India

'IAS' मधूची यशोगाथा निघाली खोटी

'बंगळुरु मिरर'चे संपादक रवी जोशी यांनी या प्रकरणावर वाचकांची माफी मागितली आहे.

जेव्हा मधूने आपला परीक्षा क्रमांक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांच्या यादीत पाहिला त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मधू हा बंगळुरु शहर परिवहन मंडळामध्ये वाहक आहे. आपल्या कुटुंबात शाळेची पायरी चढलेला पहिलाच व्यक्ती आहे." 'बंगळुरु मिरर'ने 'नेक्स्ट स्टॉप': IAS या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध केली. 'लोकल टू नॅशनल' सर्वच प्रकारच्या माध्यमांत मोस्ट व्हायरल ठरली.

कामासोबत दररोज पाच तास अभ्यास आणि कन्नडसह इंग्रजीचा अभ्यास करुन मधूनं यश मिळविल्याचं बातमीत म्हटलं होतं.

यूपीएससीच्या स्पर्धेत मधू सारख्या बस वाहकाने स्वत:ला अजमावण सकारात्मक बाब होती. नकारत्मकतेच्या थबडग्यात प्रेरणा आणि सकारात्मकता निर्माण करणारी उजवीच ठरते. मधूच्या बातमीबाबत तेच झालं. ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीचा भाग म्हणून विविध स्तरावरील माध्यमांनी मूळ बातमीचा संदर्भ देऊन बातमी प्रसिद्ध केली. अनेक प्रादेशिक भाषेतील माध्यमांनी बातमीची दखल घेतली. मधू हा माध्यमांकरिता स्पॉटलाईट ठरला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकरिता देशभरातून विद्यार्थी तयारी करत असतात. पूर्व, मुख्य आणि त्यानंतर मुलाखत असे टप्पे उमेदवारांना पार करावे लागतात. परीक्षार्थींची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र मुख्यपरीक्षेकरिता साधारण बारा ते तेरा हजार विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि मुलाखतीकरिता ही संख्या दोन हजारांच्या आसपास असते.

बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे, जून-२०१९ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेला मधू प्रविष्ट झाला होता. ऑक्टोबरमध्ये पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि त्यानंतर मधूने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय यूपीएससीकरिता वैकल्पिक विषय म्हणून त्याने निवडले होते. मधूने पूर्व परीक्षा कन्नडमधून तर मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिल्याचे बातमीत सांगण्यात आले.

मधू हा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मालवली भागातून येतो. त्याच्या संघर्षाची दखल घेण्यासाठी तिथे कन्नड माध्यमे दाखल झाली. महाराष्ट्रातील मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक पेजवरुन मधूच्या बातमीचा उल्लेख केला. ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. मधूला देशभरातून अभिनंदनाचे फोन येत होते. मदतीची तयारी दाखवली जात होती. प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनी आणि  विशेषत: कर्नाटकातील अधिकाऱ्यांनी मधूला मुलाखतीकरिता मार्गदर्शनाची तयारी दाखवली. त्यादृष्टीने पाऊले उचलली जात होती. याचाच भाग म्हणून मधूचे नाव मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मधूचे नाव आढळून आले नाही. खातरजमा करण्यासाठी 'मिरर'शी संपर्क साधण्यात आला.

मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या २३३३ विद्यार्थ्यांची यादी आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मधू या नावाशी साधर्म्य असणारी चार नाव आहेत. तर 'बंगळुरु मिरर' वृत्तपत्राने म्हटल्याप्रमाणे मधूने सांगितलेले परीक्षा क्रमांक व अन्य तपशील हे मधु कुमारी या नावाच्या उमेदवाराशी जुळतात. त्यामुळे मधूचे नाव यादीत नसल्याचे स्पष्ट झाले होते.

'बंगळुरु मिरर'चे संपादक रवी जोशी यांनी या प्रकरणावर वाचकांची माफी मागितली आहे आणि बातमी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाविषयी निवेदन केलं जाईल असं सांगण्यात आलं.

 

मधू स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे हे तितकचं खर असलं तरी या बातमीच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. नेमक चुकलं कोण? प्रसिद्धी किंवा सहानुभूतीकरिता मधूने प्रयत्न केला का? तटस्थपणे सर्व माहितीची शहानिशा करुन प्रसिद्धी द्यायला हवी होती. फेक न्यूजचे प्रमाण वाढले आहे. त्याप्रमाणात तथ्य शोधण(फॅक्ट चेकिंग) होत नाही.  न्यूज पोर्टलची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे. संदर्भाची पूर्णत: खातरजमा न करता बातमी अनुवादित करुन प्रादेशिक माध्यमांत प्रसिद्ध होते. वाचकांची शुद्ध फसवणूक आहे.