Europe

बँक बुडत असताना डॉयच बँकेच्या संचालकांवर महागडे सूट शिवून घेतल्याबद्दल टीका

एवढे महाग सूट शिवण्याचे पैसे कुठून आले अशी टीका होत आहे.

Credit : Reuters

दुसऱ्या तिमाहीत ३.१ अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्यानंतर, डॉयच बँकेने जगभरातील आपल्या १८,००० कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या दिवशी  डॉयचने आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली, त्याच दिवशी बँकेच्या लंडन मधील कार्यालयात बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांसाठी कमीतकमी $१२०० (जवळपास ९० हजार रुपये) प्रत्येकीचे सूट शिवण्यासाठी शाखेत टेलरिंग कंपनीला पाचारण करण्यात आलं होतं. 

फिल्डिंग अँड निकोल्सन, या प्रसिद्ध टेलर्स ना सोमवारी लंडन कार्यालयातून बाहेर पडताना टिपलं गेलं. प्रचंड नुकसान झाल्यानंतर व इतक्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागल्यानंतर,  डॉयचच्या संचालकांकडे एवढे महाग सूट शिवण्याचे पैसे कुठून आले, ह्यावर अनेक लोकांनी टीका केली असे जर्मनीच्या सौद डॉयच झीटंग दैनिक वर्तमानपत्रने सांगितले. 

"आमची संस्थात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते आम्ही करत आहोत," असं मत डॉयच बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिअन स्युविंग यांनी रविवारी व्यक्त केलं होतं. सिटी ग्रुपच्या अँड्र्यू कुम्ब्स आणि निकोलस हर्मन सारख्या अनेक विश्लेषकांनी एका लिखित नोट मध्ये 'स्युविंग यांच्या नियोजनातील आर्थिक लक्ष्यं अनाकलनीय व आदर्शवादी आहेत आणि २०२२ पर्यंत ८ टक्क्यांचा इक्विटी वर परतावा मिळवण्याचं ध्येय अशक्य असल्याचं दिसतं,' असं म्हटलं आहे.  काही तज्ज्ञांच्या मते, आवश्यक रीस्ट्रक्चरची जाहीर केलेली रक्कम,  स्युविंग आणि त्याच्या आधीच्या संचालकांच्या विफलतेची पावतीच आहे व स्युविंग अजूनही मूलभूत समस्या असणारी 'खर्च जास्त आणि महसूल कमी', याचे  निराकरण करु शकले नाहीत. 

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, स्युविंग यांनी बँकेच्या सर्वात मोठ्या रिस्ट्रक्चरच्या नावे, बँकेच्या रिझर्व्ह कुशन मधून रक्कम वापरली जात आहे. अशावेळी या रकमेचा व बँकेच्या आयुधांचा वापर जास्तीत जास्त काटकसरीनं करणं अपेक्षित आहे. 

या टीकांवर उत्तर देताना, स्युविंग म्हणतात, "मला वाटतं की ज्या लोकांना कामावरून कमी केलं गेलं, त्यातील भरपूर लोक व्यापारी होते जे सूट घालत नाही. म्हणून आम्ही आमच्या त्या बडतर्फीचा परिणाम न झालेल्या क्लायंटसमोर प्रतिमानिर्मितीसाठी  सूट शिवायला लागलो." आम्हाला त्यातून चुकीची प्रतिमानिर्मिती अपेक्षित नव्हती, असं म्हणून त्यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल दुःखही व्यक्त केलं. फिल्डींग आणि निकोल्सन कंपनीकडून सूट शिवून मिळण्यासाठी कमीत कमी आठ आठवडे लागतात व प्रत्येक सूट ची किंमत £१२०० पासून सुरु होऊन ग्राहकाच्या आवडीनुसार आणखी वर जाऊ शकते. 

ANI नुसार बँकेचे भारतातील इक्विटी डेस्क सुद्धा लवकरच बंद करण्यात येतील ज्यात व्यापार, संशोधन आणि विक्री मधील अनेक नोकऱ्या गमावल्या जातील. आतापर्यंत यामुळे किती नोकऱ्यांवर फरक पडेल व काढल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांना  डॉयच बँकेच्या दुसऱ्या कुठल्या 'ऑपरेशन्स' मध्ये बदली करता येईल का, यावर काहीच स्पष्टीकरण बँकेकडून मिळालेलं नाहीये. परंतु,  इकॉनॉमिक टाइम्सनुसार,  डॉयचने भारतातील संशोधन संघाच्या ८ कर्मचाऱ्यांना आधीच राजीनामा देण्यास सांगितले आहे. भारतात डॉयच बँकेच्या १७ शाखा पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्ली , अहमदाबाद , औरंगाबाद, चेन्नई, कोल्हापूर, गुरुग्राम, कोलकाता, लुधियाना, जयपूर, मोरादाबाद, नोएडा, सालेम, वेल्लोर व सुरतमध्ये आहेत.