Quick Reads
किमान जगण्यापुरता श्वास विचार करण्यासाठी...
चित्रकथी: भाग १
दोस्ता,
या देशानं पहिल्यांदा पाहिलं... की तरुणांची ऊर्जा काय असते ते. पंधरा कोटी पहिले मतदार १८ ते २३ वर्ष वयो गटांतले. त्यातही सर्वाधिक शहरी भागांतले. डोळे दिपवणाऱ्या बाजारात कानात वारं गेलेल्या वासरांसारखं जसं ते उधळत होते, तसेच ते पहिल्यांदा मतदान करणारे होते. त्यांच्यासाठीचं सरकार निवडणारेही ठरणार होते. काही घटना आधीच्या काळात घडल्या त्यात महत्वाची नोंद घ्यायला भाग पाडलं ते घरातल्याच पहिल्या मतदात्यानं. तो स्वध्याय परिवारातल्या मित्रांतही होता, तो आंबेडकरी- डाव्या चळवळीच्या मित्रांतही क्रांतीची भाषा बोलत कलापथकात गाणी कोकलत होता. आणि विशेष लक्षात आला, तो लोकपालासाठी तत्कालीन प्रतिगांधीच्या आंदोलनातल्या मोर्चातही सहभागी झाला तेव्हा. त्याला समाजाची जशी प्रचंड कणव होती, तर सगळ्यांच्या स्पर्धेत मागे पडण्याची भीतीही. जितका तो विद्यार्थी शिबिरांना जायचाच तितक्याच समरसतेनं तो फर्स्ट डे फर्स्ट शोही पाहायचा, मॉलमधल्या स्पोस्ट्स स्टेडियममध्येही वीकेंडला बीयर रिचवीत थिरकायचा. यावर विचारलं तर तो म्हणायचा, ‘मॉडर्न झोर्बा आहोत आम्ही. वर्क हार्ड पार्टी हार्ड हवंच ना. महासत्तेला मॉडर्न झोर्बा पाहिज्येत तिथं तू तर अजूनही साठीतला हिप्पी वाटतोस... सगळ्यांचा समन्वय साधता यायला हवाय आता.’
मी जे वाचत होतो, तीच घरातली पुस्तकं त्यानंही वाचली होती की. त्यानंही त्याचे हस्तमैथूनापासून क्युबापर्यंतच्या कित्येक शंकांचं समाधान त्यानं माझ्याचकडून करूनही घेतलं होतं. प्रतिगांधीनं भ्रष्टाचार नी लोकपालाच्या सिद्धीसाठी जंतरमंतरवर अवघं देशाचं पर्यावरण धुरकट करायला घेतलं, तेव्हा तो आला, नी म्हणाला, ‘समर्थनासाठी मोर्चा काढतोय आम्ही, तू मिटिंगला यावंस असं वाटतंय.’ ‘तू यावंस असं वाटतंय’ असं त्यानं सांगितल्यावर मी गेलो नाही, तरी काही फरक पडणार नाही हे अप्रत्यक्ष सांगितलंच होतं. ‘मी यात नाही रे, तू कर तुला हवं ते’ म्हणालो. गेला. तो त्याचं पहिलं मत बाळगून होता. तो फक्त एकटाच नव्हता तब्बल पंधरा कोटी पहिले मतदार होते आणि त्यांच्यापर्यंत तरी महासत्तेचा ‘फील गुड फॅक्टर’ व्यवस्थित पोहोचला होता. त्या वर्षी मी पहिला स्मार्टफोन घेतला. तेव्हा त्यानं चांगलं मॉडेल घेण्यात न विचारताही मार्गदर्शन केलं. काळामागं पडलोय ही पहिली जाणीव. जागत बरंच काही घडतं होतं. आता पळा... छाती फुटेस्तोर. ही गोष्ट चिमटीत पकडताच आली नाही. मुक्त अर्थव्यवस्था आणि तिची अरिष्ट्ये यांत ‘गत्यंतर नसणं’ हा कॉमनसेन्स आपल्याला पारखा झाला याचं विराट दर्शन झालं. आपणही झापड घालूनच होतो की.
