India

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

घटनास्थळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाही अटक.

Credit : इंडी जर्नल

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तीन आरोपींवर  चिंचवड पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर आरोपासहित तब्बल १२ कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर सासंबंधी घटनास्थळावरून वार्तांकन करणारे आयबीएन लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांनादेखील चिंचवड पोलिसांनी रविवारी संध्याकाळी उशिरा अटक केली. शनिवारी रात्री उशिरापासून त्यांची चिंचवड पोलीस ठाण्यात चौकशी सुरु होती.

याआधी आज पिंपरी न्यायालयानं शाईफेक करणारे समता सैनिक दल संघटक मनोज घरबडे (वय ३४), समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (२९) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ (४०) या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

“काळ्या रंगाचं धोकादायक द्रव्य टाकत जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल” आरोपींवर कलम ३०७ लावलं गेलं असल्याचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले. शाई फेकल्यानं जीवाला धोका निर्माण कसा होऊ शकतो, हे विचारलं असता “ती शाई असल्याचं काल (नंतर) कळलं, आधी ते काळं द्रव्यच होतं”, त्यामुळं हा गंभीर गुन्हा असल्याचं शिंदे म्हणाले.

मात्र शाई फेकल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या कालमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याव्यतिरिक्त ३५३ (बल प्रयोग करून शासकीय कर्मचाऱ्याला एखादे काम करण्यास परावृत्त किंवा अवरोध करणं), कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती व गाणी), ५०० (अब्रुनुकसानी), ५०१ (अब्रुनुकसानीकारक साहित्य छापणे किंवा कोरणे), १२० (ब) (फौजदारीपात्र कट) यासहित एकूण १२ कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबद्दल माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक कलम ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात तीनही आरोपींना तुरुंगात पाठवण्यासाठी अडकवण्यात आल्याचं त्यांचे वकील ऍडव्होकेट सचिन भोसले यांनी म्हटलं आहे. भारतीय दंडविधानानुसार कलम ३०७ हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

 

 

“जाणीवपूर्वक विचार करून या तिघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही सर्व वकील बंधूंनी आतमध्ये (न्यायालयात) याच गोष्टीला विरोध केला की ३५३, २९४ वगैरे ठीक आहे. सरकारी कामात अडथळा आला असं तुमचं म्हणणं असेल, तर तेही ठीक आहे. पण ३०७ लावण्यामागे तुमचा उद्देश फक्त आणि फक्त या तिघांना तुरुंगात पाठवण्याचा आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. फक्त राजकीय दबाव आणि वातावरण बिघडवण्याच्या उद्देशानं हे केलं गेलं आहे,” भोसले म्हणाले.

उच्च न्यायालयात ही तक्रार रद्द करण्यासाठी याचिका करणार असल्याचंही ते म्हणाले.

शुक्रवारी चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील एका कार्यकर्त्याच्या घरून बाहेर पडत असताना त्यांच्यावर शाईफेक कारणात आली. पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेच्या आधी बारामती तालुक्यातील सोमेश्वर सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील यांना काळं फासणाऱ्या व्यक्तीला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा केली असल्याचंही समोर आलं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज घरबडे हे पिंपरी-चिंचवड परिसरात समता सैनिक दलासाठी काम करणारे कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. डाॅ.बाबाासहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता सैनिक दलाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असतो. तसंच अटक झालेल्या तिघांपैकी विजय धर्म ओव्हाळ हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्यानं शनिवारी सकाळी आघाडीतर्फे चिंचवड पोलीस स्थानाकावर मोर्चा नेण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या घटनेनंतर बंदोबस्तावर असणाऱ्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांचं  निलंबन केलं होतं. मात्र यावर पाटील यांनी पोलिसांचं निलंबन करू नका अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शाई फेकताना बरोबर “अँगल”नं फोटो घेणाऱ्या पत्रकाराचा शोध घेण्याचंही पाटील यांनी शनिवारी लावून धरलं होतं. रविवारी संध्याकाळी आयबीएन लोकमतच्या वाकडे यांना अटक झाल्यानंतर समाज माध्यमांवरून पाटील, महाराष्ट्र शासन आणि पोलिसांवर जोरदार टीका सुरु झाली आहे.

 

याबाबतीत आणखी माहिती आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल.