Quick Reads
बुद्धीचा पालट धरा रे काही..
वैज्ञानिक दृष्टीकोन हे संवैधानिक कर्तव्य आहे
लोकशाहीत वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाचा. मूळात वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणं हे आपलं प्रत्येकाचं संवैधानीक कर्तव्य आहे. ह्याच कर्तव्याचा आग्रह धरणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली. यावर्षी 20 ऑगस्ट, हा त्यांचा पाचवा स्मृतीदिन वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणून पाळला गेला.
अतिवृष्टीने आधीच बेजारलेली केरळातली लोकं. त्यात शुक्रवारच्या पावसाने जाता-जाता आणखी एक तडाखा दिला. मागच्या शंभर वर्षातला हा सर्वाधिक पाऊस आहे. एकदाचं पाणी ओसरलं तरी जनजीवनाची विस्कटलेली घडी बसायला अजून वेळ लागणार आहे. देशासह जगभरातून मदतीचे हात पुढे येताहेत. पण एकीकडे महापुराने गांजलेली आधीच घाबरेली केरळची साधीभोळी लोकं जगण्याशी दोन हात करत असतानाच रिजर्व बॅंकच्या एस गुरुमुर्ती यांनी लोकांच्या भीतीत एक नवी भर घातली.
रिजर्व बॅंकेच्या मंडळावर नव्याने सदस्य म्हणून आलेले गुरुमुर्ती हे स्वदेशी जागरण मंच या संस्थेचे सह समन्वयकही आहेत. त्यांचं म्हणनं असंय की, केरळमधे यावर्षी आलेल्या महापुराचा संबंध अयप्पन देवाच्या प्रकोपाशी आहे. केरळात साबरीमाला मंदिर आहे. या मंदिरात प्रथेप्रमाणे वय वर्ष दहा ते पन्नास या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नाही. तो मिळावा यासाठी इथल्या स्त्रियांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. या सगळ्या घटनेचा अयप्पन देवाला राग येऊन केरळात महापुर आला असावा, असं एस. गुरुमुर्ती यांनी आपल्या ट्टिवटमधे म्हटलंय.
गुरुमुर्ती यांचं हे विधान फार अनेपक्षित वाटावं किंवा आपण आश्चर्यचकित व्हावं असं त्यात काही नाही. कारण वैज्ञानिक दृष्टीकोन हरवून बसलेली शिकल्या सवरलेली माणसंही कशी एकमेकांच्या जीवावर उठतात याची अनेक उदाहरणं मागच्या काही महिन्यांत समोर आलीयेत. केरळमधल्या इडूक्की या ठिकाणी एका माणसाने दैवी शक्ती मिळाव्यात म्हणून आपल्याच घरातल्या चार जणांचा जीव घेतला. एक तांत्रिकाच्या सागंण्यावरुन उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबादमध्ये आई-वडिल दोघांनी मिळून त्यांच्याच सहा वर्षाच्या मुलीला मारलं. तांत्रिकाचं म्हणनं होतं की या मुलीचा बळी दिला की तुम्हाला होणारं नंतरचं मुल जास्त सदृढ असेल. दुस-या एका घटनेत, बायकोच्या बाळंतपणासाठी डॉक्टरकडे न जाता स्वतः युट्यूबवर विडियो प्रसुती करणाऱ्या नव-याच्या हट्टापायी तामिळनाडूतल्या त्रिप्पुर इथं एका महिलेला बाळासह जीव गमवावा लागला. या सर्व घटनांत, माणसांचा हरवलेला विवेक हा एक समान धागा आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा लढा त्याचसाठी होता.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती ही चळवळ उभारून दाभोळकर बुद्धीप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत होते. २० ऑगस्ट २०१३ रोजी मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. त्या घटनेला यंदा पाच वर्ष होताहेत. मारेकरी मात्र अजूनही मोकाट आहे.
डॉक्टरांनी सुरू केलेलं हे काम अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावं यासाठी ऑल इंडिया पीपल सायंस नेटवर्क यांनी २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून जाहिर केला आहे. ऑल इंडिया पीपल सायंस नेटवर्क सोबत विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ४०हून अधिक संस्थांचा समावेश आहे. दाभोळकरांचा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आग्रह हा साधा, सरळ आणि सोपाये. जे पुराव्यानिशी सिद्ध होतं, त्याच्यावर विश्वास ठेवा.
