Quick Reads
तुंबाड मधली भूतं नाही, माणसं भीतीदायक आहेत!
राही अनिल बर्वे दिग्दर्शित तुंबाड
'तुंबाड' पहिल्यांदा बघितला तेव्हा सिनेमा हॉल मध्ये मी सोडून चार लोकं होती. जेवढी अपेक्षा होती त्याहून खुप काही दिलं सिनेमाने. हे सगळं आपण जसं फर्स्ट हॅन्ड अनुभवलं तसं इतरांनाही अनुभवावं या उद्देशाने अन वाचणाऱ्याला स्पॉईलर होऊ नये म्हणून तुंबाड वर एकही शब्द लिहायचा नाही असं ठरवलेलं. प्रचंड कौतुक वाट्याला आल्याने त्याबद्दल अर्थात सोशल मीडियावर भरभरून लिहिलं गेलं. भारतीय सिनेमात आजवर कधीही न पाहिलेल्या व्हिज्युअल्स बद्दल... लालसेपोटी रसातळाला गेलेल्या कुटुंबाबद्दल... हस्तर नावाचा दैत्य आणि त्याच्या आख्यायिकेबद्दल... असं बरच काही. बऱ्याच जणांना तुंबाड आवडला आहे, तर काहींना फक्त पहिला अर्धा तास चांगला म्हणजे 'घाबरवणारा' अन उर्वरित सिनेमा अगदीच फ्लॅट आणि 'न घाबरवणारा' वाटला. तशा पोस्ट आणि रिऍक्शन फेसबुकवर वाचल्या. कुणाला काय आवडावं अन काय आवडू नये हे अगदीच सापेक्ष आहे.
जगभर प्रसिद्ध असलेले हैलोवीन, ब्लेअर विच प्रोजेक्ट, पैरानॉर्मल एक्टिविटी मला अजिबात आवडत नाहीत. स्लैशर फ़िल्म च्या नावाखाली चाललेली कापाकापी मला हल्ली न्यूट्रल चेहरा ठेवून बघता येते. जम्प-स्केअर्स अन धडामधुडूम आदळणारं पार्श्वसंगीत ह्या ट्रिक आता फुसक्या वाटतात. 'तुंबाड' न आवडलेल्या प्रेक्षकांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे. हे वाचून तो आवडावा ही सुद्धा अपेक्षा नाहीये. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तुंबाड बघितला तेव्हा गर्दी असल्याने पुढून चौथ्या रांगेत बसून बघावा लागला. गर्दीत प्रेक्षकांचा नको त्या सिन ला हशा ऐकू येण्याचा अनुभव जास्त भयावह होता. सिनेमातील सरप्राईज इलेमेंट आधीच समजून सुद्धा या वेळी त्याने मला जास्त सुन्न केलं त्या अनुभवाबद्दल हा प्रपंच. आपल्या 'भय' ह्या संकल्पनेच्या व्याख्या किती तोडक्या आहेत याबद्दल.
'तुंबाड' नेमका कुठल्या जॉनर मध्ये मोडतो याबाबत अनेकांची वेगवेगळी मतं असली तरी मला स्वतःला हा सोशल हॉरर म्हणून जास्त अपील झाला. अर्थात त्यातल्या जेन्युअन आणि पटकन कनेक्ट होणाऱ्या हॉरर सीन्स चं स्वतःचं असं महत्व आहे. ते नाकारातही येणार नाही. मात्र 'तुंबाड' मध्ये केवळ व्हिज्युअल्स, लालसा याउपर जाऊन अनेक अंगाने बोलण्यासारखं आहे. त्यात दाखवलेले लॉक आणि दरवाजे याबद्दल एक सविस्तर लेख होऊ शकतो इतकं ते प्रभावी आहे. तुंबाड मध्ये दाखवलेली वेगवेगळी गुंतागुंतीची आणि गूढ कुलुपं मला जास्त जीवघेणी वाटली. अशी कुलुपं जी वर्षानुवर्षे आपल्या पोटात रहस्य लपवून आहेत. अशी कुलुपं जी नेमकी उघडली नाही गेली तर उघडणाऱ्याचा जीव घेऊ शकतील, इतकी आतल्या गाठीची. कुलुपं ज्यांना स्वतःचं मॅकेनिजम आहे अन स्वतःचा वेगळा स्वभाव ही.
