Quick Reads

ब्राह्मणी पितृसत्ता आणि स्त्रीवादी आंबेडकरवाद

भारतीय समाजात स्त्रीचा दर्जा दुय्यम असल्याचे कारण म्हणजे येथील ब्राम्हणवादी पितृसत्ता.

Credit : Indie Journal

 

भारतीय समाजात स्त्रीचा दर्जा आजही दुय्यम असल्याचे दिसून येते आणि याच मुळं कारण म्हणजे येथील ब्राह्मणवादी पितृसत्ता (Brahminical Patriarchy). स्त्री ही माणूस असून मानवी समाजाचा अविभाज्य असा घटक आहे परंतु पितृसत्ताक विचार-व्यवहाराने या घटकाची दुर्दशा करून, स्वतःचे अर्धांग लुळे करून ठेवून मानवी समाजातील सुसंस्कृतपणास कळिमा फासलेली आहे. मुळात स्त्रीला समाज काय मानतो,  कोणते स्थान देतो या प्रश्नांच्या उत्तरांवरून त्या समाजाचा दर्जा आणि मानवी समाज म्हणून त्याची मूल्यवत्ता ठरविता येते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहतात, "मी कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीने मोजून काढतो" हे विधान शंभर टक्के खरे असले तरीही भारतीय समाज व्यवस्थेने स्त्रीला सतत दुय्यम स्थान दिले. स्त्रीला केवळ भोगदासी करून ठेवणारा, तिला केवळ जातींची निर्मिती करणारी यंत्रणा म्हणून राबवणारा आणि तिला ज्ञानबंदी करून माणुसकीच्या पूर्ण आविष्काराकडे जान्याच्या तिच्या वाटा बंद करून टाकणारा समाज वा असे अश्लील विचारधारेचे व्यक्तीमत्व मानव म्हणवून घेण्यास पात्र नाहीत. असल्या विचारसरणीचा अंत केवळ महत्वाचा नसून मूलभूत आहे आणि स्त्रीवादी आंबेडकरवाद यावर एक समतेच्या वाटेवरील तोडगा असू शकतो. 

 

ब्राह्मणी पितृसत्ता आणि भारतीय स्त्री 

वरवर बघितल्यास असे निर्दशनास येते की, जगभरच स्त्रीच्या वाट्याला दुय्यमत्व आले, दास्य आले पण भारतातील स्त्रीच्या वाट्याला आलेले दास्य विलक्षण होते आणि आहे. इथे स्त्रीचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि लैंगिकदृष्ट्या शारीरिक आणि मानसिकही शोषण निर्विघ्नपणे सुरू होते आणि आहे. याला कारण म्हणजे येथील पुरुषीसंस्कृती, जीने स्त्रीला माणूसपणापासून तोडले. धर्माने, जातींने तिची माणुसपणाशी गाठच पडू दिली नाही. शील, चारित्र्यं अशा गोष्टींचे अवडंबर माजवून स्त्रीला त्यांच्याशी बांधून टाकले. स्त्रीचे शरीर आणि अपत्य जन्माला घालण्याची तिची शक्ती यामुळे स्त्रीची महत्ता मुळात वाढायला हवी होती पण या गोष्टींच्या मदतीनेच पुरुषीसंस्कृतीने तिचे पंख कापले. या उच्चवर्णीय पुरुषीसंस्कृतीला स्त्रीला गुलाम करण्याची गरज भासली कारण त्यात या ब्राह्मणी संस्कृतीचे हितसंबंध असून चातुरर्वन्याची रचना चिरंतन राहणे हा बेत त्यामागे आखला होता. त्यामुळे स्त्री खरे तर क्रांतीची पाठशाळा पण ती प्रतिक्रांतीची जन्मदात्री ठरली. गार्गी, मैत्रेयी, सुलभा अशा स्त्रीयांनाही दुय्यमत्व भोगावे  लागले. पुढे तर स्त्रीला अधःपतित जीवनच जगावे लागले.

