Quick Reads
'शिवाजी कोण होता' वाचलं आणि मी बदललो
आज गोविंद पानसरेंचा स्मृतीदिन
लहानपणी हादग्याच्या सणात ‘शिवाजी आमुचा राजा, शिवाजी हिंदूंचा राजा...’ अशी गाणी कानावर पडायची. तोवर ब.मो. पुरंदरेंच्या ‘राजा शिव छत्रपती‘ मधूनच शिवाजी आमच्यापर्यंत पोहचला होता. त्यातली शिवाजीची ‘मुसंडयांचा कर्दनकाळ‘ ही प्रतिमाच मनावर ठसली होती. त्यातलं अफजलखानाचा वध, औरंगजेबाचे अत्याचार वगैरे वाचून मुसलमान हे आपले शत्रू आहेत अशी धारणा पक्की झाली होती. संघाच्या कार्यक्रमांत वर्षभर रमायचं हेही एक महत्वाचं कारण होतं. अंतोनियो ग्रामश्चीच्या भाषेत सांगायचं तर संघाच्या 'सांस्कृतिक राजकारणात' मी अडकलो होतो.
अशा या वातावरणात ‘हे चोपड वाच म्हणजे जरा अक्कल येईल‘ असं म्हणत कुणीतरी पानसऱ्यांचं ‘शिवाजी कोण होता‘ माझ्या हातात बळजबरीनंच टेकवलं. या पुस्तकात ‘गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू राष्ट्रकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, ‘अरे तुरे च्या भाषेत फक्त शिवाजी या नावानं उल्लेख होता.’ पुस्तक कसलं, ती तर संदर्भ यादीसह असलेली सत्तरेक पानी छोटीशी पुस्तिका होती.
उत्सुक्ततेनं वाचायला सुरुवात केली आणि हादरलोच. आजवर शिवाजीवर वाचलेलं, आणि यात छापलेलं, याचा काहीही ताळमेळ बसत नव्हता. वीरश्रीनं भरलेलं, भावना चेतवेल असं काहीही या पुस्तकात नव्हतं. पण जे होतं ते अस्सल होतं. खरं आणि न खोडता येणारं होतं. शांत, समंजस, प्रवाही आणि नेमक्या भाषेत मांडलेला हा शिवाजी ऐकल्या वाचलेल्या शिवाजीपेक्षा फार वेगळा होता. या पुस्तकातली, कुणीतरी आपल्या आज्या-पणज्याची थोरवी त्याच्या नादान वारसाला सांगणारी भाषा हळूहळू गुंगवू लागली. पुस्तिका सलग वाचली आणि डोकं भरकटलंच. पुस्तिकेतले मुद्दे बिनतोड होते, त्यांना पुरावे होते. भाषा नेमकी होती. पानसऱ्यांचा शिवाजी मला बेहद्द आपला वाटला आणि शिवाजीबद्दल आणखी वाचताना हा शिवाजी मला जास्त पटत गेला. शाखेला दांड्या बसल्या आणि शहाण्या माणसांनी लिहिलेलं वाचायची सवय लागली. चुकीची संगत सुटली आणि कवटीत असलेल्या मेंदू नावाच्या अवयवाला विचार करायची सवय लागली.
‘शिवाजी कोण होता’ वाचलं आणि माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया सुरु झाली, नाही तर मीही ‘जय शिवाजी, जय भवानी‘ म्हणत, ‘मारा कापा , मुसंडयांना पाकिस्तानात हाकला‘ म्हणत दंगलीत सामील झालो असतो, बाबरीकांडावेळी महाआरत्या करत बसलो असतो.
पुढे आणखी वाचत गेलो, शिकत गेलो, चळवळीशी संबंध आला आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हे काय रसायन आहे ते समजत गेलं. ‘शिवाजी कोण होता‘ या त्यांच्या पुस्तिकेमुळे माझ्यातली जातीय, आर्थिक वर्चस्ववादी, ब्राम्हणी जाणीव विरू लागली. मी शिकू लागलो.
