Oceania

ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या शहरात ६ महिन्यांत तिसरा पूर

जवळपास ५०,००० नागरिकांचं पुरामुळं स्थलांतर करण्यात आलंय.

Credit : असोसिएटेड प्रेस/इंडी जर्नल

साधारण आठवड्याभरापूर्वी सिडनी शहरात हवामान बदलाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या अनेक नागरिकांना अटक करण्यात आली. या आंदोलकांनी रस्ता रोखून दळणवळण विस्कळीत केल्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. सिडनीमधील रस्ते काल हे वर्ष सुरु झाल्यापासून तिसऱ्यांदा पुरामुळं बंद झाले आहेत.

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर सिडनीमध्ये गेल्या ६ महिन्यातील तिसरा महापूर आलाय. फक्त सिडनी शहरच नाही तर न्यू साऊथ वेल्स स्टेटच्या अनेक भागांमधील मिळून जवळपास ५०,००० नागरिकांचं पुरामुळं स्थलांतर करण्यात आलंय किंवा त्यांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा पूर या वर्षातला आत्तापर्यंतचा सर्वात भीषण पूर असल्याचं म्हटलं जातंय. एकाच वर्षात तिसऱ्यांदा पुरामुळं निर्वासन झालेल्या नागरिकांच्या मनात सरकार आणि प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी यामुळं निर्माण झाली आहे.

पूर्व ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये गेल्या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच नोव्हेंबर २०२१ पासूनच, मुसळधार पावसाला सुरवात झाली. गेला नोव्हेंबर तर रेकॉर्ड ठेवायला सुरवात झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्वात ओला नोव्हेंबर ठरला. हा पाऊस यावर्षीच्या सुरवातीलाही ला निना या वातसंस्थेच्या प्रभावामुळं अजून जोरदार कोसळत राहिला. आणि फेब्रुवारी महिन्यात न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड या राज्यांच्या अनेक भागांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. हजारो लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं, त्यांचं निर्वासन झालं, तर देशात अन्नधान्याचा तुटवडाही निर्माण झाला.

 

 

या पुरातून इथले लोक सावरतात तोवर एप्रिलमध्ये पुन्हा एकदा देशाच्या पूर्व आणि आग्नेय किनारी भागांमध्ये मुसळधार पावसामुळं पूर आले. पुन्हा एकदा हजारो नागरिकांना त्यांची घरं, पशुधन, शेती मागे सोडून निर्वासित व्हावं लागलं. अनेकांचा जीव गेला.

यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा सिडनी आणि आजूबाजूच्या भागांमध्ये नद्यांची पातळी वाढून पाणी भरायला सुरवात झाली. काही लोक जे नुकतेच त्यांच्या घरांमध्ये, त्यांच्या जमिनीवर परतले होते, त्यांचं पुन्हा स्थलांतर करण्यात येत आहे.

 

पुरामागची कारणं

सलग दोन वर्षं ला निना या वातसंस्थेचा प्रभावामुळं ऑस्ट्रेलियाच्या पावसाची तीव्रता वाढली आहे. बेटराष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हवामानावर सर्व बाजूंनी वेढलेल्या समुद्राचा मोठा परिणाम होतो. प्रशांत महासागरातील एल निनो व ला निना या वातसंस्थांचादेखील ऑस्ट्रेलियाच्या तापमान आणि पावसावर मोठा परिणाम होतो

प्रशांत महासागरातील ला निना ही वातसंस्था पूर्व ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पावसाला कारणीभूत ठरते. ऑस्ट्रेलियाला दोन वर्षं सलग ला निनाचा सामना करावा लागतोय. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचं तापमान थंड होतं, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे त्यांच्यासोबत समुद्राचं गरम पाणी पश्चिम प्रशांत सागरात घेऊन जातात. समुद्राचं सर्फेस तापमान वाढलं की पाण्याची वाफ होऊन पाण्याचे ढग तयार होतात. यामुळं ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये मुसळधार पाऊस होतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात जवळपास सलग पडणाऱ्या पावसाचं मुख्य कारण हे आहे.

त्याचबरोबर हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढदेखील या तीव्र पावसाळी घटना तसंच भीषण पुरांसाठी कारणीभूत असल्याचं संशोधाकांचं म्हणणं आहे. हिंद महासागराचंच्या पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्याचा प्रभाव ऑस्ट्रेलियातील पावसावर पडतोय. वाढलेलं तापमान हवेतील आर्द्रता वाढवतं, ज्यामुळं अंततः पावसाचं प्रमाण वाढतं.

येत्या काही महिन्यांमध्येही ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस वाढतच राहणार असल्याचा अंदाज तिथल्या हवामानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी वर्तवलाय. सध्याच्या पावसाळा कारणीभूत असलेली ला निना वातसंस्था जरी संपली असली, तरी साधारण सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा तशी परिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच हिंद महासागराकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळंही या काळात ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होते. त्यामुळं येणारे महिनेदेखील अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी निर्वसनाचे असण्याची शकयता नाकारता येत नाही.

 

लिव्हेबिलिटी

अतिवृष्टी, वारंवार येणारे पूर तसंच हवामान बदलामुळं वाढतं तापमान आणि वणवे या सर्वांमुळं ऑस्ट्रेलियाची लिव्हेबिलिटी, म्म्हणजेच देश किती राहण्यायोग्य आहे, यावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेनं गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अहवालात ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नसारख्या शहरांचं तापमान येत्या काळात ५० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचून तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावर आणि व्यवसायांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे.

पूर आणि अतिवृष्टी ही ऑस्टेलियासारख्या बेटराष्ट्रासाठी नवीन नसले तरी पावसाची वाढणारी तीव्रता आणि वारंवार येणारे पूर यांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका पुरातून सावरेपर्यंत लगेच लोकांना पुढच्या पुराला सामोरं जावं लागत आहे. देशातील पावसात होणारे बदलदेखील या अहवालात अधोरेखित करण्यात आले होते, ज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. भारताच्या अनेक भागांमध्येही ऑस्ट्रेलियादेखील आता कमी वेट जास्त तीव्रतेनं पडणाऱ्या पावसाचा सामना करते.

 

 

साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशांत महासागरातील एल निनो या वातसंस्थेमुळं ऑस्ट्रेलियाला उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि वणव्यांना सामोरं जावं लागलं होतं. एल निनो हा ला निनापेक्षा अगदी विरुद्ध संस्था आहे. यामध्ये प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचं तापमान वाढतं, तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेनं वाहणारे वारे पावसाचे ढगदेखील पूर्व प्रशांत महासागराच्या दिशेनं घेऊन जातात. यामुळं ऑस्ट्रेलियात, विशेषतः पसश्चिम ऑस्ट्रेलियात पाऊण कमी होतो आणि दुष्काळ व वणवे वाढतात. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरातील नागरिकांचं वाढत्या वणव्यांमुळं निर्वासन झालं होतं.

१९१० मध्ये रेकॉर्ड ठेवायला सुरवात केल्यापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचं सरासरी तापमान १.४ अंश सेल्सियसनं वाढलं आहे. वाढणाऱ्या प्रत्येक अंशासोबत हवेची आर्द्रता बाळगण्याची क्षमता ७ टक्क्यांनी वाढत जाते. त्यामुळं तापमानवाढी बरोबरच पावसाच्या तीव्रतेची वाढही होणं अटळ आहे.

 

हवामान बदल आणि सरकारवरील रोष 

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हवामान बदल, ऑस्ट्रेलियावर होणार त्याचा परिणाम आणि पर्यावरणपूरक धोरणांचा अभाव हे मुख्य मुद्दे ठरले. या निवडणुकीत माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं लिबरल-उजव्या पक्षांचं सरकार पराभूत झालं आणि पंतप्रधान अँथनी ऍल्बनीज यांचं सेंटर लेफ्ट-लेबर पक्षाचं सरकार सत्तेत आलं.

मॉरिसन यांच्यावर त्यांच्या पर्यावरण आणि आपत्ती विषयक निर्णयांवरून त्यांच्यावर अनेकदा सामान्य नागरिक तसंच तज्ञांकडून टीका झाली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांनी योग्य वेळी फ्लड इमर्जन्सी म्हणजे आपत्काळ घोषित ना केल्यामुळं पुराचं नौकान वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. गेल्या वर्षी डेन्मार्कमध्ये झालेल्या कॉप २६ या जागतिक हवामान बदल परिषदेत मॉरिसन यांनी २०३० कार्बन उत्सर्जन कमी करण्याची किंवा २०५० ते शून्यावर आणण्याबाबत नवी उद्दिष्टं जाहीर केली नव्हती. तसंच त्यांनी वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापर टप्प्याटप्यानं बंद करण्याबद्दलही घोषणा केली नव्हती. यावरून जागतिक नेत्यांकडूनही त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

नवीन निवडून आलेल्या सरकारकडून पर्यावरण विषयक चांगल्या धोरणांची अपेक्षा आहे. तशी आश्वासनंही त्यांनी दिली आहेत. साल २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन २००५ च्या तुलनेत ४३ टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच अपारंपरिक ऊर्जास्रोत, इ-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणं आखण्यात येणार असल्याचंही नवीन सरकारनं घोषित केलंय.

मात्र ऑस्ट्रेलियामध्ये भीषण पूरपरिस्थिती उद्भवली असताना देखील ऍल्बनीज यांनी त्यांचा विदेश दौरा त्यांनी सुरूच ठेवला आणि आज ऑस्ट्रेलियामध्ये परत आले, यावरून त्यांच्यावर सध्या टीका होत आहे. तर पूरपरिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी आणि पीडितांना सहाय्य करण्यासाठी सरकार सर्व पावलं उचलत असल्याचं परत आल्यावर सांगितलं आहे.