त्याला बिझनेसमन व्हायचं होतं. त्यासाठी कास्ट आणि कम्यूनल लाईनहीच पर्फेक्ट वाटत होती. एकदा शेवटचं भारताचा सुजाण नागरीक म्हणून बोललो तर, तो अनावश्यक आक्रमकतेनं उत्तरला ‘भारताला चेहेराच नाहीये. इतिहासातले चेहेरे आत्ता काय कामाचे? आज जनरेशन गॅप पाच वर्षांवर आलीय रे. आज जर अमेरिका चीनशी पंगा घ्यायचाय तर आपल्यालाही ओबामा- जिनपिंग पाहिजेच!, आपल्याला देशाची काळजीच नाही. भ्रष्टाचार बोकाळलाय. साले, सत्ताधाऱ्यांनी जंतरमंतरचं आंदोलन कसं सडवलं... माझा देश वाचला तर माझं भविष्य वाचणार आहे. तिकडचे देश प्रायोरिटीनं आपल्या माणसांची काळजी घेतायत. त्यांच्या प्रगतीला प्राधान्य देत आहेत. इकडं काय होतं? साला, देशच या वाळवीनं पोखरलाय. माहित्येय आपला देश नाही तितका स्ट्रॉंग, त्यासाठी मिशन 20-20 राबवावं लागेल आणि कठोरपणे ते आमलात आणण्यासाठी देशाला खरंच हुकूनशहाचीच गरज आहे...’ देशाला चेहराच राहिलेला नाही, पण बुरखा घातलेले सोज्जवळ त्याला उत्तर ठरू शकणारं नक्कीच नव्हतं... काय आणि कसं?
देशातल्या पहिल्या मतदारांचा पैस अत्यंत चलाखीनं आटोपशीर ठेवला... उज्ज्वल भविष्याची प्रखर तिरीप कोवळ्या डोळ्यांना दिपवून टाकीत होती. आदर्शांचा अंत झाला होता मात्र आटोपशीर इतिहास मात्र मरू दिला नव्हता. इतिहासाचा अंत कधी होईल का हे प्रश्न कदाचित अशा फर्स्ट टाईम व्होटर्सचे जागरूक पालक आजही विचारीत असतील. दोष त्यांना का द्या आपण किमान स्वप्नं तरी दाखवायला हवी होती. पण घाराला ही स्वप्न उरलेली नव्हती. त्यामुळं घराणेशाहीबद्दल डोळ्यात रिसत होती. त्यांनाच काय बोलावं रे? आता लक्षात येतं, त्या काळात आपली स्वप्नंही बिनचेहऱ्याची झाली होती की. त्यांना चेहरा दिसत होता. म्हणून त्यांना भविष्य दिसत होतं. त्या काळात फक्त या युवकांच्याच स्वप्नांसाठी चेहरा मिळाला नाही, तर बहुसंख्यकांच्या अस्मितेला दोन दशकांपासून खतपाणी घालून पंख फुटले होते... त्यांचा तितकाच सोकावलेला सुकाळ त्याच्या बाजूनं होता. तरुण सर्वाधिक वेगानं या बोलक्या घेवड्याच्या रानातून बाहेर पडले, मात्र सोकावलेले उन्मादत जात आहेत.
आज पाहातो, जाणवतं... या मागची आज दिसणारी सरळ कारणं तेव्हा आपल्याला तरी कुठं उमजलेली होती. गेम प्लान सरळ होता, प्रेसिडेन्शियल कॉन्टेस्ट आणि शेठजी फॅक्टर, यूपीएचं अपयश आणि भ्रष्टाचार, देशाचं अधोगतीकडे जाणारं चित्र आणि यासाठी हिंदूबहुल राष्ट्रासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू असलेली आस्मिताजागृती...
दोस्ता, हे सारं काही घडून जातंय. याची नोंद इंतिहास घेईल का? कारण वेगानं घडणाऱ्या या जटील इतिहासाची इतकी तपशीलवार नोंद दोन्ही बाजूंनी होतेय की या इतिहासात डोळसपणे डोकावून पाहण्याचाही अवधी कुणाकडे उरणार नाही. आज सज्ञान झाल्यावरही मेंदूवर मार करणारा सोयीचा इतिहासच स्वीकारला जाईल. जीवन त्याचा मार्ग शोधतं. पण वंचितांच्या संघर्षाला त्यात मार्ग सापडत नाहीत. किमान विचार करण्यासाठी जगण्यापुरता श्वास आता आपल्याला घेता येतोय. बोलत राहूत आपण.