India
अयोध्येचा धर्म काय?
वार्तांकनासाठी अयोध्येत गेल्याचा विलक्षण अनुभव
अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फैजापूरच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपवून हॉटेलकडे पाय ओढले गेले, शरीर आज फैजापूरमध्येच आराम करावा यासाठी आग्रही होतं कारण ते थकलं होतं, उत्तरप्रदेशची निवडणूक म्हणजे एकाच वेळी अत्यंत थकवणारी, पण पत्रकारांना मात्र त्याचवेळी दररोज काम करण्यास तरतरी देणारी. त्यामुळे शरीर तर थकलं होतं पण मन अयोध्येकडे ओढ घेत होतं. निवडणूक कव्हर करायचं नियोजन झालं, तेव्हाच उत्तरप्रदेश म्हणजे अयोध्या, ही ओळख फार घट्ट असल्याचं जाणवलं. ही नगरी नेमकी कशी आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायचं हे मानाशी ठरविलं होतं. त्यामुळे प्रचंड थकवा असूनही सोबतीला कॅमेरामन घेऊन मी मनाने अयोध्येच्या वाटेला लागलो देखील! उत्तरप्रदेशात मतदानादिवशी सर्व व्यवहार बंद. अगदी संचारबंदी लागल्यावर असतं तसं वातावरण, प्रचंड बंदोबस्त, दुकानं बंद-घरांचे दरवाजेही बंद. त्यामुळं मतदानादिवशी पाणी मिळणंही अवघड..त्यामुळे दिवसभर हाल झाले होते पण मन काही मानत नव्हतं.
अयोध्या. एक छोटंसं नगर, पण देशाचा माहोल बदलून टाकण्यास कारणीभूत ठरलं, द्वेषाची वादळं अशी काही उठली की आजपर्यत हजारो लोक तर त्यात मारले गेलेच, पण मनात निर्माण झालेली अढी पिढ्यानपिढ्या कायम आहे. कधीतरी मन हिशोब करत राहतं, की जर अयोध्या वाद झाला नसता तर देश कसा असता, वातावरण कसं असतं, यापेक्षा अधिक प्रगती होऊ शकली असती का, राजकारणाची पुढची दिशा काय असती. हा हिशोब शेवटी नफा दाखवतो, पण वस्तुस्थिती काय आहे, याचा स्वत: घेतलेला शोध गरजेचा असतो. मगच नेमका हिशोब लागतो. वर्षानुवर्षे असे अनेक पैलू आणि अनेक संदर्भाने अयोध्येचा विचार डोक्यात राहील्याने तयारी आपोआप झाली. सायंकाळी ७ वाजता लाईव्ह होतं, ते संपवलं, हॉटेलवर गेलो आणि तयारी करून बाहेर पडलो, रात्रीचे ९ वाजले होते.
मागच्या तीन महीन्यांचा अनुभव गाठीशी होता, उत्तरप्रदेशात पुढच्या शहरात काय सोय होईल, जेवायला मिळेल की नाही याची शाश्वती नसते, हे माहीत झाल्याने फैजाबादमध्येच रात्रीचं जेवण घेतलं. गेले तीन महीने उत्तरप्रदेशमध्ये असाच भटकत होतो, नेहमीप्रमाणे गाडी घेऊन भटकण्यापेक्षा जाणीवपूर्वक पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरत होतो, रेल्वेचं प्रचंड जाळं असल्याने बरेचदा रेल्वे, छोट्या अंतरासाठी बस किंवा खासगी वाहन- ते ही मिळेल ते, अगदी टमटम पासून ते बैलगाडीपर्यंत काहीही. शहरात माणूस-रिक्षा. आपल्या नागपूरात असते तशी माणसं ओढतात ती सायकल रिक्षा. या निवडणूकीच्या निमित्ताने मुलायमसिंहांचं सैफई गाव, मायावतींचं लखनौमधलं अलिशान घर, राजनाथसिंग, कल्याणसिंग, जगदंबिका पाल वगैरे सर्वच नेत्यांची गावं- शहरातली घरं पालथी घातलेली- मुंबईहून झी टीव्हीची टिम आली आहे, एवढं पुरेसं होत असे, मायावती वगळता सर्वांनीच तातडीने प्रतिसाद दिला होता. यापुढे जाऊन डाकूंच्या चंबळच्या प्रदेशात, गंगा नदीची परिक्रमा, लखनौचा नवाबी थाट, फूलनदेवीचं गाव, अनेक बाहुबलींचे इलाखे, गोरखपुर-नेपाल बॉर्डरपर्यंत सर्व भाग भटकून उत्तरप्रदेश समजून घेतला होता, आता जाणून घ्यायची होती अयोध्या!
