Oceania

ऑस्ट्रेलियात मधमाशा लॉकडाऊनमध्ये!

जगभरात अनेक ठिकाणी मधमाश्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला वॅरोआ डिस्ट्रक्टर किंवा वॅरोआ माइट हा परजीवी (पॅरासाईट) देशात नुकताच आढळून आला आहे.

Credit : Matthew T Rader/Shubham Patil

ऑस्ट्रेलियानं देशातल्या सर्व मधमाशांवर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हीडमुळं जसं जगभरातील लोकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला होता, तसंच तिथल्या मधमाशांमध्ये आढळून आलेल्या एका रोगामुळं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जगभरात अनेक ठिकाणी मधमाश्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला वॅरोआ डिस्ट्रक्टर किंवा वॅरोआ माइट (Varroa mite) हा परजीवी (पॅरासाईट) देशात नुकताच आढळून आला आहे. या लॉकडाऊनमुळं देशातील मध उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. तसंच बदाम आणि अनेक फळांच्या उत्पादनावरही यामुळं दुष्परिणाम होऊ शकतो.

ज्या भागांमध्ये हा परजीवी सापडला आहे, त्या भागांना विशेष जैवसुरक्षा क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे, आणि त्या भागांतील सर्व उत्पादकांना मधमाशा किंवा मधाची पोळी बाहेर नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात न्यू साऊथ वेल्समधील सिडनी शहराजवळच्या एका बंदरानजीक वॅरोआ डिस्ट्रक्टरची पहिल्यांदा नोंद झाली. मात्र तेव्हापासून आठवड्याभरातच जवळपास १०० किमी अंतरापर्यंत हा परजीवी आढळल्याचं, बीबीसीच्या या संदर्भातील वृत्तात म्हटलंय.

न्यू साऊथ वेल्समध्ये अशी सात संक्रमित ठिकाणं नोंदवण्यात आली आहेत. संक्रमित ठिकाणांच्या १० किमी परिघातील सर्व पोळी नष्ट केली जाणार आहेत तसंच २५ किमी क्षेत्रातील मधमाशांच्या वसाहतींवर लक्ष ठेवलं जाणार आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये मधमाशा तसंच त्यांची पोळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सध्या तरी न्यू साऊथ वेल्सच्या इतर भागांत तसंच इतर स्टेट्समध्ये संक्रमण पसरू नये, हा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

 

 

मात्र वॅरोआ माइट दोन विशिष्ट प्रकारच्या मधमाशांवर हल्ला करतो. त्यामुळं ऑस्ट्रेलियातील देशी प्रजातींवर त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली, तरी तो होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. मधमाशांवरच्या या बंदीमुळं होणारं नुकसान मोठं असणार आहे. पण त्याहूनही मोठं नुकसान या परजीवीचा प्रादुर्भाव पसरल्यानं होऊ शकतं. अमेरिकेत अशा संक्रमणामुळं जवळपास ३० टक्के व्यावसायिक वसाहती नष्ट झाल्या असल्याचा डेटा आहे, तर ऑस्ट्रेलिया खंडातील न्यूझीलंडमध्ये वन्य मधमाशांच्या जवळपास ९० टक्के वसाहती वॅरोआ माइटमुळं नष्ट झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलियामध्ये सफरचंद, बदाम आणि ऍव्होकाडो पिकांच्या परागीकरणासाठी मधमाशा अत्यंत आवश्यक आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये बदामाच्या परागीकरणासाठी जवळपास ३ लाख मधमाशांच्या पोळ्यांची गरज ऑस्ट्रेलियामध्ये भासणार आहे. त्यामुळं या  वॅरोआ डिस्ट्रक्टरच्या संक्रमणामुळं तसंच लॉकडाऊननं बदाम उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये मध्ये भीतीचं वातावरण पसरवलंय. ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरीसारख्या फळांच्या उत्पादनासाठीही येत्या काही दिवसांमध्ये मधमाशांचा प्रवास पूर्ववत चालू होणं गरजेचं आहे. यामुळं व्यावसायिक परागीकरण सेवा पुरवणाऱ्यांनाही नुकसानाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जर वॅरोआ माइटचा प्रादुर्भाव ऑस्ट्रलियाच्या अन्य भागांमध्येही झाला, तर देशातील मध उद्योगाचं ७० मिलियन डॉलर्सपर्यंतचं नुकसान होऊ शकतं, असं सध्याचे अंदाज दर्शवतात. मधमाशांच्या संख्येत घट झाली तर देशातील अन्न उत्पादनातही जवळपास एक तृतीयांश घट होऊन अन्नधान्याचे दर वाढतील, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलिया हा आत्तापर्यंत जगातील एकमेव असा खंड होता जिथं वॅरोआ डिस्ट्रक्टर आढळला नव्हता. जगभरात हा परजीवी मधमाशांसाठी सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक मानला जातो. हा परजीवी मधमाशांच्या शरीराला चिकटून त्यांच्या शरीरातील चरबी शोषून घेतो. यामुळं मधमाशांचे पंख निकामी होऊ शकतात तसंच हे परजीवी त्यांच्यासोबत व्हायरस आणून वसाहतींमध्ये रोगही पसरवू शकतात. अशा प्रकारचं संक्रमण मधमाशांच्या वसाहतींच्या वसाहती नष्ट करू शकतं. मधमाशा अन्नाच्या शोधात दूरवर प्रवास करतात, अनेक अभ्यासांतून त्या त्यांच्या आयुर्मानात तब्बल १,२०० किमी पर्यंत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या त्यांच्या प्रवासात फुलांचा मध गोळा करता करता त्या अनेक पिकांच्या, फळझाडांच्या परागीकरणासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळं मधमाशांच्या जीवाला धोका असणं हे अन्न सुरक्षेसाठी घातक ठरू शकतं.