Americas

ब्राझीलचे ट्रम्प

ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष कडव्या उजव्या विचारांचे आहेत

Credit : Reuters/Diego Vara

ब्राझिल मध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. कट्टर उजव्या धोरणांचा पुरस्कार करणार्या जैर बोल्सोनारो या एका माजी आर्मी कॅप्टनची या निवडणुकीतुन अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे. ब्राझिलच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुलनेने नवीन असलेल्या बोल्सोनारो यांची त्यांच्या टोकाच्या उजव्या विचारसरणीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना केली जात आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये पसरणारी उजव्या विचारसरणीची लाट बोल्सोनारो यांच्या विजयामुळे लॅटिन अमेरिकेत पोहोचली असे या निकालाचे विश्लेषण काही राजकीय विचारवंत करत आहेत.

बोल्सोनारो यांचे मुख्य स्पर्धक मानले जाणारे, सध्या तुरूंगवासात असलेले माजी राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निवडणुक लढवण्यास अपाञ घोषित करण्यात आले होते. त्यांच्या अनुपस्थितीत ब्राझिलच्या कामगार पक्षाचे उमेदवार असलेल्या फर्नांडो हुदाद यांचा पराभव करत बोल्सोनारो यांनी एकूण मतांच्या ५५% मते मिळवली. २०१६ मध्ये समाजवादी विचारसरणीच्या नेत्या, तात्कालिन राष्ट्राध्यक्षा डिल्मा रोसेफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर भ्रष्टाचार विरोध हा ब्राझिलच्या राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. 'ऑपरेशन कार वाॅश' नावाने चालवली जात असलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे माजी राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना तुरंगात जावे लागले होते. पारंपरिक राजकारण्यांबद्दल ब्राझिलियन जनतेच्या मनात निर्माण झालेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर बोल्सोनारो यांची तुलनेने नवखा अशी असलेली प्रतिमा त्यांच्या विजयासाठी अनुकूल ठरली असे मानले जात आहे.

ब्राझिलची ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हे मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरले. बोल्सोनारो यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणे, पेन्शन योजनेत कपात करणे, सरकारी खर्चावर निर्बंध आणणे असे उपाय योजनार असल्याचे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. निवडणुक निकालानंतर त्यांनी नोकरशाहीमध्ये मोठी कपात करण्याचे जाहीर केले आहे. अर्थव्यवस्थेचे उदारीकरण प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पाॅल गुडेस या शिकगो युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेतलेल्या भांडवलवादी अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचे नक्की केले आहे असे अल जझिराने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो हे स्ञिया, अल्पसंख्याक आणि LGBTQ या वर्गांबद्दल टोकाची विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मूळ ब्राझिलियन (Indigenous) लोकांच्या दृष्टीनेही बोल्सोनारो यांची निवड अहितकारक मानली जात आहे. मुख्यतः अॅमॅझाॅन नदीच्या खोऱ्यात बहुसंख्येने रहात असलेल्या या मूळ देशी लोकांबद्दल बोल्सोनारो यांनी द्वेशपुर्ण वक्तव्ये केली आहेत आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आधीच स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या या लोकंसाठी बोल्सोनारो यांची निवड हा मोठा धोका आहे असे द गार्डियनने एका संपादकीय लेखात म्हटले आहे.

मागिल काही वर्षांमध्ये ब्राझिलमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात तिथे ६३,००० खुनांची नोंद झाल्याचे एक आकडेवारी सांगते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पुर्ण मोकळीक देण्याचे तसेच गन लाॅज वरील निर्बंध कमी करण्याचे आश्वासन बोल्सोनारो यांनी दिले आहे.

ब्राझिल हा भारत, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह ब्रीक्स समुहाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. चीन आणि ब्राझिल यांचे बरेच मोठे व्यापारी संबंध आहेत. परंतु बोल्सोनारो यांच्या धोरणांमुळे ब्राझिल चीनपासुन दुरावला जाउन अमेरिकेच्या जास्त जवळ जाइल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निवडणुक प्रवासादरम्यान चीन ब्राझिलला विकत घेण्याचा प्रयत्न करतोय असे वक्तव्य बोल्सोनारो यांनी केले होते. अमेरिकेच्या धोरणाला अनुसरून ब्राझिल आपला इस्रायलमधील दूतावास तेल अविव वरून जेरूसलेमला हलवेल असेही बोल्सोनारो यांनी म्हटले आहे.

वाढती बेरोजगारी, आर्थिक असमानता, दारिद्र्य आणि गुन्हेगारी या समस्यांशी झगडत असणार्या ब्राझिलमधे जनमत टोकाच्या मतभेदांनी विभागले गेले आहे. देशाला या समस्यांमधून बाहेर काढण्याचे आश्वासन देत 'पाथ टू प्रोस्पेरिटी' हे घोषवाक्य घेऊन सत्तेवर आलेले बोल्सोनारो सत्तेवर आले आहेत. ते आणि  त्यांचे सरकार या कामात कितपत यशस्वी ठरतील याविषयी सध्यातरी बऱ्याच शंका उपस्थित करण्यात येत आहेत.