रात्रीची बस पकडून अयोध्येला पोहचलो तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते, फैजाबादहून अयोध्या अत्यंत जवळ असलं तरी मतदानानंतर दुसऱ्या दिवशी किमान सकाळी आराम मिळत असल्याने उशीरा पोहचलो तरी काही ताण येणार नव्हता..अयोध्येत सकाळी निवांत उठून आवरावं आणि स्टोरीज् शोधाव्या असं नियोजन होतं..हायवेवरच बस थांबली, सामान घेऊन उतरलो, काळाकुट्ट अंधार होता, अयोध्या मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला होती, लांबून लाईटमध्ये रात्रीच्या वेळीही या नगरीचा सुरेखपणा जाणवत होता. मंदीरांचे आकार आणि बाजूने वाहणाऱ्या शरयू नदीचं अस्तित्व.
हायवेवर उतरल्यावर सायकल रिक्षासाठी शोधाशोध करावी लागली नाही, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली रिक्षा होती, चालक मागच्या बाजूला ग्राहक बसतात तिथे मुरकटून पडला होता, कदाचीत बराच वेळ वाट पाहून त्याला झोप लागली होती. दिवसभर तापमानाचा काटा ४० डिग्रीपर्यंत जात होता, त्यामुळे सायकल रिक्षावाल्यांचे होणारे हाल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण भाडं मिळाल्याचा आनंदही त्याला होईल, हा विचार करून मी हलकेच त्याला उठवले. अयोध्या में होटल ले जाओगे क्या? तो पटकन उठला. चेह-यावर आनंद पसरला, "भैय्या यहाँ तो बस राम और श्याम होटल है, आपको लिए चलता हूँ." कॅमेराबॅग, ट्रायपॉड, लाईट आदी सामानाची बॅग आणि आमचं वैयक्तिक सामान असलेली प्रत्येकी एक मोठी ट्रॉली सुटकेस एवढं सर्व सामान रिक्षात लादलं आणि रिक्षा निघाली..
मंद वारा येत होता, रस्त्यावर शुकशुकाट होता, इंटरनेटवर वाचलं होतं किमान ४० हजार लोकसंख्या असलेली नगरी आहे ही , पण इथं एकूलते एकच हॉटेल! याचं आश्चर्य वाटलं, जगाच्या नकाशावर आलेलं नगर, ऐतिहासिक महत्व असलेलं ठिकाण, देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेलं नगर पण अविकसीत आहे की काय? राम मंदीराच्या आंदोलनाच्या निमित्ताने नेते, कार्यकर्ते, भक्त, पत्रकार इथं येत असतात, पण दुसरे हॉटेलच नाही!
फ़ैज़ाबाद हाकेच्या अंतरावर अगदी १० किलोमीटर दूर असल्याने कदाचीत तिथे राहून इथं काम करणं अनेकांसाठी सोपं होत असावं, असा अंदाज लाऊनही मी त्याला विचारलं, "यहाँ एकही होटल क्यों है?”
”भैय्या, होटल एक है पर धर्मशालाएँ बहुत है, लोग उसीमें रह लेते है, अब कितनी तो धर्मशालाएँ होटल बनने जा रही है, देखे कब होता है.” त्याने एका दमात सर्व माहीती सांगितली होती.
विकासाची नेहमीची माझी फूटपट्टी तुटली होती.मी विषय बदलला, ” नाम क्या है तुम्हारा..?”
“जी भैय्या, रामलाल.”
”कौन पार्टी का ज़ोर चल रहा है आपके इलाखे में?” मी थेट प्रश्नाला हात घातला...