वैज्ञानिक दृष्टीकोन आणि भारतीय संविधानः
देशाच्या प्रत्येक नागरिकानं वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा. भारताच्या संविधानानूसार ते आपलं कर्तव्य आहे. “वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे, मानवता, चौकसपणा आणि प्रश्न विचारण्याबरोबरंच सामाजिक सुधारणांसाठी आग्रह असणे ही नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत.” - भारतीय संविधानः कलम (५१, अ).
वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific Temperament) ही तशी मूळात भारतीय संकल्पना आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, डिस्कवरी ऑफ इंडिया ह्या त्यांच्या पुस्तकात ते म्हणतात, “वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीची परिक्षा अन् चाचणी घेतल्याशिवाय तिच्यावर विश्वास न ठेवणे. एकेकाळी आपण घाईने काढलेले निष्कर्ष, नव्या पुराव्याने चुकीचे सिद्ध होत असतील तर ते तपासून सोडायची तयारी असावी. काल्पनिक गृहितांवर आधारित संहिता नाकारून फक्त निष्कर्षानेच पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकणाऱ्या तथ्यांवर विश्वास ठेवण्याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणता येईल.”
स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात अनेक बुद्धीवादी, संघटित विज्ञानवादी समाजसंस्था, जनविज्ञान चळवळी आजपर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन लोकांमध्ये रुजावा यासाठी झटत आहेत.
बऱ्याचदा विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या दोन शब्दांमध्ये गल्लत होऊ शकते. ते समानअर्थी म्हणून वापरले जाऊ शकतात. पण त्यांच्यात फरक आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे चौकसपणा असा जो तुम्हाला प्रश्न विचारायला आणि विचार करायला प्रवृत्त करतो. उच्चपदस्थ अधिकारवाणीने तुम्हाला कुणी काही सांगितलं तरी फक्त त्यावर समाधानी न राहता त्याला प्रश्न विचारणं ही वैज्ञानिक दृष्टीकोनाची बैठक आहे. आपल्या सर्वांकडे सुप्त अवस्थेत हा वैज्ञानिक दृष्टीकोन जितका सामाजिक आणि राजकीय असतो तितकाच तो शास्त्रीय असतो. नेहरुंनी वैज्ञानिक दृष्टीकोनाला विमुक्त माणसाचं साहस म्हटलंय.
शास्रज्ञांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेल्या तथ्यांचा संग्रह म्हणेज विज्ञान ही ढोबळ व्याख्या आपण सगळे शाळेत शिकतो. आपली शिक्षणपद्धती आपल्याला तसं शिकवते. प्रत्यक्षात मात्र विज्ञान हे वेगळंच असतं. शास्त्रीय पद्धतींचा वापर करुन आपलं निरिक्षण, प्रायोगिकतेच्या आधारे गृहितकांची पडताळणी करत या भौतिक जगाचा धांडोळा घेत राहणं म्हणजे विज्ञान होय. जगातली प्रत्येक वस्तू ह्या लौकिक आहेत, अलौकिक असं जगात काहीच नाही. त्यामुळेच इथं जे काही आहे त्याला विशिष्ट नियमांची चौकट आहे. त्या चौकटीची लांबी, रुंदी मोजत ते नियम उलगडविण्याचं सामर्थ्य मानव समूहात आहे.
ज्ञानाचे असंख्य दरवाजे जे परंपरांमुळे आत्तापर्यंत गुपितं म्हणून तसेच बंद पडले होते. याअगोदर पूर्वी कधीच कधी उघडले नव्हते. विज्ञानवाटांनी त्या दरवाज्यांवर उजेड पेरला आहे. प्रत्येकवेळी प्रश्न विचारायला भाग पाडणारा चौकसपणा आपल्यात रुजवणं आणि व्यवहारात वावराताना बुद्धीवादाने मार्ग चोखाळत राहणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन होय.
हा लेख सर्वप्रथम scroll.in वर प्रकाशित झाला. लेखकाच्या व प्रकाशकांच्या परवानगीने अनुवादित व पुनर्प्रकाशित
अनुवाद : अंगद तौर