मनूचे मत असे आहे की, स्त्रीने कुटुंबाची आणि पुरुषाची फक्त सेवा करावी. ब्रह्मदेवाने स्त्रियांची रचनाच गर्भधारणेसाठी केली आहे. पतीपासून फारकत घेणाऱ्या स्त्रीला स्वर्ग मिळत नाही. त्यामुळे तिच्या घटस्फोटाला धर्माची मान्यता नाही. पती कसाही असो त्याचे गुणगानच स्त्रीने केले पाहिजे. पती सोडून इतर श्रेष्ठ पुरुषाचा स्वीकार केल्यास तिला कोल्हीणीचा जन्म लाभतो. पत्नी मरताच पुरुषाने लग्न करावे, स्त्रीने मात्र केशवपन करून स्वतःला क्षीण करून घ्यावे पण परपुरुषाचा विचारही करू नये. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार होय. स्त्री गुलामीला पवित्र मानते आणि या गुलाम जगण्यात धन्यता मानते तेव्हाच ती पूजनीय होते. चांगली स्त्री कोणती? जी उत्कृष्ट गुलाम आहे ती! आदर्श स्त्री कोणती? या गुलामीची भक्तिभावाने पूजा करते ती! स्वतःला केवळ भोगदासी मानते, स्वतःला केवळ व्यक्तित्वशून्य मानते, मुकी गाय मानते आणि विनातक्रार ही अस्तित्वशून्यता सहन करते ती स्त्री पूजनीय ठरते.म्हणून 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति हेच मनूचे स्त्रीसंबंधीचे धोरण ठरते यात शंका नाही. डॉ. आंबेडकरांच्या मते मनु व मनुस्मृती या ग्रंथाने स्त्रियांची माणुसकी गारद करून स्त्रीचा उपमर्द केला आहे. या ग्रंथात समतेचा 'स' ही नाही तर असमतेची धुळवड आहे. अशा लोकविग्रही आणि माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा दहनविधी म्हणूननच त्यांनी २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे केला. स्त्रियांना जाळणारा ग्रंथ जाळून डॉ. आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणशिंग फुंकले यात शंका नाही.परंतू आजही आधुनिक मनू (Modern Manu) वेगवेगळ्या रूपात भारतात अस्तित्वात आहेतच यात तिळमात्र शंका नाही, पण शोकांतिका मात्र आहेच.

 

 

 

भारतीय स्त्री-मुक्तीची मुळे 

या स्त्री अधपतनाच्या काळातच स्त्रीच्या जीवनात बुद्धाने नवी क्रांती घडवली. भारतातील स्रीदास्याच्या संदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे की, ब्राह्मणी परंपरा ही स्त्रियांना दास्यात ठेवणारी आहे, तर बौद्ध परंपरा ही स्त्रियांच्या मुक्तीला बांधील असणारी परंपरा आहे. महाप्रजापती गौतमी, भिक्खूसंघात तथागताने स्त्रियांनाही प्रवेश द्यावा, म्हणून ५०० परिव्राजक स्त्रियांसह कपिलवस्तूहून वैशालीपर्यंत पायी चालत आल्या. बुद्धाचा सर्वोत्तम शिष्य आनंदशी झालेल्या महासंवादानंतर बुद्धाने महिला भिक्खूसंघाची स्थापना केली. शुद्र आणि स्त्रियांचा ओघ धम्माकडे समतेसाठी आणि बंधमुक्तीसाठी वाहू लागला. स्त्रीला धम्मात मोकळा श्वास घेता येऊ लागला व आपल्या व्यक्तित्वाची जाण तिला झाली. धम्म हा स्त्री-पुरुष समता सांगत होता कारण धम्म वर्णव्यवस्थेच्याविरोधी होता. भिक्खूसंघात स्त्रियांना प्रवेश होता. धम्मदीक्षेचा त्यांना अधिकार होता. त्यामुळे त्यांना ज्ञान मिळवता येऊ लागले. आपल्यातील तेज त्यांना प्रकट करता येऊ लागले.

वैदिक आर्यांनी तिच्याभोवती उभारलेले पिंजरे तुटू लागले. धम्मात लिंगभेद नव्हता. त्यामुळे पुरुषाच्या बरोबरीने स्वतःचा विकास करण्याच्या सर्व सोयी तिला उपलब्ध झाल्या. स्त्री सन्मानाचा विषय झाली. बुद्धाने तिचे दास्य नष्ट केले. तिला माणूस म्हणून जगण्यासाठी मुक्त सांस्कृतिक पर्यावरण धम्माने तयार करून दिले. अशाप्रकारे बुद्धाने स्त्रीजीवनात क्रांती केली होती. समाजाचे हे लुळे केले गेलेले अर्थ अंग त्याने सबळ होऊ लागले. बुद्धाने स्त्रीला त्याकाळी ज्ञानाचे, स्वयंमुक्तीचे आणि स्वयंविकासाचे सर्व हक्क दिले होते. मनूने स्त्री स्वातंत्र्याची होळी केली आणि डॉ. आंबेडकरांनी स्त्री स्वातंत्र्याची होळी करणाऱ्या मनुस्मृतीचीच होळी करून अस्पृश्य स्त्रीयांपासून समता सुरू करून त्यांनी संपूर्ण स्त्रीजातीच्या मुक्तीपर्यंत आपला विचार फुलवून ठेवला. अशाप्रकारे ब्राह्मणी परंपरेने स्त्रियांवर जी ज्ञानबंदी लादलेली होती ती उठवून स्त्रियांना परिव्रज्या देणारे गौतम बुद्ध हे भारतातील स्त्रियांच्या मुक्तीचे जनक ठरले. पुढे डॉ. आंबेडकर यांनीही बुद्धचेच अनुकरण करत संपूर्ण भारतीय स्त्री वर्गाचा विचार तेवत ठेवला. त्यामुळे आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद यांत भेद नसून साम्यच आहे. लिंगभेद आणि जात यांवर आधारलेल्या शोषणव्यवस्थेचा विनाश हा आंबेडकरवादाच्या केंद्रस्थानी आहे.