”कछू मालूम नही भैय्या, पार्टी तो सभी है, अब क्या बताए कौन जिते है और कौन हारे है...हम तो लगे रहते है रोजी में, ध्यान नही देते...”
लक्षात आलं की त्याला हा प्रश्न टाळायचा आहे. मी पुढचा प्रश्न केला.. "तुम्हारा वोट किसको डालोगे...” तो गोंधळला...
”अभी सोचा नही, फुरसत हुआ तो दे देंगे किसो को भी जो हमारा भला सोचे!”
मी पुन्हा तोच प्रश्न विचारला तर त्याने अक्षरश: ऐकून न ऐकल्याप्रमाणे केले.
श्रीरामाचं जन्मगाव असल्याने प्रचंड सोयीसुविधा असतील, किमान आंदोलनामुळे भरभराट झाली असेल असे असंख्य समज माझ्या डोक्यात होते, जसजसं अयोध्येत आत शिरत गेलो, एक एक समज गळून पडत गेले...अयोध्या आपल्या साताऱ्यातल्या वाई सारखी वाटली, थोडी वाईपेक्षा छोटी असेल, पण धार्मिकदृष्ट्या आणखी समृध्द…रस्ता तसा ठिक होता.
”रामलाल, तुम्हे कौनसी पार्टी अच्छी लगती है? माझा आपला पुन्हा सहज प्रश्न पण त्याच्यासाठी अडचण..तो हसला,
” सभी अच्छी है..!”
” पर काम कौन पार्टी करती है..”
तो म्हणाला, “काम तो सभी करती है, और कोई भी पार्टी नही करती..”
त्याचं हे उत्तर ऐकून मी त्याला बोलतं करण्याचा नाद सोडून दिला. तोपर्यंत हॉटेलही आलं, दोन मजली टुमदार लाकडी आणि लोखंडाचं मिळून उभं केलेलं हॉटेल. रिसेप्शनचं दार बंद, मीच आवाज़ दिला, रिक्षावाला काही हॉटेलवाल्याला उठवायला आला नाही..काही हाका मारल्यावर एकजण उठला, दरवाजा उघडला.
” क्या है..”
” रूम मिलेगा क्या?”
” नही भैय्या, रूम खाली नही है!” रिसेप्शनमध्ये अनेक लोक झोपले होते, हे पहा सर्व फौजी लोक आहेत. हॉटेल त्यांनीच भरलंय, रुम मिळणार नाही, उत्तर ऐकून परत निघालो.
रामलालला विचारलं..” यहाँ तो जगह नही है..अब कहाँ जा सकते है..?”
रात्री एक नंतर अयोध्येतील सर्व धर्मशाळा पालथ्या घातल्या पण कुठेही रुमच काय पण झोपण्यापुरतीही जागा उपलब्ध नव्हती. एका धर्मशाळेजवळ आलो. रामलालनं आवाज दिला, एव्हाना रामलालला सुद्धा वाटू लागलं होतं, की आम्हाला जागा मिळावी. त्यामुले तो शेवटी शेवटी तो स्वत:हून विनंती करु लागला होता, की ‘मुंबईसे आए है दो लोग, जरा आप जगह दिजीएगा!’ त्याने येथेही दबक्या आवाजात विचारलं. ”भैय्या, जगह है?” समोरुन साधारणतः पस्तिशीच्या तरुणाने दार उघडलं आणि उत्तर दिलं, "हाँ है." आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला. वादग्रस्त जागेवर २००५ साली पाच अतिरेक्यांनी हल्ला केला होता, तेव्हापासून बाहेरच्या लोकांना जागा देताना अयोध्यावासीय अधिकची काळजी घेत होते.
