India

महाराष्ट्र निवडणूक: मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्याची शिक्षकांची मागणी

निवडणूकीनंतर एक दिवसाचीही उसंत मिळणार नसल्यानं राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजी.

Credit : इंडी जर्नल

 

अनेक सरकारी जबाबदाऱ्यांपैकी एक असलेली निवडणुकीची जबाबदारी पार पाडल्यानंतर शिक्षकांना एक दिवसाचीही उसंत मिळणार नसल्यानं राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काम मिळालेल्या शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशीदेखील सरकारनं सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देता येईल, असं जाहीर केलं आहे. १९ तारखेला शिक्षकांना मतदानाच्या दिवसासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घ्यायचं आहे तर २० तारखेला राज्यभरात मतदान आहे. मात्र तरीदेखील शिक्षण आयुक्तालयानं गट शिक्षण अधिकाऱ्यांना १९ तारखेलादेखील शाळा शक्यतो सुरूच ठेवाव्या याची खबरदारी घेण्यास सांगितलं आहे, तर २१ तारखेलाही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

“मात्र दिवसभर मतदानाचं काम केल्यानंतर शिक्षांना सुट्टीची खरी गरज त्याच्या दुसऱ्या दिवशी भासते,” महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राजन कोरगावकर सांगतात.

“पुरुष शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात निवडणुकीचं काम नेमलं जात नाही. त्यामुळं अनेकदा त्यांना ३-३ तालुके पलीकडच्या गावात काम लागतं. मतदान जरी संध्याकाळी संपलं, तरी त्यानंतर तिथलं सगळं काम आटोपून त्यांना साहित्य पुन्हा जमा करण्यासाठी जावं लागतं. हे सगळं होईपर्यंत अनेकदा पहाटेचे २-३ वाजतात. यानंतर आपल्या गावी परत जाऊन सकाळी शाळेत जाणं, हे बहुतांश शिक्षकांसाठी जवळपास अशक्यच गोष्ट आहे,” कोरगावकर सांगतात.

 

 

“अनेकदा आम्हाला ड्युटीसाठी दुर्गम, कधी आदिवासी भागांमध्ये जावं लागतं. मतदान केंद्रांवरून साहित्य जमा करायला जाण्यासाठी बस असतात, पण त्या बस त्या भागातील प्रत्येक केंद्रावर थांबत थांबत सर्वांना घेऊन जातात. अशा वेळी मुख्य केंद्रावर पोहचून तिथं साहित्य जमा करेपर्यंत अनेकदा रात्रीचे २ वाजतात. आता तिथून परत जाण्यासाठी शिक्षकांची कुठलीही सोय निवडणूक आयोग किंवा प्रशासनाकडून केली जात नाही, साहित्य जमा केल्यानंतर घरी कसं जायचं, याची जबाबदारी आणि खर्च पूर्णपणे आमच्यावर सोडला जातो. मग अनेकदा अशा दुर्गम भागांमधून एवढ्या रात्री परत येणं आम्हाला शक्य होत नाही,” इगतपुरीमधील जिल्हा परिषद शिक्षक प्रमोद परदेशी सांगतात.

 

ड्युटीवरील शिक्षकांची गैरसोय

मतदान झाल्यानंतर शिक्षकांची त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणावरून परत येण्याची किंवा गरज पडल्यास ड्युटीच्या ठिकाणी राहण्याची कोणतीही सोय केली जात नाही, असंदेखील शिक्षक सांगतात.

“कधी आम्हाला एखाद्या मित्राच्या घरी राहावं लागतं, किंवा गावात कोणाकडे तरी राहावं लागतं. यात महिलांसमोर तर सुरक्षिततेचा प्रश्नदेखील उभा राहतो. महिला शिक्षकांना जरी त्यांच्या गावाजवळच केंद्र दिलं जात असलं, तरीदेखील काम संपवून त्यांना रात्री घरी जाण्यासाठी सोय उपलब्ध होईलच असं नसतं,” परदेशी सांगतात.

 

 

ड्युटीवर असलेल्या शिक्षिकांसमोरील आव्हानांवर प्रशासनाकडून पुरेसा विचार होत नसल्याचं अलिबागमधील सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील पुढं सांगतात.

त्या म्हणतात, “बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रांवर चांगली स्वच्छतागृहं उपलब्ध नसतात. अशावेळी सर्वच शिक्षकांची, पण विशेषतः शिक्षिकांची मोठी गैरसोय होते. बहुतांश वेळा ड्युटीवरील शिक्षकांच्या ४ जणांच्या गटात एकाच महिला असते. केंद्रावर राहण्याची, स्वच्छतागृहांची सोय नीट केलेली नसल्यानं या महिलांना रात्रीच्या मुक्कामासाठी, अंघोळीसाठी, गावातील कोणाच्यातरी घरी जावं लागतं. या सर्वच विचार प्रचारासाठी केला जात नाही.

 

शिक्षकांची संख्या कमी

राज्यभरातील जवळपास सर्वच शाळांमध्ये सध्या शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळं असलेल्या शिक्षकांवरील कामाचा ताण तर वाढलाच आहे, त्याचबरोबर अनेक शाळांमधील बहुतेक सर्वच शिक्षकांना निवडणुकीची कामं लागली आहेत.

“राज्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांची संख्या आधीच साधारणपणे ३५-४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळं यावेळी शाळांमधील जवळपास सर्वच शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लागली आहे. शिक्षकेतर कर्मचारीदेखील ड्युटीवर असतात आणि त्यांचं काम तर शिक्षकांच्या कामानंतर संपतं. अशावेळी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षक आणि शिपाई शाळेत कसे पोहोचतील? तर आम्ही शाळा उघडायची तरी कशी?” सुजाता पाटील म्हणतात.

त्या म्हणाल्या की त्यांच्या शाळेतील जवळपास सर्वच शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लागल्यामुळं त्यांनी शाळेला सुट्टी दिली आहे. मात्र सर्वच मुख्याधापक स्वतःहून हे करतील, असं नाही.

“इतर वेळी शिक्षकांना इतकं अशैक्षणिक काम देण्यात येतं, की मुलं शाळेत आली, तरी प्रत्यक्ष शिकवण्याचे तास कमीच पडतात. मग फक्त शिक्षकांना निवडणूक ड्युटीनंतर एक दिवस सुट्टी देण्याचा प्रश्न आल्यावरच मुलांच्या शिक्षणाची चिंता शिक्षण विभागाला का सतावतेय?” पाटील विचारतात.

 

 

शाळांना नक्की कधी सुट्टी आहे याबाबतही राज्यभरात संभ्रम असल्याचं दिसतं. १८ आणि १९ तारखेला शाळा सुरूच ठेवाव्यात, असं शिक्षण आयुक्तालयाचं म्हणणं आहे. जर एखाद्या शाळेतील सर्व शिक्षक ड्युटीवर असतील, तर दुसरीकडून शिक्षक नियुक्त करून शाळा सुरु ठेवाव्या, असं पत्रक काढण्यात आलं आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी १९ ला सुटी दिलेली आहे. मतदानानंतरच्या सुट्टीबाबत मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्यामुळंच मुख्याध्यापकांच्या हातात ही जबाबदारी सोपवण्यापेक्षा प्रशासनानंच सुट्टी जाहीर करणं गरजेचं आहे, असं कोरगावकर म्हणतात.

“यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला ४ दिवसांपूर्वीच पत्र लिहून २१ तारखेलादेखील सुटी जाहीर करण्याची विनंती केली होती. मात्र अजूनपर्यंत आम्हाला त्यावर काहीही उत्तर मिळालेलं नाही,” ते पुढं म्हणतात.

 

कामाचा मानसिक तणाव

मतदानाच्या दिवशी काम करताना शिक्षकांवर फक्त शारीरिक नाही, तर मानसिक ताणही असल्याचं शिक्षक म्हणतात.

“मतदानाच्या दिवशी काम भरपूर असतं. मतदान केंद्रं दुर्गम ठिकाणी असली, की तिथपर्यंत पोहोचण्यास त्रास होतो. विशेषतः ज्या केंद्रांवर भरपूर गर्दी असते, अशा ठिकाणी ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना क्षणाचीही उसंत मिळत नाही. त्यात आधी म्हटल्याप्रमाणे मतदान संपून सर्व साहित्य जमा करेपर्यंत मध्यरात्र उलटून जाते,” ते म्हणाले.

“मतदान केंद्रांवर पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असेल, जेवण वेळेत येईल, याची काहीच शाश्वती नसते. घरून नेलेला डबा एका दिवसात संपतो. त्यानंतर जेव्हा कधी जेवण पुरवलं जाईल, त्याची वाट पाहावी लागते. आजकाल चाळीशीच्या पुढच्या बऱ्याच शिक्षकांना रक्तदाब, मधुमेह, असे आजार असतात. त्यांना अशावेळी बराच त्रास होतो,” पाटील सांगतात.

याव्यतिरिक्त काही संवेदनशील केंद्रांवर काम करताना शिक्षकांना मानसिक तणावही सामोरं जावं लागतं.

“काही केंद्रांवर गर्दी जास्त असते, काही केंद्रं संवेदनशील असतात, तिथं काम हाताळणं तणावपूर्ण असतं. त्यात शिक्षकांच्या डोक्यात रात्री काम आटपून सकाळी शाळेत कसं पोहोचायचं, याची चिंता असते. सुट्टी दिल्यास ही चिंताही मिटेल आणि बाकी सर्व तणावातून बाहेर पडण्यास शिक्षकांना वेळही मिळेल,” परदेशी म्हणतात.