स्त्रीवादी आंबेडकरवाद

डॉ.आंबेडकर यांनी ‘कास्ट इन इंडिया’मध्ये जातिव्यवस्थेच्या निर्मितीचा सिद्धांत मांडताना लिहिले की, ‘गटांतर्गत विवाह करणाऱ्या रुढीने स्वगटाबाहेर लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय!’ जातीची निर्मिती, जातीचे अस्तित्व आणि सातत्य हे स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणावर टिकलेले आहे. त्यामुळे त्यानी स्त्रीस (तिच्या लैंगिकतेवरील नियंत्रणास) 'जातीव्यवस्थेचे प्रवेशद्वार' म्हंटले आहे. 'स्त्री ही पुरूषाची खासगी मालकी ठरवून तिच्या श्रमावर, प्रजननावर ताबा घेऊन जात-पितृसत्ता उभी ठाकली. या जातपितृसत्तेचे ब्राह्मणी धर्म, कला, साहित्य, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाने वैचारिक पालनपोषण केले. जातिव्यवस्था आणि स्रीदास्य यांचा अविभाज्य असा संबंध असल्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरजातीय विवाह हा जातीअंताचा एक कृती कार्यक्रम असू शकतो असे मानले. पण त्यासाठी धर्माच्या दास्यातून मुक्त असणे ही पूर्वअट सांगितली. कारण धर्मग्रंथ हे ब्राह्मणी पितृसत्तेची संरक्षक भिंत आहे! ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या गुलामीचा चक्रव्यूह भेदून होणारे आंतरजातीय विवाह हेच खऱ्यारूपाने जातीअंतास हातभार लावनारे असतील हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारव्यूह आपल्याला ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट‘मध्ये दिसतो.

 

 

बाबासाहेबांचा हा दृष्टीकोण त्यांना तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाकडे वळवतो. डॉ. आंबेडकरांच्या मते,स्त्रीस जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असावे.विवाहानंतर पत्नी ही पुरुषाची समान अधिकारी असली पाहिजे.नवऱ्याच्याबरोबरीने मित्र म्हणून समानतेच्या नात्याने उभे राह्यला तिने शिकले पाहिजे. स्त्रियांनी धीट, बुद्धिमान आणि भीतीमुक्त असले पाहिजे. असे झाले तर घरात आणि समाजातही आपापली कामे त्यांना स्वतःच अधिक हिंमतीने करता येतील.स्त्रियांचे मनोगत वाढविण्यासाठी त्यानी महाड येथे स्त्री-मुक्ती संदर्भात सांगितले की, 'तुमच्यात कोणतीही कमतरता नाही. स्वच्छता पाळा, दारुड्या नवऱ्याला, मुलांना आणि भावांना घरात घेऊ नका'.समाजक्रांतीमध्ये स्त्रीची भूमिका निर्णायक आहे असे डॉ. आंबेडकरांचे प्रतिपादन आहे. डॉ. आंबेडकरांचा 'हिंदू स्त्रीची उन्नती आणि अवनती' हा शोधनिबंध या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. बाबासाहेब सांगतात, मुलींना शिकविले पाहिजे तेव्हाच ती स्वाभिमानाणे, स्वावलंबीपणे जगू शकेल. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबच शिक्षणाच्या उजेडाने न्हाऊन निघते. 'तुम्ही सर्वप्रथम शिक्षित व्हा. आपल्या मुलामुलींना शिकवा त्यामुळे देशाचा विकास होईल.' असे स्त्रीशिक्षणाचे महत्त्व डॉ. आंबेडकरांनी पटवून सांगितले.

स्त्रीमुक्तीला कायद्याची शक्ती देऊ पाहणारे, स्त्रीला समता, स्वातंत्र्याचे पुरुषाच्या बरोबरीने हक्क देणारे 'हिंदूकोड बिल' पास झाले नाही तेव्हा स्त्रीवादाच्या या महान शिल्पकाराने आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. स्त्रीला भोगदासी करणारी, तिला अज्ञानी आणि लाचार ठेवणारी ही संपूर्ण समाजरचना नष्ट करून तिच्या जागी स्त्रीला संपूर्ण विकासाची दारे सतत उघडी ठेवणारी परिवर्तनवादी समाजरचना साकार झाली पाहिजे असे डॉ. आंबेडकर यांचे स्वप्न होते व हेच स्वप्न आंबेडकरवादी स्त्रीवादाचेही आहे. त्यामुळे आंबेडकरवादी स्त्रीवाद म्हणजे आबेडकरवादाच्या आधारे स्त्रीवादाची मांडणी वा आंबेडकरवादाला स्त्रीवादाची जोड होय. 

शिवानी वालदेकर, द युनिव्हर्सिटी ऑफ एडिबर्ग, स्कॉटलंड, यू. के. विद्यापीठातून सामाजिक व राजकीय विज्ञान विषयात पोस्टग्रॅज्युएट आहेत.

त्यांना तुम्ही ट्विटरवर फॉलो करू शकता : @ShivaniWaldekar