'तुम्ही कोण आहात, कुठून आले आहात, ओळखपत्र आहे का’ अशी सर्व चौकशी झाल्यावर त्याने आत घेतलं. पत्रकार ते ही मुंबईचे आणि झी टीव्हीचे त्यामुळे तर त्याच्या दृष्टीने आणखी विषय सोपा झाला. त्याने ओळखपत्र काही सेकंद पाहीले आणि म्हणाला, ”आप उस रूम में जाइए, बाकी हम आते है, त्याने एका सेवकाला जागं केलं आणि आम्हाला पाणी देण्यास सांगितले. आम्ही दोघं सामान घेऊन आत गेलो, रामलालनेही मदत केली. आत आल्यावर रामलालला भाडं किती झालं ते विचारलं, तो म्हणाला, “दिजीए जो सही हो...” मी अंदाजाने भाडं देऊन टाकलं, त्याचा चेहरा वाचला, त्याच्या चेहऱ्यावर आम्ही त्याला देऊ केलेले ते भाडं योग्य असल्याचे भाव होते...आते है...म्हणत तो निघून गेला, त्याला मी उद्या ये म्हणालो. आम्हाला गरज लागेल.. उद्याच्याही कामाचा भरोसा मिळाल्यावर तो अधिकच आनंदी झाला. सेवकाने एक बादली आणून पाणी दिलं होतं, त्यातच हातपाय धुतले, कॅमेरामनची किरकिर सुरू होती. कितना दौड़ाया, सुबह आते तो ठिक होता वगैरे वगैरे.
त्याला मी म्हणालो... "अरे मित्रा, शोधण्यात वेळ गेला. यापलिकडे काहीच झालं नाही. आपल्याला एवढ्या रात्री इथं इतकं भटकूनही काहीच वाईट अनुभव आला नाही, आता थकलोय ना, मग पटकन झोपू. उद्या निवांत कामाला लागू. नगर इतकं रंगेबेरंगी आहे की बातम्यांनी इथे काही कमी होणार नाही.”
संपूर्ण उत्तरप्रदेश मराठी प्रेक्षकांना खूप आवडला होता, रोज सातच्या बातमीपत्रात वेगवेगळ्या मुद्यांवर लाईव्ह असे. चंबळ, फूलनदेवी, गंगा किंवा लखनवी कल्चर असे काही विषय असतील तर अधिक आवडीने चर्चा होत असे. बुलेटिन प्रोड्यूसर किंवा कुणीही असो, उत्तरप्रदेशच्या ऑफ बिट स्टोरीज् सर्वांनाच आवडायच्या. कॅमेरावर्क अप्रतिम असायचं. मी कितीही किरकिर केली तरी कैमेरामन शांततेत उत्तरप्रदेशचा प्रत्येक पैलू टिपायचा. अनेक गोष्टी केवळ त्याच्या व्हिज्युअल्सवर जीवंत होत असत. त्याची व्हिज्युअल्स पाहून माझी स्क्रीप्ट आकार घेत असे. अप्रतिम पीटीसी करण्याकडे त्याचा कल असे. फॅब इंडीयातून त्याने सर्व कलरचे डार्क प्लेन शर्ट घ्यायला लावले होते. एरवी ते भड़क होते पण उत्तरप्रदेशच्या बॅकग्रांऊडवर ते कलर अप्रतिम दिसत असत.
झी २४ तास मराठी वाहीनी नुकतीच सुरू झाल्यानं माझ्या बातम्यांना स्क्रीनवर भरपूर वेळ मिळत असे, सायंकाळी ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे बातमीपत्र वाचायचे, त्यांना उत्तरप्रदेशमधील वेगवेगळ्या स्टोरीज् फार आवडत. ते ठेवलेल्या स्लॉटपेक्षा अधिक वेळ घेऊन प्रश्न विचारत, आम्ही आज कोणत्या हार्ड आणि सॉफ्ट विषयावर बोलायचं. हे आधीच बोलून ठेवलेलं असे- राजकारण- समाजकारण- अर्थकारण- काही काही शिल्लक ठेवलं नाही, दररोज राजकीय आणि सामाजिक विषयांचा समतोल साधून आम्ही लोकांपुढे फार रंजक माहीती ठेवत असू, उत्तरप्रदेशहून परतल्यावर भिड़ेंनी माझा आवडता रिपोर्टर म्हणून माझ्यासोबत फोटो काढले आणि माझं कुटुंब आणि मित्र- नातेवाईक तुझे फैन झालेत, असं त्यांनी जेव्हा मला सांगितले तेव्हा जिंकल्याचा आनंद झाला. त्यावरून हा प्रदेश किती उत्तमरित्या कव्हर झाला हे स्पष्ट झालं. भाषेचा लहेजा सातारी असूनही भिडेंनी त्यावर कधीही भाष्य केलं नाही. मनापासून सतत कौतूक केलं, ही दिलदारी फार आत्मविश्वास देऊन गेली.
