Quick Reads
चक्री वादळांना नावं का आणि कशी देतात? पुढच्या वादळांची नावं कोणती?
या यादीतील पाहिलं नाव गेल्या वर्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाला देण्यात आलं.
ताऊते चक्रीवादळानंतर आता भारतीय हवामान विभागानं बंगालच्या उपसागरात अजून एक चक्रीवादळ तयार झाल्याचे संकेत दिले आहेत. साधारण २६ मे च्या दरम्यान पश्चिम बंगाल तसंच ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असणाऱ्या या चक्रीवादळाला 'यास' हे नाव देण्यात आलं आहे. या वादळाला सोमवारी भारतीय हवामान खात्यानं 'तीव्र वादळाचा' दर्जा दिला आहे.
उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?
भारत जगातल्या सहा प्रादेशिक हवामान केंद्रांपैकी एक आहे ज्यांच्यावर चक्रीवादळांची नावं निश्चित करण्याची तसंच चक्रीवादळांविषयी निर्देश जाहीर करण्याची जबाबदारी आहे. उत्तर हिंद महासागर, बंगालचा उपसागर तसंच अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना नावं देण्यासाठी भारतासह १३ देशांच्या समिती चक्रीवादळांच्या नावांची यादी जाहीर करते. गेल्यावर्षी पश्चिम बंगालमध्ये धडकले चक्रीवादळाला 'अम्फान' हे जुन्या यादीतलं शेवटचं नाव देण्यात आलं होतं. २००४ मध्ये जाहीर केलेल्या ६४ नावांपैकी थायलंडनं दिलेल्या या नावाचा अर्थ आकाश असा होतो.
गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये नवीन नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात या समितीतल्या १३ देशांनी प्रत्येकी १३ नावं सुचवलेली आहेत. पुढच्या १६९ चक्रीवादळांसाठीच्या नावांची यादी भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांनी जाहीर केली आहे.
या यादीतील पाहिलं नाव गेल्या वर्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाला देण्यात आलं. हे नाव बांग्लादेशनं सुचवलं होतं. नुकतंच भारताच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलेल्या 'ताऊते' चक्रीवादळाचं नाव म्यानमारनं सुचवलं होतं. सरडा जातीतल्या गेको या प्राण्यावरून या चक्रीवादळाचं नाव ठरवण्यात आलं होतं. गेको त्याच्या विशिष्ठ आवाजासाठी ओळखला जातो.
येत्या दोन दिवसात येणाऱ्या 'यास' या चक्रीवादळाचं नाव ओमाननं ठरवलंय. यास हे यास्मीन किंवा जास्मिन अर्थात चमेली सारख्या ओमानमधील एका सुगंधी झाडाचं नाव आहे. यापुढच्या चक्रीवादळाचं नाव 'गुलाब' हे पाकिस्ताननं सुचवलंय. निसर्ग ते यास दरम्यान आत्तापर्यंत गती (भारत), निवार (इराण) आणि बुरेवी (मालदीव) ही चक्रीवादळं येऊन गेली आहेत.
जगभरात जागतिक हवामान संघटना असलेलं World Meteorological Organisation अशा नावांच्या याद्या हाताळते. या यादीतील नावं यादी फिरून पुन्हा वापरली जाऊ शकते. मात्र एखादं वादळ जर खूप प्राणघातक किंवा मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी करणारं ठरलं तर ते नाव यादीतून बाद करण्यात येतं.
यादीतली पुढच्या वादळांची नावं कोणती?
गुलाब (पाकिस्तान)
शाहीन (कतार)
जवाद (सौदी अरब)
असानी (श्रीलंका)
सित्रांग (थायलंड)
मांदोस (संयुक्त अरब अमिरात)
मोचा (येमेन)
चक्रीवादळांना नावं का दिली जातात?
चक्रीवादळांना नावं दिल्यानं प्रत्येक वादळाला ओळखणं आणि त्याबद्दल जनजागृती करणं सोपं जातं. चक्रीवादळं बऱ्याचदा एकामागोमाग एक येतात, जसं की २०१९मध्ये अनेक वर्षांनंतर अरबी समुद्रात चार चक्रीवादळं तयार झाली. यावर्षी देखील ताऊते चक्रीवादळाच्या एका आठवड्यातच पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ तयार व्हायला सुरवात झाली. वेगवेगळ्या नावांमुळे सामान्य व्यक्तीला या वादळांमध्ये फरक करणं शक्य होतं, तसंच सरकार आणि हवामान खात्याला निर्देश जारी करणं सोपं जातं.