तोवर वाचलेले साम्यवादी विचारवंत फक्त वर्गवादी दृष्टीकोनातून विचार करत होते. कॉ.पानसरे हे मी पाहिलेले, वाचलेले पहिले विचारवंत होते, जे मार्क्सवादी असूनही सोप्या, सामान्यांच्या भाषेत लिहित होते. वर्गीय दृष्टीकोनाबरोबरच स्त्रीवादी, धर्मजातविरोधी मांडणी करत होते. त्यांच्या पुस्तिकेतले ‘शिवाजीनं राज्य कारभाराची भाषा मराठी केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. शिवाजीच्या सैन्यातले, दरबारातले अठरा पगड जातींची मांदियाळी, मुसलमान कारभारी, कुळवाडीभूषण शिवाजी, ब्राम्हणांच्या राज्याभिषेकाला विरोध ते शिवाजीचे ब्राम्हण सहकारी, शिवाजीनं गुलामांच्या व्यापारावर घातलेली बंदी, काळाच्या तुलनेत असलेला शिवाजीचा स्त्रियांबद्दलचा प्रगत दृष्टीकोन असे महत्वाचे संदर्भ शिवाजी समजायला मदत करत होते. आपल्याच इतिहासाकडे नव्या स्वच्छ नजरेतून पहायला शिकत होतो.
पुढे पानसरेंना ऐकायची संधी मिळाली. त्यांचं, रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांनी आपले मुद्दे मांडणं, प्रवाही संवादी शैलीत बोलणं मला आजवर ऐकल्या-वाचलेल्या पुस्तकी संज्ञात्मक जड भाषेपेक्षा लवकर समजलं. विचार करायला भाग पाडू लागलं. त्यांच्या लिहिण्याची जी खासियत होती तीच त्यांच्या बोलण्याचीही होती. ऐकणारे फक्त भारावून जायचे नाहीत, तर पानसरे काय म्हणतात यावर विचार करायचे, चर्चा करायचे, शंका विचारायचे, उत्तरं शोधायचे. पानसरेंचं लिहिणं, बोलणं, संघर्ष करणं, पण विचारांशी निष्ठा असलेलं साधं जगणं एकमेकांपासून वेगळं काढता येत नव्हतं. ते फक्त विचारवंत नव्हते तर जमिनीवर लढणारा, विचार मांडणारा कार्यकर्ता विचारवंत होते.
पानसरे भाकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्यसुद्धा होते. तरीही ते पोथीनिष्ठ नव्हते. कोल्हापुरातल्या सगळ्या डाव्या, पुरोगामी चळवळींशी संबंध ठेऊन होते, त्यांना मदत करत होते. त्यामुळेच एन. डी. पाटील सर, दाभोलकर, शांताराम गरुड अशी वेगवेगळी मतप्रणाली असणारी माणसं त्यांना ‘आपला‘ समजायचीच, पण तेव्हाच, तरुण, मिसरूड फुटलेली पोरंही त्यांच्याकडे हक्कानं चर्चा करायला यायची.
नंतर मी जेव्हा दोन हजार आठमध्ये कोल्हापुरात आलो, तेव्हा पानसरे आणखीनच कळत गेले. किती लोकांसाठी, समाजगटांसाठी त्यांनी काम केलं, संघर्ष केला ते जाणवत गेलं. फेरीवाल्यांपासून मोलकरणी, कामगार, रिक्षावाले, तरुण विद्यार्थी सगळ्यांसाठी ते भांडताना दिसत होते. कोल्हापूरच्या टोल मुक्ती आंदोलानात ते एन.डी. पाटील सरांबरोबर पुढे असायचे. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करायचे. लिखाण करायचे, महाराष्ट्रभर भाषणं देत फिरायचे, पक्षाचं काम करायचे. ही उर्जा थक्क करणारी होती.
‘खानदानी रितभात‘ असणाऱ्या कोल्हापुरात आजवर जातीय दंगलीच्या घटना अपवादात्मकच घडल्या. आंतरजातीय लग्नांचं प्रमाण इतर जुन्या शहरांपेक्षा इथं जास्त आहे. पानसरे जिवंत असेपर्यंत एकही ऑनर किलिंगची घटना कोल्हापुरात घडली नाही.