आता दौऱ्याचा उत्कर्षबिंदू जवळ आला होता. कारण या सिरीजमध्ये आम्ही पुढचे काही दिवस अयोध्या दाखवणार होतो. तिथले रंग मराठी प्रेक्षकांपुढे मांडणार होतो. उद्यापासून ते सर्व छान करायचं याचा दबावही आला होताच पण वैयक्तिक पातळीवर १९९२ पासून डोक्यात राहीलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरंही मिलणार होती, मला त्या प्रश्नांपासून सुटका ही हवी होती!
डोक्यात हे सर्व नियोजन सुरू असताना धर्मशाळेचा तो व्यवस्थापक तरूण रजिस्टर घेऊन आला, त्याने लिहायला घेतलं, ” नाम बोलो..” एव्हाना मी रात्रीचे कपडे घालून लोळत पडलो होतो. एका हातावर डोकं रेलून मी म्हणालो, "लिख लिजिएगा," मी म्हणालो, "रफीक मुल्ला" तो पटकन थांबला, "क्या बोले..?" मी पुन्हा सांगितले, "रफीक मुल्ला..." त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसला...त्यानं डोक्याला हात लावला.
"अरे भैय्या, आप तो मुसलमान हो!”
मी तेवढ्याच आश्चर्याने बोललो, "हा तो फिर?”
त्यानं रजिस्टर बंद केलं...
"परेशानी यह है की यह धर्मशाला विश्व हिंदू परिषद की है और यहाँ दूसरे धर्म के लोगो को खास कर मुसलमानो को रहनेसे मना किया है..”
मी विचारले, ” सभी घर्मशालाओमें..?”
”नही सभी नही पर यह परिषद की है तो यहाँ ख़ास तौर से मनाई है...”
झालं एकतर कंटाळा आलेला. प्रचंड झोप आहे डोळ्यावर आणि साला, आता हे काय..!
मी तसा भडकलोच, "अरे यार कार्ड तो दिखाया था ना मैंने! देखा नही क्या नाम था उसपर?”
त्याने अपराधीभावाने उत्तर दिले, ” हमने तो जी टिव्ही है या नही इतनाही देखा, नाम देखा नही ठिक से..!”
मी वैतागून म्हणालो, "तो अब क्या करे?”
तो आणि मी दोघंही विचारात पडलो की, "अब क्या करे..!”
मी विचार केला इथून कुठे जायचे, मी कुठेही काढेन रात्र पण सोबतीचा कॅमेरामन थकला होता. त्याला आराम आवश्यक होता. त्याला थोडं बरंही नाही असं तो दोन दिवस बोलत होता. नेमक्या आरामाच्या दिवशी मी त्याला फैजाबादमधली हॉटेलची एक चांगली रुम सोडायला लावली होती, कारण मला अयोध्येला पोहचायचे होते! हा विचार करत होतो तेवढ्यात तो बोलला, "भैय्या एक काम करते है, आपके कैमेरावाले जो है उनके नाम से रजिस्टर में लिखता हूँ, क्या नाम है इनका?”
मी स्मितहस्य केलं..तो झोपला होता, मी म्हणालो…
"श्रफ तारीक..! इसका नाम यह है..”
तो ही मुसलमान..आता विषय संपला होता. पण त्याची अस्वस्थता वाढली होती. तो गोंधळला होता. त्याला आम्हाला बाहेर पाठवायचं नव्हतं पण बिचाऱ्यापुढे दुसरा मार्गही नव्हता.
"भैय्या, ऐसा करते है आप रूक जाओ, पर सुबह जल्दी निकल जाना, शालाके प्रमुख आने से पहले निकलना होगा, वरना मेरी खैर नही.” त्याने अजीजीनं सांगितलं.
"नही भाई शुक्रीया, एक तो सुबह जल्दी निकलने को नही होगा और आपको मुश्कीलमें डालने की हमारी इच्छा भी नही, बेहतर है निकलते है.” मी ठामपणे म्हणालो.
