India
राज्यात पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता
आधी पाऊस, नंतर उष्णतेच्या लाटा
पुणे । या आठवड्याच्या सुरवातीला राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढच्या आठवड्यातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात १२२ वर्षातील ऊच्चांकी तापमान नोंदवलेलं होतं. यावर्षीचा मार्च या पावसामुळं काहीसा सुसह्य ठरू शकतो. मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानाचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
“हवामान विभागाच्या दीर्घकालीन पर्जन्य अंदाजानुसार (extended rain forecast) साधारण १३ मार्च पासून पश्चिमेकडे निर्माण झालेल्या दाबपट्टयांमुळं राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. खरं तर संपूर्ण देशातच यादरम्यान पावसाळी वातावरण असेल,” पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.
नंदुरबार, धुळे आणि नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. “येत्या १३ मार्चपासून वात प्रणाली तयार होणार आहे, साधारण १७ तारखेपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यादरम्यान कमी काळात मध्यम-तीव्र ते तीव्र पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर या प्रणाली हळूहळू देशाच्या पूर्वेकडे सरकणार आहे,” कश्यपी म्हणाले.
मध्यम-तीव्र म्हणजे ताशी १ सेंमी तर तीव्र म्हणजे साधारण ताशी २ सेंमी पाऊस पडेल.
पावसाबरोबरच विजांचा कडकडाट होण्याची तसंच वादळी वारं वाहण्याचीही शक्यता आहे. “गेल्या वेळेप्रमाणे यावेळीसुद्धा वीजा कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं विजांचा कडकडाट होत असताना लोकांनी झाडाखाली उभं राहणं टाळावं. त्याचबरोबर ताशी ३० ते ४० किमीपर्यंत वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं त्यानुसार सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे,” ते पुढं सांगतात.
कांदा, द्राक्षं, ज्वारी अशी अनेक रब्बी पिकं यामुळं आडवी होऊन, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पावसामुळं पुढच्या आठवड्यात तापमान कमाल आणि किमान तापमान घटणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात वाढलेल्या उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळणार आहे.
यावर्षीचा उन्हाळा हा नेहमीपेक्षा जास्त उष्ण असणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. कोकण आणि गोव्यात गेले दोन दिवस उष्णतेच्या लाटेची सूचना देण्यात आली होती.
“महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये कमाल तापमान साधारण सरासरीएवढं तर किमान तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. त्यामुळं दिवसाप्रमाणे रात्रीसुद्धा वातावरण अस्वस्थ करणारं राहणार आहे,” कश्यपी पुढं सांगतात.
गेल्या वर्षी मार्च ते मे दरम्यान पाऊस न झाल्यानं मार्च महिन्यापासूनच देशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये लागोपाठ उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यातील पावसामुळं काही ठिकाणी जरी दिलासा मिळाला असला, तरी साधारण २०-२२ मार्च नंतर तापमान पुन्हा वाढणार आहे. यावर्षीचा फेब्रुवारी महिना हा आधीच १२३ वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे.
“उष्णतेमुळं जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. भरपूर पाणी पिणं, बाहेर पडताना पाणी पिऊन बाहेर पडणं, उन्हात असताना पांढऱ्या कापडानं डोकं आणि चेहरा झाकणं, फिक्या रंगाचे कपडे वापरणं, उन्हातून घरी आल्यावर अराम करणं, ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर साधारण सकाळी १०.३० ते ११ वाजल्यापासून दुपारी ३.३० ते ४ वाजेपर्यंत लोकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं,” कश्यपी सांगतात.