मी राहतो त्या चौकापलीकडे, क्रांतिसिंह नाना पाटील नगर आहे. पानसरेंनी तिथं बेघर कष्टकऱ्यांना जमवून त्यांना हक्काची घरं मिळवून दिली. त्यांच्या डोक्यावर निवारा उभा केला. अशी कितीकरी कामं सांगता येतील पण महत्वाचं हे, की हे सगळं करताना मी कोल्हापुरात त्यांच्या नावाचं होर्डिंग, बॅनर पाहिलं नाही. कुठल्या चौकाला त्यांचं नाव दिलेलं पाहिलं नाही. पानसरे साधे होते. साध्या भाषेत बोलायचे. समोरच्याचं ऐकायचे, आपला साधेपणा ते सहजपणे जपायचे. मी त्यांना रस्त्यावरून पायी फिरताना पाहिलंय. एखादा पुढारी किंवा ‘मोठा माणूस’ फिरतोय असं काही कधी वाटलंच नाही.
पानसरे हिंदुत्वाच्या विरोधात बोलायचे, पण हिंदूंच्या 'विरोधात' नव्हते, त्यांच्या बोलण्याचा प्रतिवाद करणं अवघड होतं पण त्यांच्याशी संवाद मात्र करता यायचा. त्यांच्याभोवती कुठलं वलय नव्हतं, तर आपला थोरला भाऊ किंवा वडिलधारी व्यक्ती किंवा आपल्या भल्याची काळजी करणारा ‘कळवळ्याच्या जातीचा माणूस’ म्हणून त्यांच्याकडे जो आपलेपणा होता, त्याला तोड नव्हती. पानसरे यापेक्षाही अधिक काही असतील पण मला समजलेले पानसरे असे होते, त्यामुळेच त्यांच्याशी माझं (एकतर्फी) नातं जुळलं, मी सुधारलो.
मराठा क्रांती मोर्चादरम्यान, महारष्ट्रात जातीय दंगली घडतील असं वातावरण होतं. काही लोक हे वातावरण आणखी तापेल असा प्रयत्न करत होते. पानसरेंच्या कार्यकर्त्यांनी यादरम्यान शिवाजीच्या पुस्तकाची विक्री केली. त्यामुळे, ‘मिळालंच पाहिजे, कोण म्हणतो देत नाय..’ अश्या मानसिकतेत असलेला, वैफल्यग्रस्त्तेतून जातीयवादाकडे झुकू लागलेल्या गावाखेडयातून आलेल्या तरुणांना ही पुस्तकं मिळाली आणि महाराष्ट्रातल्या गावागावात तापलेलं वातावरण काहीसं थंड झालं. शिवाजी हा फक्त मराठ्यांचा नाही, फक्त हिंदूंचा नाही, तो सगळ्यांचा आहे हे गावागावात पोहचलं आणि एका कट्टरतावादी सांस्कृतिक राजकारणाला शह बसला. नऊ दहा भाषांमध्ये जवळपास चार पाच लाख कॉपीज प्रकाशित झालेल्या या पुस्तिकेचे वाचक कोण नाहीत? स्वयंघोषित विचारवंत आणि मोजके हिंदुत्ववादी सोडले तर सगळ्या धर्मातले, सगळ्या जातींमधले आहेत. एखाद्या पुस्तकाचं यश, केवळ त्याच्या प्रसिद्ध होण्यात नसतं तर त्या पुस्तकामुळे किती लोकांमध्ये आणि काय बदल झाला यात असतं. चांगला लेखक फक्त मनोरंजन करत नाही, फक्त माहिती पुरवत नाही तर माणसाला ‘शहाणं‘ करण्याची प्रक्रिया सुरु करतो.
कॉ. पानसरेंमुळे माझी ‘शहाणं’ होण्याची, विचार करण्याची प्रक्रिया सुरु झाली, विस्तारली. माणसं मरतात, ‘फुली मारून’ मारली जातात पण कॉमेड पानसरेंसारखी माणसं त्यांच्या कामातून, लिखाणातून आपल्या जवळ राहतात, म्हणूनच अशी माणसं उजव्या धर्मांध राजकारणाला नको आहेत. पानसरेंसारख्या माणसांचा वैचारिक वारसा पुढे नेणं आणि प्रागतिक असं प्रति सांस्कृतिक राजकारण उभं करणं हे आता आपल्यासमोरचं ध्येय असायला हवं.