त्याने विविध प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला मनापासून वाटत होतं की आम्ही इथं रहावं..पण खरोखरच सकाळी उठायला होणार नाही.आज ना उद्या कुणाला समजलं की या धर्मशालेत अपरात्री दोन मुसलमान तरूण राहीले होते. ते खरंच पत्रकार होते का एक ना दोन अनेक प्रश्न उपस्थित झाले असते. आज ना उद्या, कधीही. आणि सर्वात महत्वाचं या दयाळू माणसाला अडचणीत आणण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून निघालो. श्रफ तारिकला उठवलं आणि समजावलं. बाहेर पडलो.
मदत करत तो तरुण बाहेरपर्यंत तो आला, म्हणाला "माफ़ करना भैय्या...हमें खेद है...”
“आपका नाम क्या बोले?"
"मिथिलेश तिवारी.”
मी त्याला म्हणालो, "तो मिथिलेशजी. कोई बात नही, इतनी सारी नफरत होने के बावजूद और आप उस छोर पर खडे होने के बावजूद आप जो प्यार दिखा रहे हो वह इन्सानियत है. वह हर जगह मौजूद है. और नफरत के बीच जब वह असर दिखाती है तो कोई शिकायत नही.” त्याचे धन्यवाद केले आणि बाहेर पडलो. काही पावलं चाललो, गावात मोठ्या झाडाखाली जशी बसायला जागा बनवलेली असते, तशा पारासारख्या ठिकाणी रामलाल रिक्षा लाऊन पुन्हा झोपला होता, त्याला पुन्हा पाहून बरं वाटलं. त्याला उठवलं, आणि सांगितलं काय झाले ते!
"भैय्या, आपका नाम तो जान चुके थे जब आपस में आप लोग बात कर रहे थे, पर जगह नही थी तो वहाँ ले गए, जब आपको रूम मिला तो लगा रात कट जाएगी.”
"चलो हम भी यही सो जाते है..” मी म्हणालो. पण माझा हा निर्णय त्याने नापास ठरवला.
"नही भैय्या आप बहुत थके हुए हो, चलिए एक जगह है, वहाँ चलते है.”
मला वाटलं आणखी कुठल्यातरी धर्मशालेत हा घेऊन जाईल किंवा आता नावांचा प्रश्न आहे तर मशिदीत घेऊन जाईल. चलो म्हणालो आणि निमूटपणे निघालो, सायकल चालवू दे मला अशी विनंती केली, नंतर आग्रह धरला पण त्याने ऐकलं नाही, सामान ठेऊन सर्वजण चालत निघालो, अयोध्येच्या दुस-या टोकापर्यंत आल्याचे जाणवलं. एका घराजवळ थांबलो. घर असं काही असं नव्हतं ते. साधं काडाचं छप्पर होतं. त्याने घरातल्या लोकांना उठवलं, लक्षात आलं होतं, हे त्याचंच घर आहे.
घरातल्या लोकांना आवाज़ देऊन तो मला म्हणाला, "भैय्या, यह मेरा घर है, आपको अगर मंजूर है तो यहाँ रूक जाइएगा.”
त्याचा मंजूर हा शब्द जातीच्या अर्थाने होता. त्याने त्याअर्थाने विचारलं होतं. त्यामुळे मी नाही म्हणालो नाही .माझी संमती मिळताच त्याने आत बिछाना करायला घेतला. वाकून आत शिरलो, छप्परवजा घरात त्याचे आई- वडील पत्नी आणि तीन मुलं होती.
"आम्ही आत तर ते कुठे झोपणार?" मी प्रश्न केला.
त्याने सहज उत्तर दिले, "बाहेर..!"
पहाटेचे चार वाजत आले होते, त्यामुळं छान वारा सुटला होता, त्याने बाजला अंगणात टाकला. बाजल्याखाली आम्ही सर्व सामान टाकलं..मी बाजल्यावर अडवा झालो, अंगात शिणवटा भरला होता..वर छान स्वच्छ टपोऱ्या चांदण्यांनी आकाश भरलं होतं. चादर मळकी होती पण त्यात ऊब होती. वारा किंचितसा झोंबतोय असं वाटल्यानं चादर अंगावर घेतली. आज अयोध्येत एका रात्री मिळालेल्या अनुभवाचा अर्थ लावत डोळा लागला.