१९१८ ते १९४७ या कालखंडात घडत असलेला 'तुंबाड' एका कुटुंबातील तीन पिढ्यांची कहाणी दाखवताना भोवतालचे सूक्ष्म बदल ज्या पद्धतीने टिपतो ते अफाट आहे. परिस्थिती बदलली तरी माणसाच्या हावरेपणाची प्रवृत्ती तशीच पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाते, ही साधी गोष्ट सांगताना राही बर्वे ने अनेक सबटेक्स्ट अशा रीतीने गुंफले आहेत की 'तुंबाड' केवळ एका कुटुंबाची कहाणी न राहता संपूर्ण देशाची कहाणी सांगू बघतो. आणि हे सगळे सबटेक्स्ट निदर्शनास येताना मला राहून राहून पाश च्या 'सबसे खतरनाक होता है' ह्या कवितेतील काही ओळी आठवत होत्या. अर्थात दोन्ही कलाकृतींचे संदर्भ पूर्णतः वेगळे असले तरी ज्या शांतपणे विनायक, त्याचं घर, त्याची मुलं अन आख्खा पसारा कधीही बाहेर येऊ शकणार नाही अशा खाईत जात होता तरी त्याचं थंडपणे वावरणं जास्त भयावह होतं. प्रेक्षकांच्या तशा सिन ला प्रतिसाद जास्त घाबरवणारा वाटला.
पडद्यावर जे चालुये ते अनेकांच्या डोळ्यात खुपत नव्हतं हे जास्त हॉरर होतं. माझ्यासाठी तरी. विनायक ठेवलेल्या बाईसोबत शरीरसुख उपभोगताना गळ्यातलं जानवं कानावर अडकवून घेतो हे जास्त भयावह होतं. आपण जे करतोय त्याबद्दल अजिबात गंड नसलेला विनायक जेवताना मुलाबाळांसोबत हात जोडून, डोळे मिटून 'वदनी कवळ घेता' म्हणतो हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त भयावह होतं. शेतकरी, सुतार, चांभार, लोहार जसे आपली परंपरागत कला मुलांना शिकवू बघायचे त्या प्रकारे विनायक त्याच्या लहान मुलाला हस्तर कडून मुद्रा कशा लुटायच्या हे शिकवतो. पहिल्यांदा बापासोबत मुलगा ह्या हावरटपणाच्या प्रवासाला जातो त्या दिवशी त्याची पूजा करून पाठवलं जातं. लालसेचा वारसा चालवण्यात हा पोरगा बापाच्या एक पाऊल पुढे असतो. पहिली मुद्रा मिळवल्यानंतर विनायक त्या मुलाला सांगतो की 'ही तुझी पहिली कमाई आहे, सांभाळून ठेव!' त्यावर तो बापाला उलट विचारतो, 'ये मुद्रा अगर बाजार में बेचने जाओ तो कितने दाम मिलेंगे?' माझ्यासाठी हे सगळं जास्त हादरवनारं होतं. घरी परतल्यावर त्या मुलाची आई कुतूहलाने विचारते की 'क्या हुआ तुंबाड में?' त्यावर तो लहानगा उत्तर देतो की, 'ये बाबा और मेरे बीच की बात है, तू सिर्फ घर संभाल।' हे उत्तर देताना तो आईला सोन्याची मुद्रा दाखवण्याऐवजी सोनेरी कागद गुंडाळलेलं चॉकलेट देतो. हे सगळं पाहून जर भय वाटत नसेल तर मला वाटतं आपल्या संवेदनशीलतेची परिमाणं नव्यानं तपासावी लागतील.
लहानगा मुलगा आपली पहिली मुद्रा बापाने घरात 'ठेवलेल्या' बाईला दाखवत फूस लावू बघतो. 'बाबा ने तो सिर्फ तुम्हें रखा है, मैं तो तुमसे शादी करूँगा' अशी लालच दाखवतो. तिच्या 'उमर क्या है तुम्हारी' ह्या प्रश्नावर हा गडी सोन्याची मुद्रा हातात देतो. 'अब से मैं रहूंगा और कुछ साल बाद तो सिर्फ मैं ही रहूंगा' हे त्याचं तिला उद्देशून असलेलं वाक्य माझ्या मेंदूला झिणझिण्या देऊन गेलं. आणि प्रेक्षकांचा त्या सिन ला असणारा हास्यकल्लोळ हा खरा हॉरर होता.
पहिल्या सिनमध्ये वाड्यात सरकार विनायक च्या आई कडून हाताने मैथुन करून घेतो, ते समोर हस्तर ची मोठी मूर्ती असताना! 'मुद्रा कब मिलेगी' ह्या तिच्या प्रश्नःवर जख्ख म्हातारा सरकार तिला गप्प करतो अन तुझं काम चालू ठेव असं बजावतो. विनायक मोठा झाल्यावर त्याने ठेवलेली बाई देखील त्याला मुद्रा बद्दल विचारते न हा तिला गप्प करतो. विनायकचा आता त्याच्या आईकडून हाताने करून घेणारा सरकार झालेला असतो अन ठेवलेली बाई म्हणजे पुन्हा विनायक ची आई झालेली असते हे अगदी भयावह आहे.
