Opinion
एका स्वप्नाचा अंत
वेगळ्या राजकारणाची पायाभरणी महाराष्ट्र करेल हे अनेकांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे.
शिवसेनेतील यापूर्वीची सर्व प्रमुख बंडं बाळासाहेब असताना झाली होती. पक्षामध्ये आपली कोंडी होत असल्याची तक्रार करून भुजबळ, गणेश नाईक, राणे, राज ठाकरे बाहेर पडले. त्यांची बंडखोरी आपापल्या राजकीय करियरसाठी होती. त्यातल्या त्यात भुजबळ हे ओबीसींची गळचेपी होते असे म्हणत बाहेर पडले.
पण जात-पात न पाहता रस्त्यावरच्या फाटक्या माणसालाही सेनेत उमेदवारी दिली जाते हे सर्वांना दिसत होतं. त्यामुळे त्यांचा आक्षेप टिकला नाही. एकनाथ शिंदे यांनी मात्र विचारसरणी म्हणजेच हिंदुत्व हा बंडाचा मुख्य मुद्दा केला आहे. तो राज्यातील बहुसंख्य शिवसैनिक, आमदार आणि सेनेचे मतदार यांना पटेल असा आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये सैनिकांमधील हिंदुत्वाचे हे आकर्षण काबूत ठेवण्यात उद्धव यांना सपशेल अपयश आलं. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी असे मूळ ब्रीद असले तरी स्थापनेच्या तीन-चार वर्षातच ती मुसलमानांविरुध्द राडे करणारी संघटना झाली होती.
प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लेखणी चालवली तरी बाळासाहेबांची भूमिका संदिग्धच होती.
१९७० च्या सुमारास भिवंडी, मुंबई इत्यादी दंगलींबाबतच्या पोलिसी दप्तरांमध्ये त्याची नोंद आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लेखणी चालवली तरी बाळासाहेबांची भूमिका संदिग्धच होती. म्हणूनच १९८० च्या दशकात ते भाजप आणि विहिंपसोबत गेले. २०१९ मध्ये बाळासाहेब नसताना उद्धव यांनी एकट्याच्या बळावर हे सर्व काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत त्यांनी सरकार स्थापन केले. ठाकरे घराण्यातील कोणीतरी सांगते आहे म्हणूनच हा प्रयोग शिवसैनिकांनी मान्य केला.
पण नंतर शिवसेनेची नवीन प्रतिमा निर्माण करण्यासाठी उद्धव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यभर जो झंझावात निर्माण करायला हवा होता तो कुठेच दिसला नाही. ममता बॅनर्जी, एम के स्टालीन किंवा चंद्रशेखर राव यांना प्रादेशिक राजकारणाची नाडी अचूक सापडली आहे. राजकारणाचा अभ्यास करण्यासारखा आहे. नरेंद्र मोदीदेखील एकाच दमात सावरकर आणि गांधींचं नाव घेऊन धकवून नेतात. मोदींच्या व्यक्तिमत्वामुळे हा दुटप्पीपणा झाकला जातो. उद्धव यांना अशी जादू निर्माण करता आली नाही. त्यामुळेच आज शिंदे यांनी स्वतःच्या भल्यासाठी सेनेचा विश्वासघात केला असा आरोप करणे कठीण होणार आहे. राणे आणि राज यांच्या बंडांनंतर उद्धव यांनी सेनेला वाढवली हे खरे आहे. पण यावेळची स्थिती पूर्ण भिन्न आहे.
भाजपने हा जो घाव घातला आहे त्यातून सेना वाचण्यासाठी चमत्कारच व्हावा लागेल.
शिंदे यांच्या हातात कुऱ्हाड देऊन भाजपने हा जो घाव घातला आहे त्यातून बाळासाहेबांचं छत्र नसलेली सेना वाचण्यासाठी चमत्कारच व्हावा लागेल. त्यातच मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याने सरकारवरचे आरोपही उद्धव यांनाच चिकटणार आहेत. गेल्या दोन वर्षात उद्धव यांनी कोरोना आणि आजारपण यांच्या आडून स्वतःला सर्वांपासून पूर्णपणे अलग केले होते. सेना सत्तेत आहे म्हणजे आपोआप वाढत राहील असा बहुदा त्यांचा गैरसमज होता. अगदी अलिकडे त्यांना याची जाणीव झाली असावी. म्हणूनच त्यांनी मुंबई व औरंगाबादेत सभा घेतल्या. पण त्याला खूप उशीर झाला.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सर्व अपमानांचे हिशेब भाजप आणि फडणवीस यांनी चुकते केले. आरंभी ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याचा खुद्द देवेंद्रांवरच बहुदा इतका प्रभाव होता की त्यांनी सरकार पाडण्यासाठी बालिश कारवाया केल्या. गेल्या वर्षभरात मात्र त्या सर्व चुका त्यांनी सुधारल्या. महाराष्ट्र आणि मुंबईवर भाजपला आर्थिक कारणांसाठी कबजा करायचा होता हे तर स्पष्ट होते. पण शिवसेनेचा हिंदुत्वाच्या अंगणातला सवता सुभा त्यांना काट्यासारखा सलत होता. रस्त्यावरचं दंगलखोर हिंदुत्व महाराष्ट्रात तरी शिवसेनेमुळेच प्रसिध्द आहे.
तीच सेना दिवसरात्र मोदी व हिंदुत्वावर टीका करीत असणे हे भाजपला अत्यंत गैरसोयीचे होते. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाद्वारे हा काटा काढून टाकला गेला आहे. शिवाय, मुंबई आणि ठाण्याच्या पालिकांच्या निवडणुका जिंकण्याची शक्यता वाढली आहे. महाविकास आघाडीचा सरकारचा अंत आज ना उद्या होईलच. पण तीन पक्ष एकत्र राहणेही कठीण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही हा हादरा आहे. हिंदी पट्ट्यातील अडाणी आणि खुनशी कारभारापेक्षा वेगळ्या राजकारणाची पायाभरणी महाराष्ट्र करेल हे अनेकांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे.
राजेंद्र साठे वरिष्ठ पत्रकार आणि इंडी जर्नलचे संपादकीय सल्लागार आहेत.