सकाळी कडक ऊन अंगावर आल्यावर जागा झालो, श्रफ अजूनही झोपला होता. उन्हानं त्याच्या झोपेचं काही वाकडं केलं नव्हतं. मी उठलो, छान झोप झाली. काही तास पण शांततेत झोपलो. रामलालचा सर्व परिवार तयार झाला होता. आमच्या जागं होण्याची वाट पाहत होता. त्यांना कुठे कामाला जायचं असेल या अंदाजाने मी पटकन तयार झालो. श्रफला उठवलं, त्यांनी पोहे आणि चहा दिला. तो घेतला.
रामलालला विचारलं, "की आता कुठे सोय होऊ शकते का?"
त्याने आता काही अडचण येणार नाही, असं सांगितले..कारण अनेक खाजगी घरांमध्ये राहण्याची सोय होते. तशा वेगळ्या रुम असतात. त्या महिन्याच्या नव्हे तर रोजच्या भाड्यावर दिल्या जातात. हॉटेलप्रमाणे. रात्री उशीरा तिथे जाता येत नाही पण आता आपण जाऊ शकू. मला बरं वाटलं. मी सामान आवरलं त्याच्याच रिक्षात ठेवलं. त्याला बाजूला घेतलं, आणि काही पैसे हातात ठेवले. त्याने ते घेण्यास नकार दिला.
मी समजावले. अरे हे ऑफीसचे पैसे असतात, आम्हाला खर्च देतात, बरंच समजावल्यावर एवढे नको, असं तो बोलू लागला पण मी पण ऐकले नाही. थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्या-खाण्याचा जो खर्च होईल, तेवढा मी दिला होता पण त्याच्या माणूसकीपुढे ते ही कमी वाटत होतं. आणखी फार काही मी त्याच्यासाठी करू शकत नव्हतो. मनात त्याच्या कुटुंबासाठी आपोआप दुवाँ निघाली- देव या सर्वांचं भलं करो. सर्वांचे धन्यवाद करून आम्ही निघालो. घरापासून थोडं दूर गेल्यावर रामलालला विचारलं, "क़ौन पार्टी को वोट दोगे इस बार?”
तो विश्वासानं हसला आणि म्हणाला, "हम तो हाथी को देते है.”
मी आपला पत्रकार, "अरे हाथी सत्ता में आता है फिर भी तुम्हारा सायकल नही छुटता है, ऑटो-रिक्षा क्यो नही आता है.” तो बोलला, "वह तो बात ठिक है भैय्या, यह काम है और हमें उसमें कुछ नही लगता, पर हाथी आता है तो सर उठाकर सायकल चलती है, वरना सर झुकाकर.” मी निरूत्तर झालो.
दिवसा अयोध्या वेगळी दिसत होती. धार्मिक वातावरण, हिंदू- जैन- बौद्ध परंपरेची मंदीरं. जिकडे तिकडे धार्मिकस्थळं, मशीदही होती. फैजाबादला मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. तुलनेत अयोध्येत कमी. शरयू नदीच्या किनारी होड्या, पूजा-पाठ करणारे पूजारी, आस्थेनं त्यात तल्लीन झालेले भक्त. एकूण मंदीरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर जे वातावरण असतं, तेच संपूर्ण नगरीत. कोपऱ्याकोपऱ्यावर आस्था काठोकाठ भरलेली. शरयूच्या बाजूला वेगवेगळ्या लाकडी खोपटवजा झोपड़्यामध्ये बसलेल्या सांधूशी बोललो. सर्वजण राजकारणाला वैतागले होते. अनेक प्रश्न आणि अनेक आरोप. भलेही ते धार्मिक होते पण वस्तूस्थिती कुणीही लपवत नव्हतं. अयोध्येचं राजकारण कुणाला पसंत नव्हतं. सर्व लोक भरभरून बोलत होते, अनेकजण बोलून कंटाळले होते. पत्रकार आहेत म्हणून आदर करत अनेकजण विषय आपल्या परिने मांडत होते, इशारे- धमक्या- द्वेष- कठोर धर्माभिमान कुणाकडेच दिसत नव्हता. शरयूच्या काठावर भटकल्यावर थेट मशीद शोधली. छोटीशी मशीद होती. गावात असते तशी, अत्यंत कमी खर्चात बंधलेली. टेलरींग काम करणारे बाबूभाई तेथे भेटले. दाढ़ी ठेवलेली होती.