अनेक दिवसांनी घरी गेल्यावर बायकोने धान्य दळण्याचं काम सुरू केलय हे बघून चिडतो अन तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. हे करत असताना त्याची बायको देखील ते एन्जॉय करू लागते हे हॉरर आहे. दाढी करण्याचा सोन्याचा फावडा, सोन्याचं लाईटर, मुलाला तोंडात सोन्याच्या मोहरेने मध चाटवणं ह्या टोकाला पोचून सुद्धा त्याची हाव जरासुद्धा कमी होत नाही हे हॉरर आहे. आपल्या मुलाने आपण ठेवलेल्या बाईला मुद्रा दिली आहे हे समजल्यावर तो मुलाला फटके देऊ पाहतो, पण हा लालसेची एक पायरी आपल्यापुढे गेलाय हे समजल्यावर त्याचा सगळा राग निवळतो. बायांच्या बाबतीत 'और कुछ साल धोती में रह' असं बजावल्यावर मुलगा उलट विचारतो, 'और तब तक?' तेव्हा विनायक आणि तो मुलगा एकमेकांकडे बघून ज्या विकृत पद्धतीने हसतात ते हॉरर आहे. त्यांनतर लगेच मुलगा आणि विनायक दोन्ही मिळून बायांवर पैसे उधळताना दिसतात. 'तुंबाड नहीं हुआ तो क्या हुआ, वाडा तो अपना हुआ ना' हा विनायक ने त्याच्या लहानपणी आईला विचारलेला प्रश्न इतक्या वर्षांनंतर विनायक चा मुलगाच त्याला विचारतो तेव्हा हावरेपणाचं संक्रमण पाहून जीव दडपतो, ते खरं हॉरर आहे.
आधी बस ने प्रवास करणारा विनायक नंतर मोटारसायकल आणि स्वतःची चारचाकी घेऊन तुंबाड च्या वाड्यात हस्तर कडून मुद्रा ओरबाडण्यासाठी जात असतो. दरम्यान त्याच्यात झालेल्या बदलासोबत आजूबाजूचे सामाजिक बदल अचूक टिपले आहेत. नवरा नसताना विनायक ची बायको आधी 'ब्राह्मणी के हाथ पिसा शुद्ध आटा' अशी पाटी लावून स्वतः धान्य दळून द्यायचं काम करते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर दळण्यासाठी गिरणी तर आलेली असते पण त्यावर असणारे कामगार कोण दाखवले आहेत हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला समाजशास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. 'The world has enough for everyone's need, but not for everyone's greed' ह्या महात्मा गांधींच्या ओळींने सिनेमाची सुरुवात होते. मुद्रा मिळवून आलेला भरमसाठ पैसा मात्र 'देशाची फाळणी झालीये, अन आपल्याला त्याचा बदला म्हणून काहीतरी करायला पाहिजे' अशी विचारधारा असणाऱ्या लोकांच्या हातात जात असतो. पडद्यावर येणारं पाहिलं वाक्य अन शेवटाला 'Greed' साठी झालेली विनायक ची फरपट, अन त्याचे पैसे अशा हातात जाणं हा कॉन्ट्रास्ट सुद्धा मला जास्त भयावह वाटला.
विनायक चं आपल्या मुलावर आपली लालसा लादणं अन त्या वयात सुद्धा ओरबाडण्याची सोय करून ठेवणं आणि ययाती ने आपलं तारुण्य मुलाला वार्धक्य देऊन उपभोगणं ह्या दोन्ही गोष्टींचा भावनिक आकृतिबंध मला एकच वाटतो. सिनेमात विनायक हस्तर चं म्हणजे एका अर्थानं भूताचं अक्षरशः शोषण करत असतो. तुंबाड मध्ये भूत माणसाला नाही तर माणसं भुताला घाबरवतात ह्या राही बर्वे च्या वाक्याचा जागोजागी प्रत्यय येतो. पाश म्हणतो -
जो हर क़त्ल हर कांड के बाद
वीरान हुए आंगन में चढ़ता है
लेकिन आपकी आँखों में मिर्चों की तरह नहीं गड़ता है'
'तुंबाड' मध्ये हस्तरचा शाप लागलेली आजी, तिचं ओंगळवाणे रूप, हस्तर चं रघु ला एका झटक्यात गोळामोळा करून टाकणे प्रेक्षकांना हॉरर वाटतं. आणि बाकी गोष्टी पडद्यावर पोकर फेस ने किंवा हसत हसत आपण पाहू शकतो हे काहींना जास्त हॉरर वाटतं. मी त्यापैकी एक.