Quick Reads
फोटॉन : राजुरी वेशीवरचा आवारा
फोटोमागच्या कथा, व्यक्ती आणि अवकाश
आपण ज्या शहरात राहतो त्याला आपण कितपत ओळखतो किंवा तेही आपल्याला कितपत ओळखतं, या दोन्ही गोष्टी मला तितक्याच महत्वाच्या वाटतात. मला माझ्या शहरात हिंडायला प्रचंड आवडतं. त्याच्या नव्या-जुन्या सगळ्या गल्ल्या मला तोंडपाठ आहेत. त्याच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी मला माहीत आहेत. सकाळी काय बघावं, दुपारी कुठं असावं, संध्याकाळी कुठं जावं हे सगळं मला छान कळलं आहे, किंवा हे शहरच मला त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी घेऊन जातं!
आत्ताचं शहर शंभर दिडशे वर्षापुर्वी प्रचंड वेगळं होतं. त्यावेळीचं मुख्य शहर नदीपासून - बशीरगंज इतकंच होतं. बशीरगंजमधली 'राजुरी वेस' हीच शहराची मेन वेस होती. (शहराला अशा एकूण चार वेसी होत्या, म्हणजे त्या आजही आहेत पण फक्त नावाला.)
बशीरगंज हे नाव इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडलं. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आला होता. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर म्हणजे 'राजुरी वेस'वर रिजाऊल हसन याने बशिरोद्दीन याचं स्वागत केलं. तेव्हापासून या चौकाला 'बशीरगंज' या नावाने ओळखलं जातं.
बशीरगंजच्या चौकातच म्हणजे 'राजुरी वेस'च्या अगदी बाजुलाच डी. सी. सी. बँक आहे आणि त्याच्या समोर 'पोस्ट अॉफिस'ची मेन बिल्डींग आहे. वेसीच्या बाहेर चिटकूनच डुप्लिकेट चाव्या बनवणारेही बसलेले असतात आणि तिथेच संध्याकाळी चिकन कबाबांच्या गाड्याही लागतात. वेसीतून मधे गेल्यावर फुलांची, अत्तरांची दुकानं आहेत. एक मस्जिद आहे. आणि मुख्य म्हणजे शहरातलं सगळ्यात फेमस 'सिटी हॉटेल' आहे. इथं उत्तम नॉनव्हेज मिळतं. नॉनव्हेजिटेरिअन चाहत्यांची इथं रोज मोठ्या प्रमाणात रीग असते. इथली 'बिऱ्यानी' खूप फेमस आहे असं म्हणतात (मित्रांबरोबर दोन तीनदा गेलेलो, पण मुळातच मी व्हेजिटेरिअन असल्याने खाण्याचा संबंध नाही!). असो.
मागच्यावर्षीची गोष्ट आहे..
'राजुरी वेस'च्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी दोन खोबण्या आहेत. तिथे अत्यंत दीन अवस्थेत एक माणूस बसून असायचा. म्हणजे तेच त्याचं घर होतं. मी नेहमीच त्याला येता जाता बघायचो. त्याच्या डोळ्यातली चमक मला विशेष आवडायची. तो मला प्रचंंड वेगळा वाटायचा.
एकदा सहजच त्याला बोलावंसं वाटलेलं म्हणून मी त्याच्याजवळ गेलेलो. तो लगेच बोलणार नाही म्हणून अगोदर काही मदत म्हणून पैसे दिले. तेंव्हा तो झोपलेल्याच अवस्थेत होता. फारच थकलेला वाटत होता. त्याच्या बोलण्यातही एक प्रकारचा थकवा जाणवत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून नंतर मी त्याची चौकशी केली तेंव्हा त्यालाही बरं वाटलेलं. नंतर फोटो काढू का विचारल्यावर अगोदर नको म्हणाला, नंतर अजून विनंती केल्यावर हसत 'काढा' म्हणाला.. त्यावेळी तर तो मला फारच निरागस वाटला.
त्याची कहाणी काय आहे ? तो एकटाच कसा राहतो? हे प्रश्न मला नेहमीच भंडावून सोडायचे. मी अधून-मधून त्याला बघायला जायचो. काही पैसे द्यायचो आणि निघून यायचो.
मी त्याला शेवटचं पाहिलं ते मागच्या वर्षीच्या रमजानच्या चार दिवस आधी. त्याने दाढी कटिंग केलेली. नवीन कपडे घातलेले. मला सुरुवातीला तर तो ओळखूच आला नव्हता. त्याला असं स्वच्छ, नीट-नेटकं पाहून मला फार बरं वाटलेलं. पण त्या नंतर तो मला कधीच दिसला नाही..
आणि अचानक एकेदिवशी तो 'राजुरी वेस'च्या त्याच खोबणीत लोकांना मृत अवस्थेत सापडला !
हे मला फार उशीरा कळालं. प्रचंड वाईट वाटलं. तिथल्या लोकांशी मी नंतर विचारपूस केली तेव्हा मला असंही कळालं, एकेकाळी राजुरी वेसच्या बाजूचा बराच परिसर त्याचा होता. आणि पुर्वी तो प्रचंड श्रीमंत होता!
शहरातल्या रस्त्यांवर अशा हजार कथा असतात. आपल्याला त्या वाचता यायला हव्यात, इतकंच...