मी विचारलं, "जब सब माहौल गरम था तो भी यहाँ नमाज़ होती थी? और आप दाढ़ी भी रखते थे?”
मला काय विचारायचे आहे ते त्यांना नेमके समजले. ते हसले आणि नंतर चेहरा गंभीर करून म्हणाले, “इथले लोक नाहीत ज्यांनी आग लावली, बाहेरून आले. नेतेही बाहेरचे- आणि कार्यकर्तेही- आम्ही अयोध्यावासियांनी एकमेकांवरचा विश्वास कधीच गमावला नाही.” त्यानंतर हनुमान गढीला निघालो. जाताना भटकत निघालो, शक्य ते कॅमे-यात टिपलं. वाटेत भव्य अशा दगडी खांबावर नक्षी कोरण्याचं काम सुरू होतं. अनेक खांब तयार होते. पण त्यावर माती जमा झाली होती. याचा अर्थ बराच काळ ती तयार होऊन पडली होती.
कारागीरांशी बोललो. "क्या कर रहे हो?”
"अरे भैय्या, यह राम मंदीर का काम चल रहा है!”
मी विचारले, “कबसे चल रहा है?”
त्याने निरपेक्षपणे उत्तर दिले, सहा महीन्यांच्या आसपास झाले, काम सुरू आहे, एका पत्र्याच्या तात्पुरत्या केलेल्या मंडपाकडे बोट दाखवत तो म्हणाला, "यह देखो छह महीने में जो काम किया है यह इसके अंदर भी रखा है.”
आत पाहीलं काही घडवलेले दगड होते, कलाकुसर अप्रतिम होती..असाच भटकत हनुमान गढीला पोहचलो. तिथले बुजुर्ग संत ज्ञानदास महाराजांना भेटलो. अयोध्येसंदर्भात अनेक विषयावर गप्पा मारल्यावर त्यांनी सेवकांकडून बाबरी विवादाचा खटला लढणारे सर्वात जुने पक्षकार हाशिम अन्सारी यांना बोलावले! मला वाटले, महाराज कदाचीत आम्हाला अन्सारींच्या ताब्यात देतील, पण अन्सारी आल्यावर दोघे जुन्या आणि बऱ्याच दिवसापासून न आलेल्या मित्रांप्रमाणे अलिंगन देऊन भेटले, बसले..त्यांच्या दोघांत प्रचंड आपुलकी आणि एकमेकांबद्दल आदर दिसला.. अयोध्येच्या नावावर वातावरण चिघळल्या पासून दोघांनी एकोपा ठेवण्यासाठी फार प्रयत्न केले होते. १९९२ च्या घटनेनंतर पहीला रमज़ानचा महीना जेव्हा आला तेव्हा याच हनुमान मंदीरात रोजा सोडण्याची आणि नमाजची जाणीवपूर्वक व्यवस्था करण्यात आली होती,असे असंख्य गंगा-जमुनी तहजीबचे किस्से त्यांनी सांगितले…
त्या दोघांनाही प्रश्न विचारला, "यह सब काम करते हो तो आप लोगो को तकलीफ तो होती होगी?”
त्यांनी दोघांनीही उत्तर दिलं त्याचा सार होता, "तकलिफ हम आपस में बाँट लेते है...लेकीन दु:ख है हमारे नगर के नाम से आप सारे लढते रहते हो..."
त्यानंतर दोन दिवस अयोध्येत होतो, अनेक स्टोरीज केल्या- अक्षरश: नगर भावनांसह कैमे-यात आणि स्क्रीप्टमध्ये बंद केलं. अयोध्येतून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यात मला मिथिलेश-रामलाल-ज्ञानदासजी आणि हाशीमभाई दिसत होते. यांनी खऱ्या अर्थाने अयोध्या वाचवली होती. बाकी जग अयोध्येच्या नावावर जनावरासारखं भांडत असताना ही सर्व अयोध्येतली माणसं देवासारखी वागली होती. वागत आहेत.