर्फे 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा पूर्वर्वत करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यातही अंतर्गत महामार्गांवर असे ग्रीन कॉरिडॉर निर्माण केले जात आहेत व पुणे जिल्हा प्रशासनानं ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकर्सना 'ऍम्ब्युलन्स' अर्थात रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.